

Eknath Shinde and Uddhav Thackeray
esakal
Bhaskar Jadhav’s Appeal on Mumbai Mayor Election : मुंबई महापालिकेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे, यासाठी एकनाथ शिंदे यांनी राजकीय मतभेद, मान-अपमान बाजूला सारून उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी जाहीरपणे केलं आहे.
यासंदर्भात मीडियाशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, ‘’खरं तर माझ्या मनात या विषयी प्रचंड दु:ख आहे. की, यंदा हे वर्ष बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे आणि त्याच वर्षी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर हा मुंबई महापालिकेत असणार नाही. यासारखं दु:ख नाही. म्हणून मी जे कोणी बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेवून जातो म्हणून सांगतात. जे कोणी बाळासाहेबांचे खरे आम्ही वारसदार म्हणून सांगतात, त्या सर्वांना आवाहन वजा विनंती करतो.’’
तसेच, ‘’हे बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. इथंच तुमची खरी बाळासाहेबांवर श्रद्धा आहे का? बाळासाहेबांवर तुमचा विश्वास होता का? बाळासाहेबांसमोर तुम्ही नतमस्तक होवू इच्छिता का? बाळासाहेबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करून इच्छिता का? आणि जर करत असाल तर तुम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं पाहीजे.’’ असं भास्कर जाधव यांनी आवाहन केलंय.
याशिवाय, ‘’ज्या शिवेसना, भाजपबरोबर एकनाथ शिंदे आहेत, त्या एकनाथ शिंदेंना मी आवाहन करतो वजा विनंती मी करतो, की तुम्ही भाजपला सांगितलं पाहिजे, केंद्रात आम्ही तुमच्या सरकारला पाठिंबा दिलाय आम्ही तुमच्याबरोबर राहू, महाराष्ट्रात तुमच्या सरकारला पाठिंबा दिलाय आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पण हे वर्ष हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून आम्ही मुंबईवर हा शिवसेनाचाच भगवा झेंडा फडकला पाहीजे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या म्हणजेच खऱ्या शिवसेनेच्या झेंडा फडकला पाहिजे.’’ असं भास्कर जाधवांना म्हटलं.
याचबरोबर ‘’त्यामुळे आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून, आम्ही शिवसेना प्रमुखांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार देतील त्याला आम्ही मदत करू हे सांगण्याचं धाडस एकनाथ शिंदे यांनी दाखवलं पाहीजे. हे धाडस भास्कर जाधव असता तर नक्कीच दाखवलं असतं.’’असंही भास्कर जाधव यावेळी म्हणाले.
तसेच, ‘’एकनाथ शिंदेंनी १०० टक्के पाठिंबा दिला पाहीजे. त्यांनी भाजपला पाठिंबा देता कामानये. बाळासाहेबांचे तुम्ही खरे वारसदार म्हणून सांगत असाल, बाळासाहेबांमुळे आम्ही घडलो, बाळासाहेबांमुळे आम्ही इथे आलो सांगत असाल, तर बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या वर्षाच्या दिवशी तुम्ही तुमचा मान, सन्मान, गर्व, अहंकार, अधिकार, मान-अपमान बाजूला सारून पाठिंबा दिला पाहीजे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी तुम्ही कमीपणा घेतला पाहीजे. असं माझं जाहीर आवाहन वजा विनंती आहे. महापौर निवडीसाठी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला पाहीजे. बाळासाहेबांना मानत असतील तर एकनाथ शिंदेंना ते दातृत्व दाखवावं लागेल.’’ असं आवाहन भास्कर जाधव यांनी केलं आहे.
मुंबईच्या महापौर पदासाठी गुरुवारी झालेल्या सोडत प्रक्रियेत हे पद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव ठरलं. बीएमसी निवडणुकीत भाजप ८९ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे., तर शिंदेंच्या शिवसेनेने २९ जागा जिंकल्या आहेत. अशाप्रकारे दोन्ही पक्षांनी महायुती म्हणून ११८ जागा जिंकल्या आहेत, ज्या बहुमताच्या आकड्यापेक्षा ४ जागा जास्त आहेत. तर दुसरकीडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ६५ जागा जिंकल्या आहेत आणि राज ठाकरे यांच्या मनसेने सहा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एक जागा जिंकली आहे. याशिवाय, काँग्रेसने २४ जागा जिंकल्या असून, एआयएमआयएमने ८, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ३ आणि समाजवादी पक्षाने दोन जागा जिंकल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.