esakal | ...म्हणून फलटणकरांनी घुमवला जय महाराष्ट्राचा नारा
sakal

बोलून बातमी शोधा

...म्हणून फलटणकरांनी घुमवला जय महाराष्ट्राचा नारा

फलटण येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुले व मुलींच्या संघाने नेत्रदिपक खेळ केला. आपल्या प्रतिस्पर्धी संघांना पाणीपाजून महाराष्ट्राचे संघ विजयी होताच हजारो प्रेक्षकांनी मोठ्ठा जल्लोष केला. यावेळी करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयजयकाराच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

...म्हणून फलटणकरांनी घुमवला जय महाराष्ट्राचा नारा

sakal_logo
By
किरण बाेळे

फलटण शहर (जि. सातारा) : फलटण शहरातील श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा नगरीत रंगलेल्या चौदा वर्षांखालील मुला - मुलींच्या राष्ट्रीय शालेय खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघाने विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत फलटणकरांना अनेक सामने व अनेक खेळाडूंचे उत्कृष्ट खेळ पहावयास मिळाले.

स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने आंध्र प्रदेशवर एक डाव बारा गुणांनी विजय मिळवून मोठ्या दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात महाराष्ट्राच्या गणेश बोरकरने अडीच मिनिटे संरक्षण केले तर आक्रमणात संतोष पवार याने तीन गडी बाद केले. दूसरा उपांत्य फेरीचा सामना चूरशीचा झाला. तेलंगणा संघाने दिल्ली संघास सहा गुणांनी हरविले. मुलींच्या गटातील उपांत्य फेरीचा सामना महाराष्ट्र आणि ओडिशा यांच्यात झाला. यामध्ये महाराष्ट्राने एक डाव आठ गुणांनी मात करीत अंतिम फेरी गाठली. या सामन्यात अश्विनी शिंदेने साडेचार मिनिटे तर अंकिता लोहारने चार मिनिट संरक्षण केले. आक्रमणात दिपाली राठोडने चार तर अंकिता लोहारने तीन गडी बाद केले. गुजरात विरुद्ध पश्चिम बंगाल यांच्यातील सामन्यात गुजरातने सहा गुणांनी बाजी मारली.

हेही वाचा - राजेच म्हणतात शिवजयंती एकच असावी

यजमान महाराष्ट्राच्या मुला-मुलींनी अंतिम प्रवेश केल्याने मैदानावर क्रीडाप्रेमींची सामने पाहण्यास नेहमीपेक्षा जादा गर्दी झाली. नाणेफेकीत जिंकलेल्या महाराष्ट्राच्या कर्णधार दिपाली राठोडने आक्रमणाचा निर्णय जाहीर केला. गुजरातच्या कर्णधार हर्षदा मकवाना हिने हस्तांदाेलन करुन शुभेच्छा दिल्या. प्रेक्षकांनी खचाखच भरलेले मैदानात महाराष्ट्र विरुध्द गुजरात असा मुलींच्या गटाचा सामना सुरु झाला. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच सामन्यावर आपली पकड ठेवली. सोनाली पवार हिने तीन मिनिटे तर दिपाली राठोडने दोन मिनिट दहा सेकंद संरक्षण केले. भाग्यश्री बडे हिने आक्रमणात चार तर दिपाली राठोडने तीन गडी बाद करीत गुजरातवर एक डाव व पाच गुणांनी विजय मिळविला.

जरुर वाचा - सव्वा लाख सातारकर नोकरीच्या प्रतीक्षेत

मुलींच्या संघात अंकिता लोहार, प्रतीक्षा बिराजदार, नयन काळे, जिजामाता विद्यालय वाळवा, कोल्हापूर, शिवानी यड्रावकर वसंतराव काळे प्रशाला वडी कुरोली, पुणे, अश्विनी शिंदे, श्रीपतराव भोसले हायस्कूल उस्मानाबाद, लातूर, अंतरा शिरसाट, मातोश्री कृष्णाबाई देशमुख विद्यालय अमरावती, दिपाली राठोड, भाग्यश्री बडे, श्री सयाजीनाथ महाराज विद्यालय पुणे, वैष्णवी पोवार, श्री संत गंगामाई गर्ल्स हायस्कूल इचलकरंजी, प्रगती कर्नाळे, प्रज्ञा प्रबोधिनी प्रशाला सांगली, सोनाली पवार, शासकीय माध्यमिक कन्या विद्यालय, नाशिक, चंचल शिंदे, कमलाबाई गर्ल्स हायस्कूल धुळे यांचा समावेश हाेता. या संघाचे प्रशिक्षक गुरूदत्त चव्हाण, व्यवस्थापक सत्यन जाधव, सरव्यवस्थापक अनिल सातव हे हाेते.

हेही वाचा - साताऱ्याचा हवालदार नडला पुण्याच्या पोलिस अधीक्षकांना

मुलांच्या गटात तेलंगणाचा कर्णधार व्ही जनकीरम याने नाणेफेकी जिंकल्यानंतर संरक्षण स्विकारात महाराष्ट्राचा कर्णधार रवि वसावे यास शुभेच्छा दिल्या. या सामन्यात तेलंगणाला निष्प्रभ करीत रवि वसावेने नॉट आउट दोन मिनिट 20 सेकंद संरक्षण केले. वैभव मोरेने आक्रमणात चार गडी बाद केले. महाराष्ट्राने तेलंगणास एक डाव व एका गुणाने धुळ चारली. सामन्या दरम्यान महाराष्ट्राच्या संघास प्रेक्षकांनी वाजविलेल्या टाळ्या आणि शिट्यांमुळे खेळाडू प्राेत्साहित हाेत हाेते. महाराष्ट्राचे दोन्ही संघ विजयी होताच जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या घोषणांनी मैदान दणाणून गेले होते.

हेही वाचा - Video : उदयनराजे पुन्हा चर्चेत

मुलांच्या महाराष्ट्रचा संघात रवी वसावे, लातूर, रमेश वसावे, नागेश वसावे, उस्मानाबाद, चिंतामण चौधरी, नाशिक, वैभव मोरे, मुंबई, तेजस जाधव, पुणे, आशुतोष पवार, कोल्हापूर, करण आमटे, अमरावती, समित सडमेक, नागपूर, गणेश बोरकर, पुणे, रामचंद्र झोरे, मुंबई यांचा समावेश हाेता. या संघाचे प्रशिक्षक प्रशांत पवार , व्यवस्थापक संभाजी चोरमले, सरव्यवस्थापक अनिल सातव हे हाेते. 

फलटणची ओळख खो खो ची पंढरी पण...

फलटण ही खो खो ची पंढरी समजली जाते. खो खोचे राज्यस्तरीय व राष्ट्रीय खेळाडू येथे घडले आहेत. जुन्या व अगदी अलीकडच्या काळातही फलटणच्या खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करुन संघांना नेत्रदीपक कामगिरी करुन सुवर्णपदके प्राप्त करुन दिली आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघात फलटण किंवा सातारा जिल्ह्यातील एकाही खेळाडूचा समावेश नव्हता. यामुळे आगामी काळात सातारा जिल्ह्यातून उत्तम खेळाडू घडण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

हेही वाचा -  महाराष्ट्रातील 16 गावांत पेटले पाणी

हेही वाचा - शानभाग विद्यालयाच्या मुलींनी डेक्कनला हरविले

loading image