कोयना भरण्यासाठी सरासरी ५०० मिलीमीटर पावसाची गरज

सचिन शिंदे 
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

कोयना धरण मजबूत स्थीतीत भरण्यासाठी उर्वरीत काळात पूर्ण क्षमतेने पाऊस होण्याची गरज आहे. उर्वरीत महिनाभरात चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा आहे.
ज्ञानेश्वर बागडे,
कार्यकारी अभियंता, कोयना धरण व्यवस्थापन 

कऱ्हाड : जुलैच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने कोयनेचे सहा वक्र दरवाजे प्रथमच आॅगस्टच्या पूर्वी उघडले. त्यामुळे कोयना धरण मजबूत स्थितीत असल्याची नोंद झाली. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा ओढ दिली आहे. त्यामुळे राहिलेल्या महिभराच्या काळात कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची गरज आहे. त्याची काळजी कोयना धरण व्यवस्थापनाला लागली आहे.

उर्वरित महिनाभरात सरासरी ५०० मिलीमीटर पावसाची त्यासाठी गरज आहे. तो झाला तरच कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरू शकते. सध्या तरी त्या भागात पाऊस नसल्याने धरण व्यवस्थापन काळजीत आहे. ते पुढच्या महिनाभराच्या पावसावर हवाला ठेवून आहेत.

कोयना धरणाच्या इतिहासात प्रथमच यंदा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात धरणाचे दरवाजे उघडले. जुनमध्ये उघडीप दिलेल्या पावसाने १२ जुलैपासून जोर धरला. त्या काळात सरासरी नेहमीपेक्षा २७ टक्के पाऊस जास्त पडल्याची नोंद झाली. सरासरी ३२९० मिलीमीटर पाऊस झाला. त्यावेळी धरणातील पाण्याची उंची २१४४.८० होती तर धरणाने ८३.१३ टीएमसीची टप्पा २९ जुलैलाच गाठला. परिणामी १ आॅगस्टला निर्धारीत ठेवली जाणारी जल पातळी गाठल्याने ३० जुलैलाच धरण व्यनस्थापनाने कोयनेचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला. ३० जुलैला सहा वक्र दरवाजे उघडण्यात आले. तेथून व पायथा वीज गृहातून मिळून ११ हजार ७९२ क्यूसेक पाणी सोडण्यात आले. मात्र तीनच दिवसात टप्प्याटप्प्याने दरवाजाची उंची कमी करून ते बंद करण्यात आले. 

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाच आॅगस्टनंतर पाऊस ओसरला. त्याचे प्रमाण घटले. मध्यंतरी तर कोयना परिसरात शून्य मिलीमीटर पाऊस झाला. कोयनेतील पाण्याची आवक पूर्ण घटली होती. तरीही टप्पा टप्प्याने धरणात संथ पडणाऱ्या पावसाने वाढ होत होती. चोवीस तासात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाच जोर ओसरला. दोन दिवस पडणाऱ्या पावसाने विश्रांती घेतली. तरीही चोवीस तासात कोयनेला १३  व  नवजाला आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कोयनेच्या पाण्याची आजची उंची २१५१.११ फूट आहे. पाणी साठा ९०.३५ टीएमसी आहे.

कालपासून ०.२२ टीएमसी पाणी वाढले आहे. जुलैला दरवर्षीच्या सरासरी पेक्षा २७ टक्के जादा पाऊस होवूनही आॅगस्टच्या शेवटच्या टप्प्यात पावसाची प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे. कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी पावसाची गरज आहे. कोयना मजबूत स्थीतीत येण्यासाठी उर्वरीत कालवधीत मोठा पाऊस हवा आहे. त्याची चिंता कोयना धरण व्यवस्थापनास लागली आहे. यंदा पाऊस चांगला झाला. मात्र त्याचा कालवधी मर्यादीत होता. त्यामुळे अधिक पावसाची गरज आहे. कोयना धरण अजूनही १५ टीएमसी भरायचे आहे. त्यासाठी किमान सरासरी किमान ५०० मिलीमीटर पाऊस उर्वरीत काळात झाला पाहिजे.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज अखेर चार हजार मिलीमीटरच्या पावसाचा टप्पा ओलांडला आहे. कोयना परिसरात तीन हजार ६१२ मिलीमीटर, नवजाला चार हजार १५२ तर महाबळेश्वरला तीन हजार ५०० मिलीमीटर पाऊस आजअखेर झाला आहे. त्यात वाढ होणे अपेक्षीत आहे. अन्यथा कोयना धरण मजबूत स्थीतीत येणे कठीण होणार आहे. त्यामुळे कोयना धरण भरण्याच्या चिंतेचे काळे ढग व्यवस्थापनावर दिसत आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: satara news karad koyna dam storage rains