क्‍लस्टर विकासात उदासीनता राहिली- केंद्रीय मंत्री कलराज मिश्रांची कबुली

उत्तम कुटे
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे लघुउद्योग अडचणीत आल्याची बाब मिश्र यांनी मान्य केली.त्यासाठी अशा उद्योगांची कर्ज मर्यादा केंद्राने दुप्पट करीत दोन कोटीवर नेल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच अशा उद्योगांतील उत्पादित माल सार्वजनिक उपक्रमांना घेणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आजारी उद्योगांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 
 

पिंपरी : औद्योगिक क्‍लस्टर विकासात दहा वर्षानंतरही उदासीनता राहिल्याची कबुली केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री कलराज मिश्र यांनी आज (ता. 23) पिंपरी-चिंचवडमध्ये दिली. त्यामुळे आता हे क्‍लस्टर उभारणीवर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मूलभूत सेवासुविधा आणि पुरेशा विजेअभावी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये स्थलांतरित होत असल्याचे, मात्र त्यांनी अमान्य केले. वीजटंचाईवर सौरऊर्जा हा पर्याय असून त्याला प्राधान्य देत असल्याचेही ते म्हणाले.

नवभारत निर्माण करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्प ते सिद्धी या अभियानांतर्गत मिश्र पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. देशातील पहिल्या आणि एकमेव माजी सैनिक औद्योगिक वसाहतीचे उद्‌घाटनही त्यांनी यावेळी शहरात भोसरी येथे केले. त्यानंतर पुणे अभियांत्रिकी क्‍लस्टर आयोजित सत्रात ते चिंचवड येथे बोलत होते. यावेळी आपले मंत्रालय नवीन भारत घडविण्यासाठी काय करीत आहेत, याचा ऊहापोह त्यांनी केला. शहराचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे लोकसभेतील दोन्ही खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील (शिरूर) व श्रीरंग बारणे (मावळ) यांच्याजोडीने शहरनिवासी राज्यसभा सदस्य अमर साबळे यांची अनुपस्थिती यावेळी खटकून गेली. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, हे मात्र मिश्रा यांच्याबरोबर आवर्जून उपस्थित होते. वाढत्या व रेल्वे अपघाताबाबत त्यांनी यावेळी खेद व्यक्त केला.

मिश्र म्हणाले, "देशात आठशे क्‍लस्टर आहेत.त्यातील 14 महाराष्ट्रात असून त्यापैकी निम्मी पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये आहेत. या क्‍लस्टरच्या मदतीने सध्या आपण आयात करत असलेला माल आपल्याच देशात स्वस्तात तयार करू शकतो. तेवढी आपली क्षमताही आहे. त्यामुळे हे आव्हान आपण पेलले पाहिजे. त्यासाठी आपले मंत्रालय लागेल ती मदत करण्यास तयार आहे. त्यातून चीनसारख्या देशातून होणारी आयात बंद होईल''.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: pune news pcmc industrial cluster development kalraj mishra