satyajeet tambe
satyajeet tambe esakal

सह्याद्रीचा माथा : काँग्रेस, सत्यजीत तांबे आणि पदवीधर निवडणूक

काँग्रेस पक्षाची देशभरातील परिस्थिती सध्या काय आहे, हे सांगण्यापेक्षा ते रस्त्यावरच्या कुणाही माणसाला विचारलं तरी तो सांगू शकेल. राहुल गांधी यांनी पक्षात जान फुंकण्याचा प्रयत्न चालवला आहे.

कदाचित काही अंशी त्याला यश येईलही. पण ते यश कधी पदरात पडेल, हे ठामपणे सांगता येणं कठीण आहे. महाराष्ट्रातील पदवीधर मतदार संघातील निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेसची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली, पण ही चर्चा नकारात्मक अंगानं जास्त आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारकीर्दीत काँग्रेसचे उरले-सुरले बुरुज देखील ढासळत आहेत. मात्र या निमित्तानं एक मात्र नक्की झालं. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यानं नाशिकची पदवीधर निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. (saptarang latest marathi article sahyadricha matha by dr rahul ranalkar on Congress Satyajeet Tambe and Graduate Elections nashik news)

satyajeet tambe
न्यायनिवाड्याचा 'रोबो' प्रयोग

नाशिक पदवीधर मतदारसंघ हा काँग्रेसचा हक्काचा बालेकिल्ला. डॉ. सुधीर तांबे यांनी २००९ मध्ये तो भाजपाकडून खेचून घेत पुढे भक्कम केला. काँग्रेस आणि डॉ. सुधीर तांबे यांनी हा मतदार संघ अतिशय घट्ट बांधून ठेवला.

पक्षीय परिघाच्या बाहेर जावून डॉ. तांबे यांनी या मतदार संघातील नाशिक, नगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात अतिशय उत्तम लोकसंपर्क प्रस्थापित केला. डॉ. तांबे यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीला उमेदवार सापडू नये, यातून तांबे कुटुंबियांची या पदवीधर मतदार संघावरील पकड स्पष्ट होते.

पदवीधर मतदारांचे प्रश्न डॉ. सुधीर तांबे यांनी तळमळीने मांडले आहेत, अनेक तडीस नेले आहेत. जे प्रश्न नव्याने निर्माण होत आहेत किंवा निर्माण होतील, ते सत्यजीत निश्चितच चांगल्या प्रकारे हाताळतील.

शिक्षक भारतीसह ज्या-ज्या मोठ्या संघटनांनी सत्यजीत यांना पाठिंबा दिला, त्यातूनही हेच स्पष्ट होते. कुटुंबातच राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू मिळालेले सत्यजीत हे स्वतंत्रपणे सामाजिक जीवनात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत.

satyajeet tambe
ऐका सांगावा हवामान बदलाचा

पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना शेवटच्या क्षणी डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज न भरता त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अर्ज दाखल केला. शेवटच्या क्षणापर्यंत हा विषय का ताणला गेला? हे पुढे समोर येईलही.

पण त्या दरम्यान सुमारे दोन तासांहून अधिक वेळ सत्यजित तांबे काँग्रेसमधील वरिष्ठांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते, पण संपर्क प्रस्थापित झाला नाही. काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक त्यांना प्रतिसाद दिला नाही, हे कशामुळे? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

पण सर्वांत जुन्या असलेल्या काँग्रेस या राष्ट्रीय पक्षात प्रमुख युवा नेत्याची ही परिस्थिती असेल, तर कार्यकर्ते, पक्षाचे मतदार आणि सामान्यांनी काय करावे? हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. सध्याच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीचे भान काँग्रेसच्या ज्येष्ठांना उरलेले नाही, हे या घटनाक्रमातून स्पष्ट होते.

सध्याच्या स्थितीतील पक्षाची मजबूत ठिकाणे आणखी भक्कम करण्यापेक्षा ती कमकुवत करण्याचे प्रयत्न पक्षातूनच चाललेत की काय? अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. काँग्रेसचा सोयीचा आरोप म्हणजे हे सगळ भाजपा करतंय.

एकवेळ असं मानलं की हे भाजपा करतंय, पण तुम्ही ते करु देताय, त्याचं काय करायचं? आपल्या हक्काच्या जागा, हक्काची माणसं सांभाळणं, जोपासणं हे काँग्रेसला स्वतःच करावं लागेल. त्यात तरुण नेत्यांवर जर अशी वेळ येत असेल, तर त्यांनी काय करावं?

satyajeet tambe
संकटग्रस्त पाणवठे

सत्यजीत तांबे हे नाना पटोले यांच्यापेक्षा जास्त काळापा काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद भूषविलेल्या तरुण नेत्याला त्याची बाजू मांडण्याचीही संधी मिळू नये, याहून दुसरी शोकांतिका काय असू शकते? काँग्रेसमध्ये असलेली कंपूशाही देखील यास कारणीभूत आहे.

केंद्रातील सत्ता जावून नऊ वर्षे उलटूनही काँग्रेसमधील नेत्यांना आपण अजूनही सत्तेत असल्यासारखे वाटते. बदललेल्या अन् वेगानं बदलत्या परिस्थितीचा आवाका समजून घेण्यात पक्ष आणि पक्षातील ज्येष्ठ मंडळी कमी पडताहेत, हे अधोरेखित होते. काँग्रेसमधील तरुण नेत्यांना त्यामुळे शुभेच्छा देण्याशिवाय अन्य काही मार्ग सध्यातरी दिसत नाही.

सत्यजीत तांबे यांची तरुणांमध्ये असलेल्या प्रतिमेच्या जोरावर तसेच तांबे परिवाराची या मतदार संघातील वीण घट्ट असल्याने निवडणुकीत त्यांच्यापुढे मोठे आव्हान नाही. सत्यजीत यांच्यासमोर असलेल्या शुभांगी पाटील या तुलनेने नवख्या आहेत.

मविआचे त्यांना पाठिंब्याबाबत मोठ्या नेत्यांकडून जाहीरपणे ठोस एकमत अजून झालेलं नाही. शिवसेनेला पदवीधरांचे प्रश्न आणि पदवीधर मतदार संघ समजून घ्यायला मोठा काळ जाऊ शकतो. ऐन निवडणुकीत हे साधणं अशक्यप्राय आहे.

अचानक आदेश आला आणि नेते-पदाधिकारी कामाले लागले, आणि लगेचच यश मिळालं, असं या निवडणुकीत होत नाही. निश्चित ध्येय, दिशा ठरवून या निवडणुकीत उतरावे लागते. त्यामुळे शिवसेनेला ''बेटर लक नेक्स्ट टाईम'', असे म्हणणे कदाचित योग्य ठरेल....

satyajeet tambe
कुतूहलातून विज्ञानाकडे...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com