धुळे-मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे काम लवकरच; साडेतीन हजार हेक्‍टर जमीन घेऊ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

धुळेः जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न बनलेली मनमाड-धुळे- इंदूर रेल्वेमार्गाचे काम लवकरच सुरू होईल. याकामी 3547 हेक्‍टर जमीन घेतली जाईल. त्यासाठी जमिनीची खासगी मालकी असलेल्या शेतकऱ्यांना नवीन भूसंपादन कायद्यानुसार मोबदला दिला जाईल, अशी माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज (शनिवार) दुपारी पत्रकार परिषदेत दिली.

धुळेः जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न बनलेली मनमाड-धुळे- इंदूर रेल्वेमार्गाचे काम लवकरच सुरू होईल. याकामी 3547 हेक्‍टर जमीन घेतली जाईल. त्यासाठी जमिनीची खासगी मालकी असलेल्या शेतकऱ्यांना नवीन भूसंपादन कायद्यानुसार मोबदला दिला जाईल, अशी माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज (शनिवार) दुपारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, की धुळे जिल्ह्यातून मनमाड- इंदूर रेल्वे मार्गाची 112 वर्षांपासूनची मागणी आहे. त्यासाठी धुळेकरांना थांबावे लागले. थांबणे हा जिल्ह्याचा स्थायी भाव असून, त्याचा संबंध रेल्वेमार्गाशी जोडला गेला असावा, असे वाटते. मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे काम लवकरच सुरू होईल. त्यासाठी 3 जुलै 2017 ला सविस्तर प्रकल्प अहवाल काही दिवसांपूर्वीच रेल्वे बोर्डाकडे सादर झाला आहे. "जेएनपीटी'च्या आर्थिक सहकार्याने होणारा प्रकल्प सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचा असेल.

धुळे जिल्ह्यात विकासाचे दालन
खानदेशला हजारो कोटींचा निधी येण्याची सवय नाही. दुर्दैवाने धुळे जिल्हा विकासाच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिला. या जिल्ह्यात चांगले नागरिक असून मेहनत करतात. या जिल्ह्याचे विविध प्रकारातून देशासह राज्यासाठी योगदान आहे. त्यामुळे या जिल्ह्याला काही देणे लागतो. "एमआयडीसी' असली तरी उद्योग नाहीत, ते येत नाहीत कारण पुरेशा पायाभूत सुविधा नाहीत. यास मनमाड- इंदूर रेल्वेमार्ग आधारभूत ठरू शकेल. हा प्रकल्प सुरू झाल्यावर या जिल्ह्यात विकासाचे दालन सुरू होईल.

राज्य सरकार करेल भूसंपादन
महाराष्ट्र व मध्य प्रदेशातून जाणाऱ्या मनमाड- इंदूर रेल्वे मार्गाचे काम होण्यासाठी स्वतंत्र कॉर्पोरेशनची स्थापना झाली आहे. रेल्वे बोर्डाकडून अंतिमतः सविस्तर प्रकल्प अहवाल प्राप्त झाल्यानंतर काम सुरू होण्याच्या दिशेने तयारी होईल. याकामी खासगी स्वरूपाची 3 हजार 247 हेक्‍टर आणि वन विभागाची 300 हेक्‍टर, अशी एकूण 3 हजार 547 हेक्‍टर जमीन भूसंपादीत केली जाईल. यात नवीन भूसंपादन कायद्यानुसार खासगी जमीन मालक, शेतकऱ्यांना मोबदला दिला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनाही आर्थिक अडचणी जाणवणार नाहीत. भूसंपादनासंबंधी कार्यवाही राज्य सरकारकडून केली जाईल. या मार्गाचे काम लवकर केले जाईल, हे निश्‍चित. काही वर्षांत उद्‌घाटनाची संधी मिळेल, असा विश्‍वास मंत्री प्रभू यांनी व्यक्त केला.

वर्षांत भुसावळ- मुंबई रेल्वे
यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण राज्यमंत्री तथा धुळे लोकसभेचे खासदार डॉ. सुभाष भामरे, नंदुरबारच्या खासदार डॉ. हीना गावित, खासदार ए. टी. पाटील, आमदार अनिल गोटे आदी लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, रेल्वे बोर्डाचे अधिकारी शर्मा यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचनांवर कार्यवाही होईल. रेल्वे बोर्डाचे अधिकारी शर्मा यांनी खानदेशातून भुसावळ- मुंबई रेल्वे सेवा सुरू होण्यासंबंधी झालेली मागणी या वर्षात पूर्ण होणार असल्याची ग्वाही दिली. नंदुरबार, दोंडाईचा, नरडाणा, अमळनेर, भुसावळ, मुंबई, अशी ही रेल्वे सेवा खानदेशला उपयुक्त ठरू शकेल. त्यासाठी बांद्रा किंवा मुंबई- सेंट्रल हा थांबा असू शकेल.

रेल्वेसाठी आगामी नियोजन
पत्रकार परिषदेनंतर मंत्री प्रभू यांच्या हस्ते धुळे रेल्वे स्थानकावरून धुळे- पुणे रेल्वेच्या सुविधेचे उद्‌घाटन झाले. यात दोन बोग्या असतील. प्रतिसादानंतर त्या वाढविल्या जातील. या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमावेळी मंत्री प्रभू यांनी आगामी काळात रेल्वेच्या विद्युतीकरणावर भर देणे, गती वाढविण्यावर भर देणे, अधिक गर्दीच्या ठिकाणी ती विभागली जाण्यासाठी दुहेरी किंवा तिहेरी मार्गाची सुविधा निर्माण करणे, भारतीय बनावटीचे रेल्वे इंजिन फ्रान्सच्या मदतीने भारतातच तयार करण्यावर भर असेल, असे सांगितले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: dhule news manmad indore railway soon says suresh prabhu