कारागृहातील कैद्यांनी घेतली मुलांची गळाभेट

दिलीप कुऱ्हाडे
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

त्यांच्यामध्ये सुरू असलेला हळूवार संवाद ऐकू येत नसला तरी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, दु:ख, हास्यावरून अंदाज करता येत होता. 

येरवडा : येरवडा मध्यवर्ती कारागृहातील दोनशे कैद्यांनी दिवाळी निमित्त शनिवारी सकाळी आपल्या मुलांची गळाभेट घेऊन कौटुंबिक संवाद साधला. यावेळी कैद्यांना व त्यांच्या मुलांना आनंदाश्रू आवरता आले नाही. त्यांनी एकत्र केलेला दिवाळी फराळ हा त्यांच्या जीवनातील विस्मरणीय क्षण ठरला. 

शनिवारी सकाळी येरवडा मध्यवर्ती कारागृहात महिला तुरूंग रक्षकांच्या कडेवर लहान मुले दिसत होते. मुलांच्या निरागस चेहऱ्यावर थोडी भिती, आनंद, कुतूहल असे संमिश्र भाव दिसत होते. रक्षक सोळा वर्षांच्या आतील कैद्यांचे मुलांना कारागृहाच्या मनोरंजन सभागृहात घेऊन जात होते.
सभागृहात कैदी मुलांबरोबर संवाद करण्यात दंग होते. काहीजण मुलांसोबत फराळाचा आस्वाद घेत होते. तर काहीजण हास्यविनोद करताना दिसत होते. त्यांच्यामध्ये सुरू असलेला हळूवार संवाद ऐकू येत नसला तरी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, दु:ख, हास्यावरून अंदाज करता येत होता. 

कारागृहाचे अधिक्षक यु.टी.पवार कैद्यांना पाल्यांची भेट झाली का असे आस्थेपूर्वक विचारपूस करीत होते. तर उपअधिक्षक कौस्तुभ कुर्लेकर पाल्यांना फराळाची व्यवस्था करीत होते. कारागृह महानिरीक्षक भुषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पेनेतून कैद्यांची व त्यांच्या मुलांची ‘गळाभेट’ उपक्रम गेल्या वर्षी सुरू करण्यात आला. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे कैद्यांमध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांत सहाशे कैद्यांनी आपल्या पाल्यांची भेट घेतल्याची माहिती असल्याचे पवार यांनी सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :