BSE
BSE 
अर्थविश्व

शेअर बाजारातून अजूनही मोठ्या परताव्याची अपेक्षा 

किरण जाधव

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक- 'निफ्टी'ने काही दिवसांपूर्वी 10 हजार अंशाची पातळी पार केली. त्यानंतर मला खूप लोकांचे फोन आणि इमेल यायला सुरवात झाली. मी 'निफ्टी' 6000 च्या पातळीवर असतांनाच हा निर्देशांक खूप वर जाणार आहे, असे भाकीत 'सकाळ'च्या माध्यमातून आणि गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित 'इन्व्हेस्टर अवेअरनेस सेमिनार'मधून केले होते. त्यामुळे आता येणाऱ्या फोन आणि इमेलच्या चौकशीचा सूर हा 'लॉंग टर्मसाठी केलेल्या गुंतवणुकीमधून नफा घेऊन बाहेर पडावे का,' असा होता. यावर माझे ठाम उत्तर 'नाही' असे आहे. 

आता 'नाही' या उत्तरामागची कारणे समजून घेऊया. पण त्याआधी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे, की 'निफ्टी' रोजच वर चढत जाणार, असेही नाही. अधूनमधून 'करेक्‍शन' हे येतच राहणार आहे; पण सर्वसाधारण 'ट्रेंड' हा वरच जाणारा आहे. 

सुरवातीला माझ्या 25 वर्षांच्या अनुभवाने हे सांगावेसे वाटते, की जेव्हा शेअर बाजार 'टॉप'ला पोचतो, तेव्हा बाजारात खूप उत्साहाचे वातावरण असते आणि हा बाजार अजून खूप वर जाणार, अशी अपेक्षा गुंतवणूकदार करीत असतो. वेगवेगळ्या बिझनेस चॅनेलवरील गुंतवणूक सल्लागार अतिशय 'बुलिश' असतात आणि खूप वरच्या पातळीवरचे 'टार्गेट' देत असतात. पण सध्या ही परिस्थिती दिसत नाही. गुंतवणूकदार अजून संभ्रमावस्थेत आहेत आणि सल्लागार सावधानतेचा इशारा देत आहेत. नव्या खरेदीसाठी गुंतवणूकदार बाजार खाली येण्याची वाट पाहत आहेत. साधारणतः जेव्हा शेअर बाजार 'टॉप'ला येतो, तेव्हा अनेक कमी दर्जाचे 'आयपीओ' बाजारात येतात आणि मोठ्या प्रमाणात 'सबस्क्राईब' होतात. असा प्रकार किमान एक वर्ष तरी चालतो. अजून अशी परिस्थिती दिसत नाही. यावरून अनुभव असा सांगतो, की जेव्हा सगळे घाबरलेले असतात, तेव्हा आपण जोमाने खरेदी करायची असते आणि जेव्हा सगळे आक्रमकपणे खरेदी करतात, तेव्हा आपण सावधगिरी बाळगायला हवी. 

शेअर बाजार भविष्यकालीन घडामोडींचा आधीच मागोवा घेत असतो, म्हणून हुशार गुंतवणूकदार (ज्यांना मी 'मार्केट सायंटिस्ट' म्हणतो) अर्थव्यवस्थेचे 'री रेटिंग' बघत आहेत. म्हणजे सध्याच्या सरकारी धोरणांचा दूरगामी परिणाम आणि 'जीएसटी'मुळे देशाच्या 'जीडीपी'मध्ये होणारा सकारात्मक बदल या 'मार्केट सायंटिस्ट'ला कळतो आहे. म्हणूनच सध्याचा निर्देशांकाचा पीई रेशो आता ज्या उच्चांकी पातळीवर आहे, ती पातळी आता उच्चांकी न राहता साधारण पातळी होण्याच्या मार्गावर आहे आणि हे आपल्याला मानसिकरीत्या मान्य करावे लागणार आहे. 

सध्या सोने, रिअल इस्टेट आणि एफडी याकडे आता गुंतवणूकदार आकर्षित होताना दिसत नाहीत. यासाठी 'नोटाबंदी'चे आभार मानायला हवेत. गेल्या पाच वर्षांत सोन्याने काहीही परतावा दिलेला नाही. तसेच रिअल इस्टेट क्षेत्रदेखील सुस्तावले आहे. बॅंकेचे व्याजदरदेखील खाली जात आहेत. म्हणूनच या पर्यायांमधील पैसे आता शेअर बाजारात यायला सुरवात झाली आहे. 

कच्चे तेल हे आपल्या अर्थव्यवस्थेमधील महत्त्वाचा भाग आहे. पेट्रोल आणि डिझेल भावाच्या नव्या पद्धतीमुळे होणाऱ्या भाववाढीचा भार हा सरकारवर न येता ग्राहकांवर येत आहे. तसेच सोलर आणि इलेक्‍ट्रिक गाड्यांमुळे कच्च्या तेलाची मागणी कमी होत जाऊन त्याचा भाव येत्या 10 ते 12 वर्षांत साधारणपणे 15 ते 20 डॉलर प्रतिबॅरल होऊ शकतो. त्यामुळे चालू खात्यावरील तूट (कॅड) कमी होऊन पुढील दशकात हे खाते 'सरप्लस' होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

शेअर बाजाराच्या 'री रेटिंग'मागे अजून एक कारण असेही आहे, की 2008 आणि 2017 च्या विविध आकडेवारींमधील फरक. 2008 मधील महागाई दर 6 टक्‍क्‍यांच्या वर होता आणि आता तो 4 टक्के आहे. 2008 मध्ये ठेवींवरील व्याजदर वाढत होते आणि 2017 मध्ये व्याजदर घसरत आहेत. कंपन्यांचे उत्पन्न (कॉर्पोरेट अर्निंग्स) 2008 मध्ये मजबूत होते आणि आता ते खालच्या पातळीवरून वरच्या दिशेने जात आहे. तेव्हाचे सरकार हे आघाडीचे होते आणि आताचे सरकार स्वबळावर, सशक्त आहे. 

शेवटी मागणी आणि पुरवठा या तत्त्वावरच शेअर बाजार चालत असतो. प्रथम आपण परदेशी वित्तीय संस्थांची (एफआयआय) आकडेवारी पाहूया. 205 मध्ये 18,944 कोटींची विक्री झाली, 2016 मध्ये 16,838 कोटींची विक्री आणि या वर्षी मागच्या महिन्यापर्यंत 23,560 कोटी रुपयांची खरेदी 'एफआयआय'कडून झाली. त्याचबरोबर देशांतर्गत वित्तीय संस्थांची (डीआयआय) 2015 मध्ये 65871 कोटी, 2016 मध्ये 37,124 कोटी आणि गेल्या 3 ते 4 महिन्यांत 24,126 कोटी रुपयांची खरेदी झालेली आहे. ज्या प्रमाणात सामान्य गुंतवणूकदारांची म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक वाढत आहे, ते पाहता 'डीआयआय'चे खरेदीचे प्रमाण देखील अजून वाढणार आहे, असे वाटते. 

माझ्या मते, गुंतवणूकदारांनी पुढील 5 ते 7 वर्षांचा दृष्टिकोन ठेवून बाजारात गुंतवणूक केली पाहिजे आणि बाजाराच्या सध्याच्या पातळीपासूनसुद्धा मोठ्या परताव्याची अपेक्षा ठेवायला हरकत नाही. शेअर बाजाराची 'मेनिया फेज' आता तर चालू झाली आहे. शेअर बाजाराची एवढ्या मोठ्या प्रमाणातील घोडदौड ही कदाचित आपल्या आयुष्यातील सर्वांत मोठी घोडदौड असणार आहे. आपण सगळे नशीबवान आहोत, की आपण या संधीचे साक्षीदार ठरणार आहोत. योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक करून या संधीचा सर्वांनी लाभ घ्यायला हवा. 

हे सर्व ऐकल्यावर महत्त्वाचा प्रश्न असा येतो, की गुंतवणूकदारांनी आता नेमके काय करायला हवे? तर त्याचे उत्तर म्हणजे तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ तज्ज्ञांकडून 'रिस्ट्रक्‍चर' करून घेतला पाहिजे आणि खराब शेअर्स विकले पाहिजेत आणि ती गुंतवणूक चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये करायला हवी. 

(लेखक किरण जाधव अँड असोसिएट्‌सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. मात्र, शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय तज्ज्ञ सल्लागाराच्या मदतीने स्वतःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याने केलं सौमित्रला किडनॅप; 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नवा ट्विस्ट

Kalsubai Peak : आनंद महिंद्रांना देखील भावतोय महाराष्ट्राचा माऊंट एव्हरेस्ट, 'या' शिखराला कशी भेट द्यायची ?

T20 WC 24 Team India : भारतासाठी T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचा संघातून पत्ता कट?, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT