ganesh article

Ganesha Festival 2021 : पूजन आराध्य देवतेचे!

सकाळ वृत्तसेवा

गणपती विद्येची व सकल कलांची आराध्य देवता, गणांचा अधिपती म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. प्रतिवर्षी येणाऱ्या गणेशोत्सवाची प्रतीक्षा सर्व भक्त आतुरतेने करीत असतात. गणेशाची प्रतिष्ठापना आणि त्यामागील आशय समजून घेतल्यास या उत्सवाची खुमारी अधिकच वाढेल.

गणेश पुराण, मुद्‌गल पुराण यांसारख्या ग्रंथांमध्ये गणेश देवतेच्या आख्यायिका, पूजाविधी आपल्याला पाहायला मिळतात. व्रतराज, कृत्यकल्पतरू यासारख्या ग्रंथांनी विविध देवतांची व्रते सांगितली आहेत, त्यामध्ये गणेश व्रताचाही समावेश आहे. वस्तुत: भाद्रपद महिन्यात हरितालिका, गणेश स्थापना, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी अशी व्रते पाठोपाठ येतात. परंतु ही सर्व स्वतंत्र व्रते आहेत.

भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे व्रत हे ‘पार्थिव गणेश व्रत’ म्हणून प्रसिद्ध आहे. पार्थिव म्हणजे पृथ्वीतून आलेले. गाणपत्य संप्रदायाच्या उपासकाला विहित असे हे व्रत आहे. श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी या एका महिन्याच्या काळात करावयाचे हे व्रत आहे. उपासकाने दररोज नदीवर जाऊन स्नान करावे, त्यानंतर नदीकाठची माती घेऊन आपल्या तळहातावर आपल्या हाताच्या अंगठ्याएवढ्या आकाराची गणेशमूर्ती तयार करावी. अथर्वशीर्ष म्हणून तिची विधिवत् पूजा करावी आणि लगेच ती विसर्जन करावी. आता आपण या व्रताच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला मृण्मय मूर्तीची स्थापना व पूजा करतो. या व्रताची आख्यायिका अशी ः एक गरीब क्षत्रिय होता. त्याला कोणत्याच व्यवसायात यश येईना. कंटाळून तो रानात निघून गेला. तेथे त्याला सौभरी ऋषी भेटले. त्यांनी त्याला श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी या काळात गणेशाची आराधना करण्यास सांगितले. पुढील जन्मात तो क्षत्रिय; कर्दम ऋषी म्हणून जन्म पावला.

व्रतराज या ग्रंथात सांगितले आहे, की भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेशाची सुवर्णमूर्ती स्थापन करावी. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला वरद चतुर्थी, शिवा किंवा महासिद्धीविनायकी चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते. ज्ञान किंवा निर्वाण आय सिद्धीच्या प्राप्तीसाठी गणेशाचे पूजन करावे. या व्रताविषयी विविध आख्यायिका प्रचलित आहेत, असे दिसते. तथापि संघटनेचा अधिपती असलेल्या गणेशाचे पूजन आवर्जून करावे व त्यानिमित्ताने कुटुंब, समाज व राष्ट्राचेही संघटन बल वाढावे.

श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन, त्याची प्रतिष्ठापना, अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक असे या पूजेचे प्रामुख्याने स्वरूप असते. ‘पार्थिव’ संकल्पनेला अनुसरून आपण मातीची मूर्ती आणून तिची स्थापना करतो.

देवता विकास

काही अभ्यासकांच्या मते गणपती ही आर्येतर लोकांची देवता होती. ग्रामदेवता म्हणूनही तिचे पूजन केले जात असावे. गणांची अधिपती असलेली ही देवता संस्कृतीच्या ओघात वैदिक आर्यांनी स्वीकारली व तिला ‘गणानां त्वा गणपतिं हवामहे...’ असे म्हणत आपल्या धार्मिक जीवनात स्थान दिले असावे. ब्रह्मणस्पती या वैदिक देवतेला वाणीची देवता म्हणून ओळखले जाते. या देवतेचे पुराणकालातील विकसित रूप म्हणजे विद्या व कलांची देवता गणपती असेही काही अभ्यासक मानतात.

पूजाविधी

आपल्या आवडत्या पाहुण्याचे, गणेशाचे पूजन या दिवशी केले जाते. त्याला हात-पाय धुवायला पाणी, प्यायला पाणी, स्नानासाठी पाणी अर्पण केले जाते. पाच अमृत स्वरूपच जणू अशा आरोग्य हितकारक पंचामृताने देवाला स्नान घातले जाते. या निमित्ताने त्याचे तीर्थ म्हणून आपण पंचामृत घेतो.

अथर्वशीर्ष हे एक नव्य उपनिषद आहे. उपनिषद म्हणजे गुरूजवळ बसून परमार्थ विद्या समजून घेणे. सगुण साकार गणेशाच्या रूप वर्णन केल्यानंतर त्यांच्या आध्यात्मिक स्वरूपाचे वर्णन अथर्वशीर्ष करते. अथर्व म्हणजे स्थिर. मानवी बुद्धीला स्थिरता देणारे हे उपनिषद आहे म्हणून त्याचे पठन करण्याची परंपरा प्रचलित आहे.

गणेशाच्या मूर्तीत प्राणांची प्रतिष्ठापना करणे प्रचलित पूजाविधीमध्ये अपेक्षित आहे. गणपती ही संघटनेची देवता. तिच्या पूजेच्या निमित्ताने कुटुंब, समाज, राष्ट्र यांचे एकत्रीकरण व्हावे असे अपेक्षित आहे.

त्यामुळे गणेशाच्या मूर्तीची स्थापना व प्राणांची प्रतिष्ठा ही सामूहिक चैतन्याच्या शक्तीतून व्हावी हे औचित्यपूर्ण ठरावे. आपल्या प्रत्येकात एक चैतन्यशक्ती वास करते, जिच्यामुळे आपल्या प्राणांची धारणा होते. असे आपल्या सर्वांचे चैतन्य एकत्रित होऊन ते गणेशाच्या मृण्मय मूर्तीत प्रक्षेपित करावे व त्याद्वारे त्यामध्ये प्राणांची प्रतिष्ठापना व्हावी असे अपेक्षित आहे. चराचरात भरलेला सर्वव्यापी परमेश्वर माझ्यासाठी या मूर्तीतही येऊन निवास करतो आणि माझी पूजा गोड मानून घेतो ही भावनाच हृद्य आहे.

पत्रीतून निसर्गाशी जवळीक

देवतेला अर्पण केल्या जाणाऱ्या विविध पत्री या म्हणजे निसर्गाशी जवळीकच साधणे होय. पावसाळ्यात उपलब्ध असणाऱ्या या सर्व औषधी वनस्पतींचे शरीरोपयोगी गुणधर्म जाणून घेणे हे यामध्ये अपेक्षित आहे. अशा पत्री अर्पण करण्यासाठी अट्टाहास मात्र टाळावा, कारण या हेतूने ओरबाडून आणलेल्या पत्री पर्यावरणाचे नुकसान करीत आहेत, अशी काळजी पर्यावरण अभ्यासक नोंदवीत आहेत, त्यामुळे निसर्गाची जपणूक करत पत्री अर्पण करण्याची भूमिका ठेवावी.

मंत्र पुष्पांजली

आर्त भावनेने देवाला मारलेली हाक म्हणजे आरती. समूह भावनेने देवाची केलेली आळवणी ऐकून देव भक्ताच्या सद्‌भावपूर्ण कार्यात मदतीला येईलच, अशी भक्ताची धारणा असते. आरतीनंतर सामान्यतः मंत्रपुष्प वाहण्याची प्रथा आहे. पूजेत काही कमी-अधिक राहिले असेल तर त्याचे प्रतीक म्हणून अक्षता व फुले अर्पण केली जातात. त्यावेळी म्हटले जाणारे ‘ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवा:’ हे वैदिक परंपरेतील देवे मंत्रांमधील काही निवडक मंत्र आहेत. सार्वभौम राज्याची कामना या मंत्रांच्या माध्यमातून प्रकट केली आहे. तिचा मूळ अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. ऐतरेय ब्राह्मण हा ऋग्वेदाचा ब्राह्मणग्रंथ आहे. त्यामध्ये प्रजापतीने इंद्राला केलेला महाभिषेक आणि त्याचा विधी याचे सविस्तर वर्णन आलेले आहे. ते असे...

इंद्राचा सर्वतोपरी उत्कर्ष होण्यासाठी त्याच्या नावाचे, पराक्रमाचे व गुणांचे कौतुक सर्व देवांनी केले, उच्च स्वरात त्याचा जयघोष केला. यशाचे गान केले ते असे ः इंद्र हा साम्राज्याचे प्रवर्तन व संरक्षण करण्यास योग्य सम्राट आहे, (साम्राज्यं) सर्व प्रकारच्या उपभोगांचा भोक्ता व पालक आहे, (भौज्यं) स्वराज्याचा अधिकार चालविणारा विराट असा तो आहे. (स्वाराज्यं, वैराज्यं) असा तो इंद्र राजांचा पालक (माहाराज्यमाधीपत्यम) आहे. इंद्र हा पारमेष्ठ्यपदाचा पूर्ण अधिकारी आहे. (पारमेष्ठ्यं) इंद्र हा अखिल प्राणिजातीचा अधिपती, प्रजांचा भोक्ता, शत्रूंचा विदारक असुरांचा घातक, वेदांचे रक्षण करणारा आणि वेदोक्त धर्माचे पालन करणारा समुद्रवलयांकित पृथ्वीचा एकछत्री सम्राट आहे. देवांनी केलेल्या या स्तुतीने इंद्राला सर्व देवांचे श्रेष्ठत्व प्राप्त झाले. एखाद्या

राजाला असे पद प्राप्त करायचे असेल तर त्याच्या आचार्याने त्याच्यासाठी असा अभिषेक करावा. त्यापूर्वी राजाने शपथ घेऊन मला इंद्रासारखे पद प्राप्त व्हावे म्हणून प्रार्थना करावी असाही भाग सांगितलेला आहे. त्यानंतरच्या शेवटच्या मंत्रात उल्लेख आलेला मरुत हा अविक्षित याचा पुत्र असून एक राजर्षी होता. त्याच्या घरी देव पाहुणे म्हणून राहिले होते, अशा आशयाने या मंत्र समूहाची सांगता होते.

पूजेची तयारी

आपल्या इष्टदेवतेची प्रार्थना करून व नित्य उपासना करून फुले, दूर्वा, पंचामृत, नैवेद्य इत्यादी तयारीस लागावे. निरांजनात फुलवाती व तूप घालून ठेवावे. विड्याची पाने, पत्री, हार, मुकुट, फळे काढून ठेवावी. दूर्वांच्या 21-21 च्या 2-3 तरी जुड्या करून ठेवाव्यात. आणखी काही दूर्वा न मोजता पण निवडून पूजेकरिता वेगळ्या ठेवाव्यात. गंध उगाळून ठेवायचे असल्यास स्वतः उगाळून ठेवावे, अन्यथा चंदन पावडरचाही वापर करता येईल. पंचामृत एकत्र किंवा वेगवेगळे ठेवावे. गूळखोबरे वाटीत ठेवावे. पेढे, बर्फी, मिठाई इत्यादी नैवेद्य खोक्‍यात न ठेवता वाट्यांत ठेवावा.

'तनिष्क’चे खास पेंडंट्स

अशी ही प्रत्येकाला जवळची असलेली देवता कायम आपल्यासोबत असावी, असे वाटत असते. हीच भावना लक्षात घेत ‘तनिष्क’ने खास पेंडंट्स घडवली आहेत. प्रथमेश्‍व, म्हणजे आद्यदेवतेचे रूप असलेल्या या पेंडंटमध्ये पुढील बाजूस गणेशाचे रूप आणि गणेश मंत्र कोरलेला आहे, तर मागील बाजूस मूलधारा आहे, जी सकारात्मक ऊर्जा प्रसृत करते. गणपती ही समृद्धीची देवता आहे, हेच प्रतीक एकदंत या हिरेजडित पेंडंटमध्ये समाविष्ट आहे. या पेंडंटच्या पुढील बाजूस नॅनो चिपमध्ये गणेशस्तोत्र कोरले आहे, तर मागील बाजूस कमळचिन्ह आहे. तिसरे पेंडंट आहे अविघ्न म्हणजेच विघ्नहर्ता. जुईच्या फुलांच्या पाकळ्यांमध्ये विसावलेला हा बालगणेश खूपच गोड दिसतो. चौथ्या पेंडंटचं नाव आहे गणपती, म्हणजे सर्वांचा रक्षणकर्ता. ‘गणपती बाप्पा मोरया’ची आरोळी ऐकू आली, तरी अंगात एक प्रकारची ऊर्जा संचारते. या पेंडंटलाही गणेशाचा आकार आहे आणि हिऱ्यांमध्ये ‘बाप्पा मोरया’ हे शब्द जडवले आहेत. पाचवे पेडंट म्हणजे मंगलमूर्ती, म्हणजे जो सगळ्यांचे भले करतो. या पेंडंटमध्ये पुढील बाजूस पिंपळाच्या पानावर ‘श्री’ कोरला आहे आणि मागील बाजूस नाजूक पिंपळपानाची छबी आहे. सहावे पेंडंट आहे विनायक, म्हणजे सर्वांचा स्वामी किंवा नायक. प्लॅटिनम आणि सोन्यामध्ये जडवलेले गजवदन फारच सुंदर दिसते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘तनिष्क’ने खास महाराष्ट्रासाठी ऑफर देऊ केली आहे. या ऑफरमध्ये सोन्याच्या आणि हिऱ्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २५ टक्क्यांपर्यंत सूट दिली आहे.

गणपतीची अनेक रूपे

गणपती एकच असला तरी त्याची रूपे अनेक आहेत, कुणाला बालगणेशाचे रूप आवडते, तर कुणाला सिंहासनावर बसलेला गणपती प्रिय असतो, कुणाच्या घरी ‘गरुडावर बैसोनी’ गणेश येतो, तर कुणाला फेटा घातलेला गणपती अधिक भावतो. गणपती हा सुखकर्ता असतो, दुःखहर्ता असतो, वक्रतुंड असतो, विनायक असतो, मोरया असतो, भालचंद्र असतो... नाव कोणतेही असो आणि मूर्ती कोणत्याही रूपात असू दे... गणपतीकडे कितीही वेळ पाहत राहिलं तरी समाधान होत नाही. जवळपास प्रत्येक जण गणपतीशी जणू संवाद साधत असतो. आपल्या मनातल्या गोष्टी सांगत असतो. गणपतीही आपल्याशी बोलतोय असंच प्रत्येकाला वाटत असतं.

श्री गणेशाय नमः

गणपती म्हणजे बुद्धीची देवता. गणपती १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात गणेशाच्या पूजनाने होते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी, म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी महाराष्ट्रातल्या घराघरांत गणपतीचं आगमन होते. वर्षातून एकदा हा पाहुणा मुक्कामास येतो. काहींच्या घरी दीड दिवस, काहींच्या घरी पाच दिवस, काहींच्या घरी सात दिवस तर काहींच्या घरी ११ दिवस गणेशाचा मुक्काम असतो. चुतर्थीपासून चतुर्दशीपर्यंत सगळ्या महाराष्ट्रात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होतो. गणपती येणार याची चाहूल आणि वेध श्रावणातच लागलेले असतात. घर सजू लागते, मखर करण्यासाठी घरातले लहान-थोर सरसावतात, गणपतीचा आवडता नैवेद्य, म्हणजे मोदकाची तयारी सुरू होते आणि प्रत्यक्ष गणेशोत्सवात तर आनंदाला उधाण येते. वर्षातून एकदा येणाऱ्या या पाहुण्याचा पाहुणचार किती करू आणि किती नको, असे होऊन जाते. या निमित्ताने आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतात. गणपतीच्या दर्शनाने घर आणि मन दोन्ही प्रसन्न होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT