पुरुषही लैंगिक अत्याचाराचे बळी- राधिका आपटे

वृत्तसंस्था
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

केवळ महिलाच नव्हे तर पुरुष देखील लैंगिक अत्याचाराला बळी पडतात. विशेषतः चित्रपट सृष्टीत याचे वाढते प्रमाण याविषयी मी बोलत आहे. अनेक पुरुषांनाही अशा अत्याचाराला सामोरे जावे लागले आहे, त्यामुळे या मुद्द्यावर बोलल्या गेले पाहीजे. - राधिका आपटे

मुंबई- चित्रपट क्षेत्रात लैंगिक अत्याचार केवळ महिलांपुरताच मर्यादित नाही तर पुरुषही याला बळी पडतात, असा खुलासा अभिनेत्री राधिका आपटे हिने केला आहे. या क्षेत्रात लैंगिक अत्याचार सहन करावा लागलेले असे अनेक पुरुष आपल्याला माहीत असल्याचेही राधिकाने म्हटले आहे.

नुकताच, हॉलिवूड मधील 'हार्वे विन्स्टेन स्कॅन्डल' उघड झाल्यापासून चित्रपटसष्टीत होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचा मुद्दा प्रकाश झोतात आला आहे. केवीन स्पेसी, जेम्स टोबाक, ब्रेट रेटनर आणि इतरही काही नावं असे दुष्कृत्य करणाऱ्यांमध्ये पुढे आली आहेत.

बॉलिवूडमध्ये अभिनेता इरफान खान हा लैंगिक अत्याचाराच्या मुद्द्यावर बोलणारा आणि प्रत्यक्षात याबाबतीत स्वतःचा अनुभव सांगणारा पहिला अभिनेता होता. इंडस्ट्रीमधील त्याच्या खडतर दिवसांमध्ये त्याला तडजोड करण्यास सांगण्यात आले होते.  राधिका या मुद्द्यावर बोलताना म्हणाली, "जास्तीत जास्त महिला लैंगिक अत्याचाराविषयी खुलेपणाने बोलताना दिसतात. या विषयावर बोलता यावे यासाठी योग्य व्यासपीठ असावे. जेणेकरुन लैंगिक अत्याचाराविरोधात तक्रारी नोंदविता येतील. केवळ महिलाच नव्हे तर पुरुष देखील लैंगिक अत्याचाराला बळी पडतात. विशेषतः चित्रपट सृष्टीत याचे वाढते प्रमाण याविषयी मी बोलत आहे. अनेक पुरुषांनाही अशा अत्याचाराला सामोरे जावे लागले आहे, त्यामुळे या मुद्द्यावर बोलले गेले पाहिजे," असे मत राधिकाने  एका मुलाखतीत व्यक्त केले. 

चित्रपटसृष्टीत इतर क्षेत्रांपेक्षा अधिक खुल्या विचारांचे लोक असतात. जे लोक दुसऱ्यांचा छळ करतात वा गैरफायदा घेतात त्यांना समोर आणण्याची आणि कामाच्या बाबतीत पारदर्शकता ठेवण्याची गरज असल्याचेही राधिका म्हणाली.  

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

   

Web Title: marathi news sexual abuse in film industry radhika apte