उपराष्ट्रपती निवडणूक- गोपूमामा तुम्ही चुकलात! गोपाळकृष्ण गांधींना भाच्याचे पत्र

वृत्तसंस्था
सोमवार, 31 जुलै 2017

देशावर घराणेशाही लादणाऱ्या कॉंग्रेसप्रणीत आघाडीचे गोपाळकृष्ण गांधी हे उमेदवार झाल्याचे पाहून दु:ख होते, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

नवी दिल्ली : विरोधी पक्षांचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांच्या उमेदवारीस त्यांच्या घरातून विरोध होताना दिसतो. गांधी यांचे भाचे श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी लिहिलेल्या खुल्या पत्रामध्ये नेहरू आणि गांधी कुटुंबाच्या घराणेशाहीवर कठोर शब्दांत ताशेरे ओढत आपल्या मामांनी विरोधकांची उमेदवारी स्वीकारायला नको होती, असे मत मांडले आहे.

देशावर घराणेशाही लादणाऱ्या कॉंग्रेसप्रणीत आघाडीचे गोपाळकृष्ण गांधी हे उमेदवार झाल्याचे पाहून दु:ख होते, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. कॉंग्रेसच्या विद्यमान अध्यक्ष मागील अठरा वर्षांपासून त्या पदावर आहेत, पुढे त्यांचा मुलगा या पक्षाचा अध्यक्ष होईल. अशा पक्षाकडून आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे पाहून मला दु:ख होते, असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षांची उमेदवारी स्वीकारून आपण महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर या दोहोंच्या तत्त्वांना हरताळ फासल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

वंशवादाला पाठिंबा देणाऱ्या पक्षाकडून तुम्ही उमेदवारी स्वीकारल्याने मी निराश झालो आहे, "यूपीए'च्या काळात कॉंग्रेस पक्षाकडून एवढे गैरव्यवहार झाले, पण आपण त्यावर एक चकार शब्दही का काढला नाहीत? असा सवाल कुलकर्णी यांनी केला आहे. महात्मा गांधी यांच्या मोठ्या कुटुंबाचा एक छोटा सदस्य म्हणून मी माझा विरोध नोंदविला आहे. मला माफ करा गोपूमामा; पण तुमच्या कृत्यावर माझा तरी विश्‍वास नाही. हा तर उघड विश्‍वासघात आहे, असेही कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: vice president election gopalkrishna gandhi nephew's protest letter