राजस्थान ते अमेरिकेतील राजकारणापर्यंत दिवसभरातील देश-विदेशच्या महत्वाच्या बातम्या

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 12 August 2020

भारतात सलग आठव्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या अमेरिका आणि ब्राझिल या देशांपेक्षा अधिक आढळली आहे. दुसरीकडे राजस्थानमधील राजकीयनाट्य संपल्याचं दिसत आहे.

भारतात सलग आठव्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या अमेरिका आणि ब्राझिल या देशांपेक्षा अधिक आढळली आहे. दुसरीकडे राजस्थानमधील राजकीयनाट्य संपल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माफी मागितली आहे. अमेरिकेमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जो बायडेन यांनी उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचं नाव घोषीत केलं आहे. 

राजस्थान राजकीय संघर्ष; गेहलोतांनी मागितली माफी

राजस्थानमध्ये  गेल्या अनेक दिवसांपासून चालत असलेला राजकीय संघर्ष काही केल्या शमण्याचे नाव घेत नव्हता. मात्र, आता तो शांत झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सचिन पायलट (Sachin Pilot) आणि अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या गोटातील आमदारांच्या झालेल्या एकत्रित बैठकीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माफी मागितली आहे. तर पायलट समर्थक आमदारांनी कसोटी सामना अखेर रद्द झाल्याचे सांगितले. सविस्तर बातमी-

खऱ्या भारताचे दर्शन! मंदिराच्या रक्षणासाठी मुस्लिम तरुणांनी तयार केली साखळी

बेंगलुरुचे काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्ती यांचा भाचा पी नवीन याने सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या प्रकरणात संतप्त जमावाने मूर्ती यांच्या  घराची तोडफोड केली. यावेळी जाळपोळही करण्यात आली. मूर्ती यांच्या घराच्या समोर एक हनुमानाचे मंदिर आहे. मुस्लीम युवकांनी साखळी बनवून या मदिराला वाचवण्याचे काम केले आहे.  मुस्लीम तरुणांच्या या प्रयत्नांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  सविस्तर बातमी-

प्रणव मुखर्जींबद्दल मुलीची भावनिक पोस्ट; जे होईल ते स्वीकारण्याची शक्ती ईश्वर देईल 

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती अद्याप गंभीरच असल्याची माहिती आर्मी रिसर्च ॲंड रेफरल हॉस्पिटलने दिली. मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी हिने ट्विटरवर पित्याबद्दल भावनिक पोस्ट लिहिली. ईश्वर त्यांच्यासाठी सर्वोत्तम मार्ग निवडेल आणि जे काही पुढे होईल, त्याचा स्वीकार करण्याची शक्ती देईल, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  सविस्तर बातमी-

सलग आठव्या दिवशी देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा अमेरिका, ब्राझीलपेक्षाही अधिक

जगभरासह भारतात कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहे. दररोज वाढणारा कोरोनाच्या रुग्णांचा आकडा सरकारची डोकेदुखी वाढवत आहे. काळजीत भर घालणारी बाब म्हणजे भारतात मंगळवारी कोरोनाचे तब्बल 60,963 नवीन रुग्ण सापडले आहेत. हा सलग आठवा दिवस आहे, जेंव्हा अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा ही वाढ अधिक आहे.  तसेच मागील 24 तासांत 834 लोकांचा कोरोनामुळे मृत्य झाला आहे. सविस्तर बातमी-

रशियाची कोरोनावरील लस लाखो लोकांना देणं घातक; वाचा जगभरातील देशांच्या प्रतिक्रिया 

 रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी जगातील पहिली कोरोनावरील लस तयार केल्याची घोषणा केली.  त्यांच्या या घोषणेनंतर जगभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक देशांनी रशियाच्या लसीबाबत सांशकता व्यक्त केली आहे. तर काही देशांनी रशियाच्या लसीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर बातमी-

भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्यावर डोनाल्ड ट्रम्प यांची टीका; सर्वांत 'धोकादायक सिनेट सदस्य'

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (president donald trump) यांनी भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक कमला हॅरिस (Kamala Harris) यांना सिनेटमधील सर्वात भीतीदायक सदस्य म्हटलं आहे. तसेच डेमोक्रेटिक पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जो बायडेन (Joe Biden) यांनी उपराष्ट्रपती (Vice President)  पदासाठी हॅरिस यांना निवडल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सविस्तर बातमी-

'आई कोण होती समजल्याशिवाय तुम्हाला कमला हॅरिस कळणार नाही', बहिणीने केली भावूक पोस्ट

डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जो बायडेन यांनी उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचं नाव घोषीत करताच इतिहास रचला गेला आहे. पहिल्यांदाच अमेरिकेतील एका मोठ्या पक्षाने उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून पहिल्या आशियाई आणि कृष्णवर्णीय महिलेला निवडलं आहे. कमला यांच्या नावाची घोषणा होताच काही तासातच त्यांच्या भगिनी माया हॅरिस यांनी एक भावूक  व्हिडिओ ट्विट केला आहे. सविस्तर बातमी-

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajasthan ashok gehlot kamla harris us election russia corona viris vaccine pranav mukharji 12 august