सीबीआय चौकशी ते ट्रम्प यांची माफी; वाचा दिवसभरातील देश-विदेशच्या 7 महत्वाच्या बातम्या 

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 19 August 2020

दिवसभरात देश-विदेशात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत

सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह राजपूत मृत्यूसंदर्भातील चौकशी सीबीआयकडे वळवली आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आतड्यांना संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती आणखीनच खालावली आहे. विदेशात माली देशात सैन्याचा सशस्त्र उठाव झाला आहे. बंडखोरांनी अध्यक्षांसह पंतप्रधानांना ताब्यात घेतले आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एका महिलेची माफी मागितली आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे : सर्वोच्च न्यायालय

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसंदर्भात निर्माण झालेला तेढ सोडवण्याच काम आता सीबीआय करणार आहे. रिया चक्रवर्तीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज न्यायालयाने निकाल दिला. यात सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआय करेल, असे आदेश न्यायालयाने दिले. सुशांत सिंह राजपूतचे वडील कृष्ण किशोर सिंह यांनी पटनामध्ये  दाखल केलेला गुन्हा योग्य असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी सर्व पुरावे सीबीआयकडे सुपूर्द करावे आणि तपासात सहकार्य करावे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. सविस्तर बातमी-

प्रणव मुखर्जींची प्रकृती खालावली; रुग्णालयाने दिली माहिती

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आतड्यांना संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती आणखीनच खालावली असल्याची माहिती लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल रुग्णालयाने दिली. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर मुखर्जी यांना १० ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून ते जीवरक्षक प्रणालीवर आहेत. अर्थात, उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांचे पुत्र आणि माजी खासदार अभिजीत बॅनर्जी यांनी दिली. रुग्णालयात दाखल झाल्याच्या दिवशीच त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून ते कोमात आहेत. सविस्तर बातमी-

स्टरलाइट प्रकल्प बंदच राहणार; मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय

वेदांता लिमिटेड कंपनीला मद्रास उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला. कंपनीचा तमिळनाडूतील तुतीकोरिन येथील स्टरलाइट तांब्याचा प्रकल्प बंद ठेवण्याचा पूर्वीचा आदेश न्यायालयाने मंगळवारी कायम ठेवला. हा निर्णय म्हणजे तमिळनाडू सरकार आणि तेथील जनतेचा मोठा विजय मानला जात आहे. हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची कंपनीची फेरविचार याचिका न्यायालयाने फेटाळली.  सविस्तर बातमी-

रिया चक्रवर्तीची काढली 'लायकी'; बिहारच्या पोलिस महासंचालकांचं वक्तव्य

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्युप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने रिया चक्रवर्तीची मुंबई पोलिसांकडे गुन्हा स्थांनातरित करण्याची मागणी फेटाळून लावत बिहार सरकारने केलेली सीबीआय चौकशीची मागणी मान्य केली. दरम्यान, बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी न्यायालयाचा निकाल हा न्याय आणि लोकशाहीचा विजय असल्याचे पत्रकार परिषदेत म्हटले आहे. सविस्तर बातमी-

चीनची कोविड-19 लस डिसेंबरपर्यंत येणार बाजारात; भारताला मिळणार का?

कोरोना विषाणूवरील लस (corona virus vaccine) डिसेंबरपर्यंत  बाजारात येईल, असा दावा चीनने केला आहे. कोरोनावरीस लस तयार करणारी चीनची सरकारी कंपनी सिनोफार्मने Sinopharm कोविड लशीची किंमतही जाहीर केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चीनच्या कोविड लशीची किंमत जवळजवळ 130 डॉलर (9700 रुपये) असणार आहे. चीनची लस बाजारात लवकरच येणार आहे, पण लडाखमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताला ही लस मिळेल का, याबाबत शंका आहे. सविस्तर बातमी-

मालीमध्ये सैन्याचा सशस्त्र उठाव; बंडखोरांनी अध्यक्षांसह पंतप्रधानांना घेतले ताब्यात 

मालीत नाट्यमय घडामोडीनंतर देशाचे अध्यक्ष इब्राहिम बाऊबकर केईटा यांनी मंगळवारी (ता. १८) रात्री उशिरा राजीनामा दिला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्याविरुध्द आंदोलन सुरू होते. सशस्त्र जवानांनी घराला वेढा घातल्यानंतर काही तासांतच केईटांनी अध्यक्षपद सोडले. त्यानंतर, सरकारविरोधी आंदोलकांनी एकच जल्लोष केला. सविस्तर बातमी-

डोनाल्ड ट्रम्प यांनी महिलेची मागितली माफी; मतांसाठी नवी चाल

अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला आता वेग मिळाला आहे. फेरनिवडीसाठी रिंगणात उतरलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी जवळपास दीडशे वर्षांपूर्वी मतदानाद्वारे बंड केलेल्या तसेच तुरुंगवास सोसलेल्या महिला समाजसुधारक सुझन बी. अँथनी यांची माफी मागितली आहे. सविस्तर बातमी-

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shushan singh rajput sc pranav mukharjee sc police corona vaccine china donald trump 19 august