FlashBack 2019 : 'या' दहा नावांनी ढवळून काढलं महाराष्ट्राचं राजकारण

अशोक गव्हाणे
Thursday, 26 December 2019

महाराष्ट्राचं राजकारण तसं पाहिल्यास प्रत्येकवेळी हे गरमागरमच असतं. परंतु, यावर्षी म्हणजेच २०१९ या वर्षात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे ते चांगलेच तापले होते. त्यात सांगली सातारा जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि अन्य गोष्टींवरून तर अधिकच आरोपांच्या फैरी झडलेल्या पाहायला मिळाल्या. त्यातही काही ठराविक नेत्यांनी मात्र, आपली बाजू लावून धरत अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला.

फ्लॅशबॅक 2019 : महाराष्ट्राचं राजकारण तसं पाहिल्यास प्रत्येकवेळी हे गरमागरमच असतं. परंतु, यावर्षी म्हणजेच २०१९ या वर्षात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे ते चांगलेच तापले होते. त्यात सांगली सातारा जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि अन्य गोष्टींवरून तर अधिकच आरोपांच्या फैरी झडलेल्या पाहायला मिळाल्या. त्यातही काही ठराविक नेत्यांनी मात्र, आपली बाजू लावून धरत अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१) शरद पवार : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी २०१९ या वर्षात महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच ढवळून काढले. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीत केवळ ४ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतरही त्यांनी तुफानी दौरे आणि प्रचार आणि करत विधानसभा निवडणुकीत मोठे यश खेचून आणले. पक्षाला विधानसभा निवडणुकीत २०१४ पेक्षा जवळपास १० जागा जास्त मिळवून दिल्या. २०१९ मथ्ये राष्ट्रवादीला एकूण ५४ जागा मिळाल्या. ईडीच्या आलेल्या पत्रानंतर शरद पवार यांनी ईडी कार्यलयाला भेट देण्याचे ठरवलेली गोष्ट आणि साताऱ्याच्या सभेत त्यांनी भर पावसात केलेले भाषण यावर्षीच्या या दोन गोष्टी महाराष्ट्राच्या कायम स्मरणात राहतील. 

पुणे : मिलिटरी इंजिनरीगमध्ये अपघात; दोन जवानांचा मृत्यू

२) उद्धव ठाकरे : शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही २०१९ या वर्षात चांगलेच चर्चेत राहिले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी चांगल्याच प्रचारसभा गाजवल्या. शिवाय त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत १८ जागांवर यश मिळाले. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपबरोबर युती केली परंतु, निवडणुकीनंतर सत्तेच्या समसमान वाटपाच्या मुद्द्यांवरुन त्यांनी ही युती तोडत काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले. 

३) देवेंद्र फडणवीस : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस २०१९ च्या वर्षात चांगलेच राजकीय प्रकाशझोतात राहिले. पाच वर्ष कार्यकाळ पुर्ण करणारे दुसरे मुखमंत्री म्हणून बिरुद मिरवल्यावर पुन्हा मुख्यमंत्री होत केवळ तीन दिवसांत राजीनामा देण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. मी पुन्हा येईन हे त्यांचे वाक्य यावर्षी नेटीझन्सनी अक्षरश: डोक्यावर घेतले. यावरून त्यांना ट्रोलही करण्यात आले.  

४) संजय राऊत : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी २०१९ चे वर्ष चांगलेच गाजवले. भाजपसोबत असलेली युती तोडत आघाडीसोबत सरकार स्थापन करण्यात संजय राऊत यांनी मोठी भूमिका बजाबली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असल्याचे सांगत होते आणि त्यांनी ते खरे करून दाखवले. 

५) अजित पवार : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा तडकाफडकी दिलेला राजीनामा यावर्षी चांगलाच चर्चेत राहिला. त्यानंतर त्यांनी एका रात्रीत भाजपसोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. हे सरकार केवळ तीन दिवसच टिकू शकले. त्यानंतर अजित पवार यांनी राजीनामा दिला होता.  

६) राज ठाकरे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत एका वेगळ्याच स्टाईलने केलेला प्रचार चर्चेचा विषय ठरला. व्हिडिओ दाखवत त्यांनी लोकसभेच्या प्रचारात रंगत आणली होती. त्यानंतर त्यांच्याही मागे ईडीची चौकशी लागली होती. विधानसभा निवडणुकीत तर त्यांनी सत्तेत नाही तर विरोधी पक्षात बसण्याची संधी द्या अशी मागणी मतदारांना केली होती.

७) चंद्रकांत पाटील : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे खरे यावर्षी त्यांनी पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघातून लढविलेल्या निवडणुकीमुळे चांगलेच चर्चेत आले. तसेच गिरीश बापट हे खासदारपदी नियुक्त झाल्यावर त्यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदीही वर्णी लागली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर केलेल्या थेट टीकेमुळेही ते चर्चेत राहिले.  

८) धनंजय मुंडे : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे माजी विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे हे त्यांच्या भगिणी पंकजा मुंडे यांच्यासोबत असलेल्या कलहामुळे २०१९ या वर्षात जास्त चर्चेत राहिले. धनंजय मुंडे यांनी विरोधीपक्षनेते म्हणूनही चांगले काम केले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे यांच्याविरोधातील एका व्हिडिओवरून चांगलाच वाद झाला होता. 

९) पंकजा मुंडे : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्यासोबत असलेल्या वादामुळे तर चर्चेत राहिल्याच शिवाय त्यांची पक्षात अंतर्गत नाराजीही होती. पक्षात त्यांना डावललं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही करण्यात आला. परळी विधानसभा मतदारसंघात झालेला पराभव त्यांच्या खूप जिव्हारी लागला असल्याचे बोलले जाते.

१०) अशोक चव्हाण : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेड लोकसभा मतदारसंघात झालेला पराभव यावर्षी चांगलाच चर्चेचा विषय बनला. कारण, २०१४ च्या मोदी लाटेतही अशोक चव्हाण प्रचंड मतांनी विजयी झाले होते. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी जोर लावूनही पराभवला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाचादेखिल राजीनामा द्यावा लागला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FlashBack 2019 This ten names in the politics of Maharashtra were discussed in 2019