कर्नल पुरोहित नऊ वर्षांनी कारागृहाबाहेर

वृत्तसंस्था
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

मला लष्कराचा गणवेश घालण्याची इच्छा असून मी कधी लष्करात दाखल होईल, याची उत्सुकता लागली आहे,' असे पुरोहित सत्र न्यायालयाबाहेर बोलताना म्हणाले. मला दोन कुटुंबे आहेत पहिले म्हणजे माझे कुटुंब आणि दुसरे म्हणजे लष्कर. या वेळी पुरोहित यांनी कायदेशीर लढाईत मदत केल्याबद्दल पत्नीचे आभार मानले. 

मुंबई : 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर लेप्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित हे आज (बुधवार) नऊ वर्षांनी कारागृहाबाहेर पडले. नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून त्यांची सुटका करण्यात आली.

प्रसाद पुरोहित यांनी लवकरात लवकर लष्करात रुजू होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांना घेण्यासाठी लष्कराची वाहने व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. ते मुळचे पुण्याचे रहिवाशी आहेत. मंगळवारी एनआयएच्या विशेष न्यायालयाने औपचारिकता पूर्ण केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तुरुंगातून सोडण्याचे आदेश देण्यात आले. सुमारे नऊ वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर पुरोहित तुरुंगाबाहेर आले.

मला लष्कराचा गणवेश घालण्याची इच्छा असून मी कधी लष्करात दाखल होईल, याची उत्सुकता लागली आहे,' असे पुरोहित सत्र न्यायालयाबाहेर बोलताना म्हणाले. मला दोन कुटुंबे आहेत पहिले म्हणजे माझे कुटुंब आणि दुसरे म्हणजे लष्कर. या वेळी पुरोहित यांनी कायदेशीर लढाईत मदत केल्याबद्दल पत्नीचे आभार मानले. 

लेफ्टनंट कर्नल पुरोहित : अटक ते कारागृहाबाहेर 
मालेगाव (जि. नाशिक) येथे 2008 मध्ये झालेल्या बॉंबस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित (निवृत्त) याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. याआधी या प्रकरणातील आणखी एक आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह हिला जामीन मंजूर झाला आहे. लेफ्टनंट कर्नल पुरोहितवर खून, घातक शस्त्रांद्वारे गंभीर इजा पोचवणे, धर्म, वंश, जन्म ठिकाण, भाषा यांच्या आधारे दोन गटांत तेढ निर्माण करणे असे आरोप होते, त्याच्यावर शस्त्रास्त्र कायदा, भारतीय स्फोटक पदार्थ कायदा यांच्या अन्वये गुन्हा दाखल होता. 

कारवाईचा घटनाक्रम :
- 29 सप्टेंबर 2008 - मालेगावमधील वर्दळीच्या भागातील स्फोटात किमान सात जण ठार आणि सत्तर जखमी 
- 24 ऑक्‍टोबर 2008 - मालेगाव स्फोटप्रकरणी पोलिसांकडून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, शिवनारायण गोपालसिंह कलासंग्रह आणि शाम भवरलाल साहू या तिघांना अटक 
- 4 नोव्हेंबर 2008 - जम्मू- काश्‍मीरमध्ये विविध छाप्यांत ताब्यात घेतलेले आरडीएक्‍स वापरल्याबद्दल; तसेच पैसे पुरवल्याबद्दल महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाकडून लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित याला अटक. 
- 20 जानेवारी 2009 आणि 21 एप्रिल 2011 - या दोन्हीही दिवशी "एटीएस'कडून मुंबईतील मोक्का न्यायालयासमोर प्रज्ञासिंह ठाकूर, मेजर रमेश उपाध्याय, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, समीर कुलकर्णी, राकेश धावडे, सुधाकर द्विवेदी ऊर्फ दयानंद पांडे, सुधाकर चतुर्वेदी, प्रवीण टकलाकी अशा चौदा जणांविरोधात आरोपपत्र दाखल. 
- 31 जुलै 2009 - मालेगावातील स्फोट, समझोता एक्‍स्प्रेस आणि गुजरातेतील मोडासा स्फोट या प्रकरणांमध्येही प्रज्ञासिंहचा सहभाग उघड झाल्यानंतर संघटित गुन्हेगारीचा आरोप ठेवला. मात्र नंतर आरोपींवरील मोक्काअंतर्गत आरोप मागे घेण्यात आला. 
- 13 एप्रिल 2011 - तपासाची सूत्रे राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए), केंद्रीय गृह मंत्रालयाची "एनआयए'ला तशी सूचना 
- ऑगस्ट 2013 - "एनआयए'ची संशयित आरोपींना क्‍लीन चीट 
- 15 एप्रिल 2015 - विविध घटनांतील सहभागांबाबत अल्प पुरावे असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने "मोक्का' लावण्यास दिलेली परवानगी सर्वोच्च न्यायालयाने नाकारली. खटल्याच्या खास सुनावणीचे न्यायालयाकडून आदेश. 
- 2 फेब्रुवारी 2016 - मालेगावातील स्फोटाप्रकरणी "मोक्का' लावता येत नाही, असा "एनआयए'चा अभिप्राय 
- 25 एप्रिल 2016 - "एनआयए'ने नऊ जणांविरोधात पुरावे नसल्याचे सांगितल्यानंतर मोक्का न्यायालयाकडून त्यांची मुक्तता 
- 13 मे 2016 - "एनआयए'कडून दुसरे आरोपपत्र दाखल, त्यात प्रज्ञासिंहसह तिघांविरोधात पुरेसे पुरावे नसल्याचे नमूद; मात्र लेफ्टनंट कर्नल पुरोहित आणि इतरांवरील आरोप कायम 
- 26 सप्टेंबर 2016 - राष्ट्रीय तपास यंत्रणा न्यायालयाने लेफ्टनंट कर्नल पुरोहितला जामीन नाकारला 
- 17 एप्रिल 2017 - लेफ्टनंट कर्नल पुरोहितविरोधात आरोपपत्र दाखल केल्यामुळे त्याच्या जामिनाला विरोध नाही, असे "एनआयए'चे सर्वोच्च न्यायालयात निवेदन 
- 25 एप्रिल 2017 - साक्षीदारांवर कोणताही प्रभाव टाकणार नाही, अशा हमीनंतर तुरुंगात आठ वर्षे, सहा महिने आणि दोन दिवस घालवल्यानंतर साध्वी प्रज्ञासिंहला उच्च न्यायालयाकडून जामीन. कर्नल पुरोहितला जामीन नाकारला 
- 17 ऑगस्ट 2017 - लेफ्टनंट कर्नल पुरोहितच्या अंतरिम जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला 
- 21 ऑगस्ट 2017 - सर्वोच्च न्यायालयाकडून लेफ्टनंट कर्नल पुरोहितला शर्तीसह जामीन मंजूर 
- 23 ऑगस्ट 2017 - जामिनावर कर्नल पुरोहित 9 वर्षांनी तळोजा कारागृहाबाहेर पडले
(सकाळ संशोधन आणि विकास विभाग) 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: Malegaon Blast Case: Lt Col Shrikant Prasad Purohit Walks Out on Bail After 9 Years in Jail