
पंख सकारात्मकतेचे | बेल्लारीची सोयरीक अन् टेंभुर्णी-करमाळ्याची काळरात्र
लेखक : डॉ. हेमंत ओस्तवाल
‘तुम्ही नशीबवान आहात. जिवंत परत आलात. आठ दिवसांपूर्वीच त्या ठिकाणी एका ट्रक ड्रायव्हरला लुटून त्याची हत्या करण्यात आली आहे. त्या भागामध्ये हे नेहमीचेच आहे. तिथे काही विशिष्ट लोकांच्या टोळ्या आहेत. तुम्ही इतक्या रात्रीचे इकडून आलातच कसे?’ ध्याबेमालकाच्या या प्रतिक्रियेने आमची गाळणच उडाली. आम्ही अंधाऱ्या रात्री अनुभवलेला व जिवावर बेतलेला थरार सकारात्मकतेने घेतल्यानेच कर्नाटकमधील बेल्लारीहून सोयरिकीच्या कामानंतर घरी सुखरूप परतलो होतो.
ही घटना आहे, कोविडच्या थोड्या अगोदरची, माझे एक अत्यंत जवळचे स्नेही मित्र सुभाष यांची कन्या म्हणजेच माझी पुतणी तेजस्विनी हिची. तेजस्विनी नावाप्रमाणेच अत्यंत तेजःपुंज, अत्यंत हुशार सर्व विषयांमध्ये पारंगत, दिसायला तर अत्यंत देखणी, हजारोंमध्ये एखादी चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे सीए नुकतीच पास झालेली होती. अर्थातच आता तिचे लग्नाचे योग्य वयदेखील झाले होते, तिला सांगून स्थळे येत होती. या सगळ्या भाऊगर्दीमध्ये सुभाषचे एक दूरचे नातेवाईक बेल्लारी (कर्नाटक)मधील स्थळ घेऊन आले. तसे सुभाषचे आणि त्यांचे नाते बऱ्यापैकी लांबचे होते. ते स्वतः बेल्लारीलाच राहत होते.
व्यापार-धंद्याच्या निमित्ताने ते कर्नाटकातील बेल्लारी येथे स्थलांतरित झाले होते. तेथे उद्योग-व्यवसायात त्यांनी चांगला जम बसविला होता. तेथे भूषण चांगले नाव कमवून होते. भूषणचे सर्व नातेवाईक, घरदार आपल्याच म्हणजे नाशिक जिल्ह्यातच होते. स्वतः भूषणचे शिक्षणदेखील आपल्याच भागात म्हणजे नाशिक जिल्ह्यातच झालेले होते. भूषण आणि सुभाष हे दोघे एकाच शाळेत शिकलेले होते. त्यामुळेच त्यांचे संबंध नातेवाईक असून मैत्रीपूर्ण होते आणि नातेवाइकांपेक्षाही आपण सर्वच जवळच्या मित्रांना चांगलेच मानत असतो कारण आपलाही बहुसंख्य वेळा अनुभव असाच असतो. वेळप्रसंगी नातेवाइकांपेक्षा मित्रच सर्वार्थानी कामाला येत असतात. मदतीला धावून येत असतात. रात्री-पहाटे धावून येणारे मित्रच असतात.
तसेच काहीसे आमच्या सुभाषचेदेखील झाले म्हणजे काय तर तसे बघितले तर नाशिक शहरापासून तर मुंबई, पुणे, औरंगाबाद, नगर अशा जवळच्या शहरांमधून बऱ्याच ठिकाणी चांगली चांगली स्थळे सांगून तेजस्विनीसाठी येत होती. एकाहून एक सरस अशी ही स्थळे होती; परंतु भूषणने बेल्लारीच्या स्थळाचे वर्णन खूपच जोरदार केले. खरेतर असे होते या भूषणचीच स्वतःची मुलगी या बेल्लारीच्या घरामध्ये याच घरामध्ये मोठ्या मुलाला दिलेली होती आणि तो आता सुभाषच्या मागे लागला होता की तेजस्विनीला त्याच्या जावयाच्या म्हणजे राहुलचा छोटा भाऊ अमितला द्यायची. नुसताच मागे लागला नव्हता तर त्याने अक्षरशः सुभाषवर जबरदस्त दबाव तयार केला होता.
दबाव तयार करताना त्याने परत परत एकच घोषा लावला होता, ‘निदान एकदा तरी तुम्ही सगळे बेल्लारीला या मुलाचे घरदार बघा. मुलगा बघा. गावात त्यांची असलेली प्रतिष्ठा बघा. इतके चांगले स्थळ तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. मी माझी मुलगी उगाचच दिलेली नाही. माझी गॅरंटी आहे. त्याच्यामुळे तुम्ही एकदा तरी याच.’ वगैरे वगैरे .त्याने मैत्रीच्या नात्याने आमच्या सुभाषच्या कानाशी धोशा लावला आणि सुभाषच्याही मनामध्ये साहजिकच जे इतर कोणाच्याही मनात आले असते तसे आले. एवढा जर सांगतोय तर एकदा तरी जाऊन बघायला काय अडचण आहे ?
सुभाष आणि माझे अगदीच जवळचे खास संबंध होते. माझ्या सल्ल्याशिवाय सुभाष कधीही कुठलाही निर्णय घेत नसे. स्वतः सुभाष, त्याची पत्नी अरुंधती, त्याचे आई-वडील सर्व जण माझ्याशी नेहमी चर्चा करीत कुठलाही विषय असो माझा सल्ला घेत. त्यामुळे हा विषयही माझ्यापर्यंत बरोबर पोचला. माझ्याशी बोलण्याआधी सुभाषने त्याच्या घरी सर्वांशी चर्चा करून सर्वांना बरोबर कन्व्हिन्स केलेले होते. आता फक्त मी बाकी होतो. सुभाष माझी वेळ घेऊन माझ्याशी बोलायला आला.
या विषयातील माझे मत एकदम स्पष्ट स्वच्छ होते, की आपल्या मुलीला जिच्यात कुठल्याही प्रकारची कमतरता नव्हती त्याहीपेक्षा जी सर्वार्थाने खरोखरच अत्यंत चांगली होती. अगदी लाखात एक अशी एकुलती मुलगी (सुभाषला एक मुलगा आणि एक मुलगी आहे) जर आपली असेल तर कुठेतरी लांब जेथे की कुठल्याही पद्धतीने जरी जायचे म्हटले तरी किमान १८ ते २२ तास लागणार होते. चारचाकीने विनाथांबा जायचे म्हटले तरी २०-२२ तास, रेल्वेने जावयाचे म्हटले तरी २२ ते २४ तास, विमानाने जायचे म्हटले तरी २० ते २२ तास म्हणजे कसेही जा निदान २०-२२ तास. एकुलती मुलगी जर कधी तिला कुठल्याही मदतीची, आई-वडिलांची मदतीची गरज पडली तर! याउलट आपल्या येथे काही झाले म्हणजे कुठल्याही प्रकारची अनहोनी घटना घडली ज्या वेळी आपल्याकडे आपली मुलगी आपल्या जवळ हवी असे वाटते अशा वेळी आपण काहीही केले तरीही किमान २४ तास अगोदर आपली मुलगी आपल्याला भेटू शकत नाही एवढे नक्की आणि त्याहूनही पुढची गोष्ट म्हणजे आपल्याकडेदेखील भरपूर चांगली चांगली स्थळे सांगून येतच होती ना आणि जवळपासचीच असल्याने आपण त्यांच्याबद्दल इत्थंभूत माहिती काढू शकत होतो जे की एवढ्या लांब परराज्यातील मुलाची नक्कीच काढू शकत नव्हतो. त्याहूनही माझा पुढचा प्रश्न होता, की मुलगा जर खरोखर एवढा चांगला होता तर त्याच्यावर कर्नाटकातूनच मुलींच्या अक्षरशः उड्याच पडल्या पाहिजेत होत्या ना.
एवढे सगळे चांगले असूनही का बेल्लारीहून नाशिकची मुलगी शोधायचा प्रयत्न सुरू होता, असा माझा साधासुधा प्रश्न होता. माझ्या मनातल्या भावना मी सर्व सुभाषला समजावून सांगितल्या. त्यालाही ते सर्व पटले; परंतु भूषणने सुभाषचा परत ब्रेन वॉश केला आणि अशा रीतीने सुभाषने व सर्व त्याच्या घरच्यांनी बेल्लारीला मुलगा बघायला जायचे ठरविले, अर्थातच माझ्यासह; परंतु मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम होतो- मला हे स्थळ काही केल्या पसंत नाही.
मला बेल्लारीला यायचे नाही. मला बरेच काही वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगण्यात आले. मग मी शेवटी त्यांना सांगितले, की आपण सर्व एक काम करा. आपण सर्व जण बेल्लारीला जाऊन या. जर आपणा सर्वांस मुलगा पसंत असेल तर माझा विरोध तसाच ठेवून आपण हे लग्न नक्की करू आणि आपण सर्वमिळून हे लग्न छानपैकी पार पाडू. शेवटी मला सोडून सुभाष आणि मंडळी बेल्लारीला गेली. अमित, राहुल या सगळ्यांनी आणि सोबत भूषणने सुभाष आणि कंपनीची जबरदस्त बडदास्त ठेवली. त्यांच्या श्रीमंतीचेही यथायोग्य प्रदर्शन केले. गावातील प्रतिष्ठितही बोलवून घेतलेले होते. एकंदरीत सर्व काही सुभाष आणि कंपनीला चांगले वाटले, नव्हे ही सर्व मंडळी जणू काही भारावूनच गेली होती. येथेच तेजस्विनीला द्यायचे हे सर्व ते नक्की करून आले. मी जर त्यांच्यासोबत बेल्लारीला गेलेलो असतो तर त्यांनी ते तेथेच नक्की करून घेतले असते. मी नसल्यामुळेच हा निर्णय त्यांनी तेथे लगेचच घेतला नाही.
नाशिकला आल्यानंतर जवळपास अर्धा दिवस त्यांनी माझ्याजवळ अमित पुराण, बेल्लारी पुराण लावले. मी त्यांना आधी कबूल केल्याप्रमाणे सांगितले, की तुम्हाला सगळ्यांना हे स्थळ एवढे पसंत पडलेले असेल तर मला काय वाटते याचा विचार करू नका. आपण पुढे जाऊ या. मुलाला आणि त्याच्या नातेवाइकांना येथे बोलावून घेऊ या. बोलतानाच त्यांना मुलगी पसंत पडली (जी की जवळपास त्यांना पसंत पडलेलीच होती.), तर सोयरिकीचा कार्यक्रम करण्याच्या तयारीने यायला सांगू या अपेक्षेप्रमाणे सर्व काही घडले. बेल्लारीहून मुलासहित २३ माणसे स्त्री-पुरुष आलेली होती. सकाळी मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला आणि लगेचच सायंकाळी एका चांगल्या हॉटेलमध्ये जवळपास २०० लोकांच्या उपस्थितीमध्ये सोयरिकीचा कार्यक्रम केला. कार्यक्रम खूपच जोरदार झाला. सर्व झाल्यानंतर माझ्या निर्णयावर मी अजूनच ठाम झालो, की तेजस्विनीला नक्कीच इथे द्यायला नको. कारण बाकी सगळे काही व्यवस्थित होते; परंतु मुलाचा चेहरा पाहिजे तेवढा काही खुलला नव्हता. मुलाला मुलगी पसंत पडते तेव्हा ते त्याच्या देहबोलीवरून समजत असते. तसे इथे काहीही समजून येत नव्हते आणि असेही अनुभवी नजरांना हे ताबडतोब जाणवत असते. एकंदरीत मला आतून जाणीव होत होती की सर्व काही ठीक नाही. असो. सोयरीक मोठ्या थाटामाटाने संपन्न झाली. तेजस्विनी आणि अमितची भेटदेखील झाली. मोबाईल क्रमांकाची अदलाबदलदेखील झाली. असा महिना दीड महिना गेला.
बेल्लारीला त्यांनी साखरपुड्याचा कार्यक्रम फारच मोठ्या प्रमाणात केला. दीड-दोन हजार लोक कार्यक्रमाला आले होते. फारच भव्यदिव्य कार्यक्रम झाला. असे साधारणतः तीन-चार महिने गेले. लग्नाची तारीख ठरविण्याची लगबग सुरू झाली. त्याच वेळी खासकरून अमितकडून कोल्ड शोल्डर देण्याचा कार्यक्रम सुरू झाला. आम्ही तेजस्विनीशीदेखील बोलायचा प्रयत्न केला. पहिले तर ती काहीच बोलली नाही. तिचा चेहरा मात्र जबरदस्त पडला होता. मग मी तिला बाजूला घेऊन बसलो आणि बोलते केले. तेजस्विनी हमसाहमशी रडायला लागली. सर्व काही बोलली. सर्वांना जबरदस्त आश्चर्याचा धक्काच बसला.
तेजस्विनीने तिच्या बाजूने अमितशी एकरूप होण्याचा खूपच चांगला प्रयत्न केलेला होता. अमित कुठल्याही परिस्थितीत तेजस्विनीशी एकरूप झालेला नव्हता. त्याउलट तेजस्विनीला पदोपदी हिणवून तिचा अपमान करून ती कशी त्याच्याशी लग्न करणार नाही या पद्धतीची वागणूक अमित तेजस्विनीला देत होता, अर्थातच हे सर्व बघितल्यानंतर सुभाष आम्ही सर्वांचा निर्णय पक्का झाला, की तेजस्विनीला बेल्लारीला द्यायचे नाही. सर्वांनी तयार झालेल्या अत्यंत नकारात्मक परिस्थितीला, प्रसंगाला सकारात्मकतेने सामोरे जाऊन सोयरीक तोडायचा निर्णय घेतला. यासाठी आम्ही म्हणजे सुभाष, आमचा अत्यंत जवळचा नातेवाईक मित्र नंदू आणि मी अशा तीन जणांनी ताबडतोब बेल्लारीला जाण्याचा निर्णय घेतला.
त्वरित जायचे असल्याने चारचाकी घेऊन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आम्ही येथून दुपारी दोनच्या सुमारास निघून रात्री सोलापूरला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे निघून सकाळी साडेअकराच्या सुमाराला बेल्लारीला पोचलो. बेल्लारीला परिस्थिती अतिशय योग्य रीतीने सांभाळून गावातील काही प्रतिष्ठितांची मदत घेऊन अमितच्या घरच्यांना सर्व सत्य परिस्थिती कथन करून सोयरीक तोडायचा निर्णय सकारात्मकतेने दोन्ही परिवारांच्या भल्यासाठी आम्ही घेतला. दरम्यान, बेल्लारीत गेल्यानंतर अजून एक मोठी माहिती मिळाली, ती म्हणजे, अमितचे बेंगळुरूमध्ये शिकत असतानापासूनच एका इतर समाजातील मुलीवर प्रेम होते. त्याला तिच्याबरोबर लग्न करायचे होते हे माहीत पडल्यानंतर आम्ही स्वतःला खासकरून तेजस्विनीला नशीबवान समजलो, की आपण लग्न करायच्या आधीच योग्य वेळी योग्य असा सकारात्मक निर्णय घेतला. नाहीतर तेजस्विनीच्या आयुष्यात पुढे काय झाले असते याची कल्पनाच करवत नाही. असो. एक मोठा निर्णय सकारात्मकतेने त्यांनी घेऊन आम्ही दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास परतीच्या प्रवासास बेल्लारीहून निघालो. रात्री साधारणतः अकरा-सव्वाअकराच्या सुमारास सोलापूरजवळ पोचलो.
त्या वेळचे तेथील शासनातील काही उच्चपदस्थ अधिकारी माझे मित्र होते. त्यांनी आम्हाला विनंती केली, की आपण सर्व रात्री इथेच मुक्काम करा. टेंभुर्णी-करमाळा रस्ता रात्रीचा धोकादायक आहे. आपण रात्रीचा प्रवास न केलेला बरा. आम्ही आपल्या मुक्कामाची येथे सोय करतो; परंतु जसे की नेहमीच घडते. रात्री जितका प्रवास कव्हर करता येईल तेवढा आपण करत असतो, जेणेकरून सकाळी लवकरात लवकर घरी पोचता येते. त्याप्रमाणेच आम्ही त्यांना सांगितले, की आपण सोलापूरऐवजी आमची सोय आपल्या हद्दीमध्ये शेवटी करमाळ्याला करा.
आमचा सकाळी तेवढाच वेळ वाचेल. त्यांनी आम्हाला पुन्हा एकदा विनंती केली. तोच टापू रात्रीचा धोकादायक आहे म्हणूनच आपण इथेच मुक्काम करा. आम्ही काही त्यांचे ऐकले नाही. नाइलाजाने त्यांनी आमची सोय करमाळा येथे केली. रात्री पाऊणच्या सुमाराला आम्ही टेंभुर्णी सोडले. टेंभुर्णी आणि करमाळाच्या मध्ये आम्ही होतो. अंदाजे सव्वा वाजला होता. झोपेच्या डुलक्या मधूनमधून चालू होत्या. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. मध्येच काही आवाज आला. जणू काही गाडीचा एखादा पार्ट अथवा मोठा नट पडला. आमचा ड्रायव्हर गाडी थांबवायला लागला. त्याला सांगितले, कुठल्याही परिस्थितीत गाडी थांबू नको. चालत राहा. साधारणतः दोन-अडीचशे मीटर अंतर पार केल्यानंतर एक ट्रक रस्त्याच्या कडेला त्याला उभा दिसला. त्याला त्या ट्रकचा आधार वाटला. त्याने आमची इनोव्हा गाडी तेथे थांबविली. त्याला सार्थ भीतीही वाटत होती. गाडीचा काही पार्ट किंवा नटबोल्ट तर पडला नाही ना? त्यामुळे पुढे जाऊन अपघात व्हायला नको म्हणून त्याने इनोव्हा त्या ट्रकच्या पाठी थांबविली. एका बाजूने तो उतरला. दुसऱ्या बाजूने सुभाष उतरला.
दोघे जण मोबाईलची बॅटरी लावून गाडी चेक करत होते. नंदू आणि मी मधल्या सीटवर बसलेलो होतो. साधारणतः दोन-अडीच मिनिटे गेली आणि गाडीच्या उजव्या म्हणजे ड्रायव्हरच्या बाजूने एक मोठा दगड जोराने ड्रायव्हरच्या दरवाजाच्या काचेवरती आदळला. दगड बऱ्यापैकी मोठा होता. काच फुटली. गाडीमध्ये अगदी आमच्या अंगावरदेखील काचा उडाल्या. काही क्षण काहीच लक्षात आले नाही. मग लक्षात आले, की अरे, हा तर आपल्यावर हल्ला झाला आहे. क्षणार्धात मी स्वतःला सावरले. बाकी कोणालाही काहीही सुचत नव्हते. सर्व दृढ मग्न झाले होते. मी जोरजोरात ओरडून ड्रायव्हरला आणि सुभाषला सांगितले, ‘‘आहे तसे डाव्या बाजूने गाडीत बसा. गाडीत बसा.’’ नेमका सुभाष पहिले बसला. यादरम्यान गाडीवर दगडांचा अक्षरशः वर्षाव सुरू होता. आमच्या बाजूचीदेखील काच फुटली. समोरील काचदेखील टिचली. यादरम्यान सुभाष आधी बसल्याने ड्रायव्हरला काही सुचत नव्हते, की गाडीत कसे बसावे. मी त्याला ओरडून सांगितले, ‘‘अरे बाबा, त्याच्या अंगावरून जा. त्याच्या अंगावरून जा!’’ नशीब, त्याला ते जमले. तो ड्रायव्हिंग सीटवर बसला. त्याला ओरडून सांगितले, ‘‘गाडी आतून सेंट्रल लॉक कर. सेंट्रल लॉक कर.’’ खरेतर तो पूर्ण गोंधळला होता. मी अक्षरशः त्याच्या अंगावर वाकून गाडी सेंट्रल लॉक केली. त्याला ओरडून सांगत होतो. गाडी सुरू कर आणि पळव. त्यादरम्यान दरोडेखोरांनी आमची गाडी जवळपास गाठली. एकाने ड्रायव्हरच्या बाजूच्या फुटलेल्या काचेतून हात घालून गाडीचे सेंट्रल लॉक उघडण्याचा त्याबरोबरच गाडीच बंद करून चावी काढून घेण्याचा प्रयत्न केला.
आम्ही आतून प्रतिकार केला. या झटापटीत तुटलेल्या काचेचे कोपरे त्याच्या हातात घुसले आणि गाडीत आतमध्ये रक्ताच्या धारा लागल्या. तो किंचाळत होता. याबरोबरच इकडून सुभाषच्या बाजूने एकजण लटकला होता. ड्रायव्हरला सांगितले, ‘‘तू कुठलीही चिंता न करता गाडी पळव.’’ ड्रायव्हरनेही मोठ्या हिमतीने गाडी पळविली. काही अंतरापर्यंत सुभाषच्या बाजूचा दरोडेखोर गाडीच्या दरवाजाला लटकलेला होता. शे-दीडशे मीटर नंतर तोही खाली पडला. आमची गाडी भरधाव जवळपास १२० ते १४० च्या वेगाने पळत होती. कोणाच्याही तोंडून शब्ददेखील फुटत नव्हता. अक्षरशः सर्व जण थरथर कापत होते. पंधरा-वीस मिनिटांनंतर हळूहळू सर्व जण शांत होत होते.
करमाळ्याच्या अलीकडे एक गाव लागले. तेथे १५-२० गाड्या थांबलेल्या होत्या. तीन-चार धाबे सुरू होते. आमच्या जिवात जीव आला. गाडी तेथे थांबविली आमची गाडी थांबल्या थांबल्या तेथील २०-२५ लोक आमच्याकडे आमच्या गाडीकडे आले आणि विचारू लागले, ‘‘काय झाले, काय झाले?’’ आम्ही त्यांना सर्व चित्तथरारक प्रसंग कथन केला. धाब्यावाल्यांची प्रतिक्रिया आली, ‘‘नशीबवान आहात. जिवंत परत आला आहात. आठ दिवसांआधी तेथेच एका ट्रक ड्रायव्हरला लुटून त्याची हत्या करण्यात आली आहे आणि त्या भागामध्ये हे नेहमीचेच आहे. तिथे काही विशिष्ट लोकांच्या टोळ्या आहेत. त्यांचे हेच काम आहे. तुम्ही इतक्या रात्रीचे इकडून आलातच कसे?’’ आमचे एकच उत्तर होते, ‘‘आमचे नशीब!’’ आम्ही मृत्यूच्या दाढेतून आलो होतो. सुखरूप बचावलो होतो. म्हणायला किरकोळ काचा आमच्याही शरीरात घुसल्या होत्या; परंतु त्या सर्व प्रसंगाचा विचार करता अत्यंत नगण्यच म्हणता येईल असे आम्ही चित्तथरारकरीत्या आणि तो प्रसंगदेखील आम्ही सकारात्मकतेने स्वीकारल्यामुळे योग्य वेळी योग्य हालचाली केल्यामुळे वाचलो होतो.
आम्ही घाबरून गेलो असतो, गाडी पळविली नसती, गाडी सेंट्रल लॉक केली नसती तर विचारही करवत नाही. बेल्लारीचाही प्रसंग सकारात्मकतेने हाताळल्याने तेजस्विनीचे आयुष्य बरबाद होता होता वाचले होते आणि टेंभुर्णी-करमाळ्यामधील आमच्यावरील हल्ल्याचा प्रसंग सकारात्मकतेने स्वीकारल्याने आम्हीही जिवानिशी वाचलो होतो.
आपण सर्वांनीच आपल्या आयुष्यामध्ये कितीही बिकट प्रसंग येऊ देत, आपली सकारात्मकता कधीही सोडू नका. ही सकारात्मकता आपल्याला कुठल्याही प्रसंगातून बाहेर काढते यात तिळमात्र शंका नाही.
(लेखक नाशिकमधील प्रथितयश सुयश हॉस्पिटलचे संचालक आहेत.)