हिंगोली जिल्‍ह्‍यातील पंधरा गावांत भूकंपाच्‍या हादऱ्याने घबराटीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

2.2 रिश्टर स्‍केलची नोंद; गुढ आवाजानंतर आता हादऱ्याना सुरुवात

हिंगोली: जिल्‍ह्‍यातील औंढा नागनाथ तालुक्‍यातील पिंपळदरी, आमदरी या दोन गावाच्‍या परिसरात जमिनीतून आलेला गुढ आवाज व हादऱ्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले आहे. मागील महिनाभरातील ही तिसरी घटना आहे. नांदेडच्‍या स्‍वामी रामानंद तीर्थ भूगर्भ संशोधन संस्‍थेने या हादऱ्याची नोंद 2.2 रिश्टर स्‍केल अशी केली आहे.

2.2 रिश्टर स्‍केलची नोंद; गुढ आवाजानंतर आता हादऱ्याना सुरुवात

हिंगोली: जिल्‍ह्‍यातील औंढा नागनाथ तालुक्‍यातील पिंपळदरी, आमदरी या दोन गावाच्‍या परिसरात जमिनीतून आलेला गुढ आवाज व हादऱ्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले आहे. मागील महिनाभरातील ही तिसरी घटना आहे. नांदेडच्‍या स्‍वामी रामानंद तीर्थ भूगर्भ संशोधन संस्‍थेने या हादऱ्याची नोंद 2.2 रिश्टर स्‍केल अशी केली आहे.

हिंगोली जिल्‍ह्‍यात मागील महिनाभरापासून पांगरा शिंदे (ता.वसमत) येथे जमिनीतून गुढ आवाज आल्‍याच्‍या घटना घडल्‍या. त्‍यासोबतच पिंपळदरी (ता. औंढा नागनाथ) या गावाच्‍या परिसरात जमिनीतून गुढ आवाज येण्याच्‍या घटना घडल्‍या. सलग दोन ते तीनवेळा अशा प्रकारच्‍या घटना घडल्‍या. जमिनीतील गुढ आवाज आल्‍याच्‍या घटनेनंतर आता जमिनीतील आवाजासोबत हादरे बसण्याची घटना घडू लागले आहेत. एकूणच सलग सुरु असलेल्‍या घटनाची मालिका पाहता भूकंपाच्‍या भीतीने संपूर्ण जिल्‍ह्‍यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज (बुधवार) दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटाच्‍या सुमारास पिंपळदरी व आमदरी परिसरात, तसेच पांगरा शिंदे व आसोला या चार गावांमध्ये देखील याच कालावधीत जमिनीतून गुढ आवाज आले व मोठ्या प्रमाणात जमीन हादरली. अचानक झालेल्‍या प्रकारामुळे एकच घबराट उडाली व गावकरी घाबरून घराबाहेर पळत सुटले. एवढेच नव्‍हे तर त्‍यासोबत काहीशी पळापळ देखील झाली. आवाजासोबत भूकंपाचा धक्‍का लागल्‍याने गावकऱ्यांना जीव वाचवण्यासाठी पळावे लागले. या घटनेसोबत सर्वत्र अफवाही पसरल्‍या.

दरम्‍यान, पांगरा शिंदेचे सरपंच भागवत शिंदे व संतोष शिंदे यांनी जिल्‍हाधिकारी अनिल भंडारी यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. तेव्‍हा श्री. भंडारी यांनी प्रशासनाची यंत्रणा हलवली. औंढा नागनाथ तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी आसोला गावाला भेट दिली. कुरूंदा गावाच्‍या परिसरात आवाज आल्‍याच्‍या भितीने पोलिसांनी भेट देवून गावकऱ्यांना शांत केले. याशिवाय जमिनीतून येणाऱ्या आवाजाचे केंद्र व परिणामाची चिंता वाटत असल्‍याने आजूबाजूच्‍या एकूण पंधरा गावांमध्ये भूकंप होत असल्‍याचे घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

याबाबत स्‍वामी रामानंद तिर्थ संस्‍थेने भूगर्भातील हादऱ्याची नोंद 2.2 रिश्टर स्‍केल अशी केली आहे. जमिनीतील गुढ आवाजानंतर आता सर्वांत मोठा हादरा बसल्‍याची ही पहिलीच घटना घडली आहे. जिल्‍ह्यात गेल्‍या महिनाभरात भूगर्भीय हालचालीच्‍या या प्रकारामुळे भूकंपासारखी परिस्‍थिती उद्‌भवेल अशी भीती व्यक्‍त होवू लागली आहे. याबाबत शासनाने तातडीने भूगर्भ विषयक हालचालीची नोंद घेवून त्‍याचे नेमके कारण शोधत आवश्यक त्‍या उपाय योजना करण्याची वेळ येवून ठेपली आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :