gofan article esakal
Blog | ब्लॉग

गोफण | पुण्य नगरीची जहागिरी पाटीलबुवांना सुटेना...

संतोष कानडे

मुलुख सोडावा लागणार म्हणून पाटीलबुवा खिन्न मनाने बसलेले होते. पुण्य नगरीची जहागिरी त्यांना आवडू लागली होती. आता इथंच 'सेटल' व्हायचं, असा विचार करुन त्यांनी पाळंमुळं रुजवायला सुरुवात केली. परंतु दोन महिन्यांपूर्वी राजकारणात अशाकाही उलथापालथी झाल्या की, पाटीलबुवांच्या साम्राज्याला हादरे बसले.

पाटीलबुवा म्हणजे, चंद्रकोर दादा पाटीलबुवा उर्फ चंदाप्पा. जसा चंद्र कलेकलेने वाढतो, तसेच तेही संथ गतीने अन् कलेकलेने वाढले. परंतु पौर्णिमेत त्यांनी असाकाही जल्लोष केला की अचानक अमावस्येचा काळोख झाला. कधीकाळी पाटीलबुवांचा वाडा आप्तेष्टांनी, जिवलगांनी भरुन पावला होता. पण आज कुणाचाही पाय उंबऱ्याला लागत नाही.

असो, पाटीलबुवांच्या आयुष्यात आज मोठा एक दुःखाचा प्रसंग ओढावला होता. पुण्य नगरीचे जुने-जाणते जहागिरदार दादाराव दणगटेंनी पुण्य नगरीच्या जहागिरीवर ताबा मिळवला होता. दिल्लीश्वरांशी तह करुन दादाराव दणगटे (बारामतीकर) यांनी ही खेळी केली. त्यामुळे उद्या पहाटे पाटीलबुवा मुलुख सोडून परगावी जाणार होते. घरी येतानाच त्यांनी सामान भरण्यासाठी वाण्याच्या दुकानातून खपटाची खोकी आणि पिशव्या आणल्या होत्या.

जड अंतःकरणाने त्यांनी सामान भरलं आणि झोपायला खोलीत गेले. झोपण्यापूर्वी सकाळी लवकर उठवण्याची घरच्यांना आठवण करुन दिली. डोळा लागतो न लागतो तोच गावच्या कडेला असलेल्या डोंगराच्या पायथ्याकडून कसलीतरी रोषणाई त्यांना दिसली. त्यांनी लगबगीने खिडकी उघडली...

समोर बघतो तर काय आकाशात फटाक्यांची आतषबाजी सुरु होती. रंगीबेरंगी चांदण्या तुडूतुडू फुटत होत्या. एकामागून एक आदल्या दण्..धुम्.SS.ठो..SS.. आवाज करीत होत्या. डीजेवर लोक जोरजोरात नाचत होते. काहींनी पारंपारिक ढोल-ताशांवर ठेका धरला होता. सगळा माहोल उत्साहाने फुलून गेला होता.

एकामागोमाग जेवणावळी उठत होत्या. श्रीखंड-पुरी असावी हे चंद्रकोर दादांनी ओळखलं होतं. नेमकं तिथं कोणकोणय हे बघण्यासाठी दादांनी डोळे 'झूम' करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात त्यांच्या खिडकीच्या दिशेने एक रॉकेट सुईSSS.. करीत झेपावलं.. तत्क्षणी दादांनी झटक्यात खिडकी लोटली अन् 'वाचलो बुवा' असं म्हणत सुटकेचा निःश्वास टाकला.

कसातरी डोळा लागलेला परंतु गावात सुरु असलेला तामजाम बघून दादांची झोप पुरती मोडली होती. डोळे रवून घेण्याचा प्रयत्न केला, कूस बदलली.. पण छे! झोपेचा पत्ता नव्हता. अशा प्रसंगी ते बाबूजींची गाणी ऐकत. मग त्यांनी टेप रेकॉर्डर सुरु केला.

आकाशी झेप घे रे पाखरा.. सोडी सोन्याचा पिंजरा

तुजभवती वैभव माया.. फळ रसाळ मिळते खाया

सुखलोलुप झाली काया.. हा कुठवर वेड्या घेशी आसरा

सोडी सोन्याचा पिंजरा...

तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थाने

दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडुनिया सरिता सागरा

कष्टाविन फळ ना मिळते, तुज कळते परि ना वळते

हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा

सोडी सोन्याचा पिंजरा...

गाणं ऐकून पाटीलबुवांचं जड पडलेलं डोकं शांत झालं अन् डोळे जड पडले... मेंदूतल्या पेशींनाही आराम मिळाला. 'एका मुलुखाची जहागिरी हातची गेली म्हणून काय झालं? बदल्यात दोन गावं मिळालीत. पुण्य नगरीतली मोहमाया सोडून दोन गावांमध्ये नाव मोठं करु.. जा ओलांडुनिया पुण्य नगरिया..., असा हिशोब जुळवून ते झोपी गेले.

तिकडे डोंगरपायथ्याला पहाटेपर्यंत मेजवाणी सुरु होती. कधीकाळी दादांच्या वाड्यावर हजेरी लावणारे हकीम जेवणावळींमध्ये वाढप्याचं काम करीत होते. काहीजण पुढे-पुढे करत कुणाला काय हवं-नको ते बघत होते. 'बाहुबलीत'ल्या शिवगामी देवीसारखं त्या बंगल्याच्या मालकीण कटाक्षाने सगळ्यांकडं लक्ष ठेवून होत्या. मध्येच त्यांना सुखाचा हुंदका दाटून आला अन् त्या ढसाढसा रडायला लागल्या...

समाप्त

संतोष कानडे

(santosh.kanade@esakal.com)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT