Pandit Jawaharlal Nehru
Pandit Jawaharlal Nehru esakal
Blog | ब्लॉग

Pandit Jawaharlal Nehru : नेहरू नावाचा हिमालय विरुद्ध खुजी आरएसएस

राजु परुळेकर - सकाळ वृत्तसेवा

Pandit Jawaharlal Nehru : ३० जानेवारी १९४८ ला नथुराम गोडसे या कट्टरवादी हिंदू राजकीय विचारसरणीच्या उजव्या प्रतिगामी अतिरेक्याने महात्मा गांधींना गोळ्या घातल्या. ज्यामध्ये तो महान राष्ट्रपिता देहाने मरण पावला. तेव्हाच देशाची सारी सुत्रं पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हातात आली. ज्यांच्याकडे जाऊन काही विचारावे, सल्ला घ्यावा इतरांसोबतच्या नातेसंबंधाबाबत चर्चा करावी असा माणूस नेहरुंसह उरला नाही.

पंडित जवाहरलाल नेहरू हे तेव्हा देशातील सर्वोच्च आणि अतिशय मोठे नेते होते. केवळ इतकच नव्हे. तर जगभर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव होता, दबदबा होता आणि त्यांच्याविषयी विलक्षण आकर्षण होतं. पंडित नेहरू जेव्हा गांधींनंतरच्या भारताचे एकमेव आणि निर्विवाद नेते झाले; तेव्हा भारताची राज्यघटना बनायची होती. भारतासमोरच्या असंख्यगुंतागुंतीच्या आणि अजस्त्रसमस्या त्यांच्यासमोर आ वासून उभ्या होत्या.

एकेकाळी पुरातन संस्कृती म्हणून समृद्ध असणारा देश हा विलक्षण दारिद्र्य आणि एक प्रकारे भुखेकंगाल होता. आधुनिक यंत्रयुगाशी भारताचा तसा अजूनही संपर्क यायचाच होता. भारतासमोरच्या ज्या समस्या होत्या ते ब्रिटिश भारतात यायच्या अगोदर परंपरेने, जातीव्यवस्थेने आणि संस्थानिकांमध्ये विभागल्या गेलेल्या भूभागामध्ये जे प्रश्न दडलेले होते त्याची गुंतागुंतीच्या स्वरूपामुळे त्या समस्या अजस्त्र बनल्या होत्या. दिडशे वर्षाच्या राजवटीत ब्रिटिशांनी त्या समस्यांमध्ये अधिक बिकट अशी भर घातली होती.

काही भारतीय प्रतिगामी नेते आणि संस्थानिकांना हाताशी धरून हिंदू मुस्लिम तिढ्यासारखे बरेच प्रश्न ब्रिटिशांनी निर्माण करून ठेवले होते. भारत अनेक संस्थानांमध्ये विभागला गेलेला होता आणि या साऱ्या प्रश्नांची निश्चित अशी कोणतीही उत्तरे कुणाहीपाशी नव्हती. गांधीजी आता हयात नव्हते.नेहरूंचे सहकारी प्रतिभाशाली आणि बुद्धिमान होते. परंतु नेहरूंएवढी लोकप्रियता नेतृत्वाची उंची आणि गांधीजींचा विश्वास त्यांना प्राप्त झालेला नव्हता. अशा वेळेला सारी जबाबदारी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर येऊन पडली.

खरं तर अशा वेळेला अनेक नवस्वतंत्र आफ्रिकन देशांप्रमाणे सर्व सत्ता हातात एकवटत खोटी स्वप्ने दाखवून मोठा हुकूमशहा होणं हे नेहरूंना सहज शक्य होतं. परंतु नेहरूंवर तीन गोष्टींचा खूप खोल प्रभाव होता. त्या गोष्टींमुळेच पुढे नेहरूंचं नेतृत्व आणि स्वातंत्रोत्तर काळात भारत उभा राहिला. यातली पहिली गोष्ट म्हणजे नेहरूंना प्राचिन भारतीय परंपरेचा आणि प्राचिन भारताच्या उद्गम आणि विकासाच अभिमान होता. त्याचं नेहरूंना आकर्षण होतं. त्यातले काळासोबत आलेले दोषही नेहरूंना माहिती होते.

पण प्राचिन परंपरेच्या विलोभनियतेला नेहरू कधीच विसरू शकले नाहीत. याची खूण त्यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात स्पष्टपणे दिसून येते. किंबहुना ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’मध्ये नेहरूंनी भारताच्या प्राचिन महानपणाचा जो लेखाजोखा मांडलेला आहे त्यातूनच हे लक्षात येतं की, मर्क्सवादाचा जगावर आणि नेहरूंवर किती प्रभाव पडला तरी नेहरू भारताला मार्क्सवादाच्या वाटेने जाऊ देणार नाहीत.

नेहरूंवर दुसरा प्रभाव जो पडला तो महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्वाचा. महात्मा गांधी हे एक अत्यंत गुंतागुंतीचे व्यक्तिमत्व होते. ते एक अत्यंत आधुनिक पण कर्मठ वैष्णव हिंदू होते. अर्थात त्यांचे काही बाबतीतले आग्रह  जरी अगदीच अवैज्ञानिक वाटत असले तरी त्यांनी आपल्या म्हणण्या व्यतिरिक्त काही वेगळं करण्याचं स्वातंत्र्य काँग्रेसमधल्या नेहरू किंवा बोस यांच्यासारख्या तरूण नेत्यांना बऱ्याचदा दिलेलं होतं. 

गांधीजींच्या सत्य, साध्य- साधन सुचिता, शुद्ध भारतीयत्व आणि साधेपणा याचा नेहरूंच्याआयुष्यावर निर्विवादपणे प्रभाव पडला.ज्याचं पालन त्यांनी पुढे आयुष्यभर केलं. दंभ आणि  ढोंग यांना नेहरूंच्या आयुष्यात जागा नव्हती. गांधीजींनी व्यापलेलं नेहरूंचं आयुष्य हे त्यांच्या जीवनात गांधी येण्याच्या आयुष्याहून वेगळं आणि खूपच भिन्न होतं. गांधींप्रतीच्या प्रेमाने आणि समर्पणाने नेहरूंनी ते आयुष्य स्वीकारलं आणि निभवलं. 

नेहरूंवर तिसरा महत्त्वाचा असलेला प्रभाव हा खूपच निर्णायक होता. तो प्रभाव होता विज्ञाननिष्ठतेचा. नेहरूंना बालवयाच विज्ञानाचं शिक्षण देण्यात आलं होतं आणि केंब्रिजमध्ये ते भौतिकशास्त्र शिकले होते. शास्त्रिय, वैज्ञानिक आणि भौतिकशास्त्रात ज्याला आधार मिळेल असं काहीतरी करण्याकडे आणि ते स्वीकारण्याकडे त्यांच्या मनाची रचना होती. पुढे मार्क्सवादाच्या उदयानंतर नेहरूंना मार्क्सवादाविषयी आकर्षण वाटलं. मानवी समाजाची रचना, उत्पत्ती आणि विकास यासंबधिचं मार्क्सवादाचं विवेचन इतकं तर्कशुद्ध आहे यामुळे नेहरू प्रभावित झाले.

१९२७ साली नेहरू रशियात गेले होते. तेव्हा रशियामध्ये यंत्रयुग कुस बदलत होतं. रशियन राज्यक्रांतीनंतरच्या सुरुवातीच्या काळातील तो रशिया होता. ज्यामध्ये नेहरूंना आकर्षण वाटावं असा वैज्ञानिक दृष्टिकोन होता. राजकीय जीवनात धर्माला स्थान नव्हते. आणि औद्योगिक क्रांतीने देशाची झपाट्याने आर्थिक प्रगती करण्याची तत्कालीन सोव्हिएत रशियामध्ये प्रक्रिया सुरू होती. त्यावेळच्या रशियावर समतोल भाष्य करणारी लेखमालाही नेहरूंनी त्यावेळी लिहिली. पण एवढं असूनही नेहरू मार्क्सवादी झाले नाहीत.

नेहरूंनी मार्क्सवादाचा सखोल अभ्यास केला. त्यातील विश्वातील रहस्यांची उकल करण्याची वैज्ञानिक पद्धती त्यांना मोहून टाकत होती परंतु नेहरूंच्या मनावर प्राचिन भारतीय परंपरांचा ज्यामध्ये अनेक धर्माची सरमिसळ झालेली आहे अशा प्रवाहांचा जो प्रभाव होता त्याने नेहरूंना मार्क्सवादी बनू दिलं नाही. ते शुद्ध भौतिकवादी विज्ञाननिष्ठ राहिले. यात गांधीजींच्या नेहरूंवर असलेल्या प्रभावाचाही मोठाच वाटा होता.

१९३३ साली नेहरूंनी इंदिरा गांधींना एक पत्र लिहिलंय ज्यामध्ये त्यांना ‘मार्क्सवाद म्हणतो त्याप्रमाणे खरोखरच तर्काने साऱ्या मानवी आयुष्याची उकल करणं शक्य आहे का’, अशी शंका उत्पन्न केलेली आहे, आणि ती शंका नेहरूंच्या मनात इतकी बळकट होती की पुढे नेहरूंना मार्क्सवादामधल्या कित्येक गोष्टी पसंत असूनही त्यातल्या पोथीनिष्ठतेचा आणि साचेबद्धतेचा तिटकारा आला. इतिहासात भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र व्हावे, त्या भारतात यंत्रयुग यावे आणि अणूपासून ते रॉकेटपर्यंत, धरणांपासून ते  अजस्त्र कारखाण्यांपर्यंत जे जे आधुनिक वैज्ञानिक आहे ते भारताने करावे. हे नेहरूंच्या  वर उल्लेखलेल्या वैभवपेढी व्यक्तिमत्वातून उतरलेले आहे. 

संविधान भारतीय राज्यघटना निर्माण व्हावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभा निर्माण व्हावी आणि ज्यामध्ये भारतीय नागरिक हा सार्वभौम  आणि लोकशाही नागरिक असावा हे प्रत्यक्षात आलेलं स्वप्न नेहरूंचंच. निसःदिग्धपणे नेहरूंना याचे श्रेय आपल्याला द्यावं लागेल. एकिकडे भारत हा लोकशाही राष्ट्र बनत असताना त्याचवेळेला भारताच्या जडणघडणीत वैज्ञानिक दृष्टिकोन पेरण्याचं काम नेहरूंनी सुक्ष्मपणे केलं.

एकिकडे आधुनिक विद्यापिठं, आण्विक प्रकल्प, भाक्रा नांगल आणि त्यासारखी धरणं, आंतरराष्ट्रीय विद्यापिठं, भारतीय आयुर्विज्ञान संस्था, बँकांची पायाभारणी, अवजड उद्योग प्रकल्प, एम्स सारखी आधुनिक वैज्ञानिक आरोग्य व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय समुदायाशी भारतीय विद्यार्थ्यांच्या विचारांच्या आदानप्रदानाची व्यवस्था,….. नेहरूंच्या दृष्टिकोनातून निर्माण झालेल्या कामांची यादी जर द्यायची झाली तर हा लेख संपेल त्यामुळे अधिक लिहिता येत नाही. खरं तर तो पुस्तकाचाच विषय आहे.  

१९५२ साली पहिली निवडणूक झाली त्यावेळी  नेहरू हे इतके मोठे नेते होते, तेव्हा त्यांनी जर ठरवलं असतं. तर भारतात बहुपक्षीय लोकशाही येऊ शकली नसती. पुढची शंभर वर्षं त्यांनी ठरवून दिलेले लोक भारतावर राज्य करत राहिले असते. स्वतः नेहरूंनी एखाद्या रॉबर्ट बुगाबेप्रमाणे भारतावर राज्य केलं असतं आणि भारत हा २०१२-१३ मध्ये तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करत होता.

त्याऐवजी आफ्रिकेतल्या एखाद्या भूखेकंगाल देशाप्रमाणे एखाद्या क्रूर हुकूमशहाच्याटाचेखी रगडला गेला असता. भारतीय लोकशाहीचं जे स्वरूप आहे;म्हणजे त्यातली विज्ञाननिष्ठता, त्यातला कल्याणकारी राज्याचा गाभा, लोकशाही आणि प्रत्येक माणसाला असलेला मतदानाचा अधिकार, समता आणि समानता, हिंदू कोडबिलांसारखे क्रांतीकारक विचार हे दोन माणसांमुळे उभे राहिले, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 

१९५२ च्या निवडणूकांनंतर उजव्या शक्तीचे लोक म्हणजे बरेचसे संस्थानिक काही भांडवलदार आणि काँग्रेसविरोधक पराभवगंडाने ग्रासले. ‘आपल्याला काँग्रेसचा मुळातून निकाल लावायचा असेल तर नेहरूंना बदनाम केलं पाहिजे’ हे त्यानंतरच्या भारतीय राजकारणाचं विरोधकांचं धोरण ठरून गेलं. यामध्ये एकेकाळी नेहरूंचे सहकारी असलेले समाजवादीसुद्धा गोडसेप्रेमी कट्टर हिंदूत्त्ववाद्यांशी हातमिळवणी करून नेहरूंची बदनामी करू  लागले.

नेहरूंच्या हयातीत शांतीस्वरूप भटनागर असोत, होमी भाभा असोत, भारताबाहेर इजिप्तचे नासेर असोत, मार्शेल टिटो असोत, अमोरिकेचा आयसेन हॉवर, अल्बर्ट आईन्स्टाईन असोत, चार्लिचॅप्लिन असो, हेराल्ड लास्की असो जगभरातल्या या विचारवाद्यांमध्ये, राजकारण्यांमध्ये भारतातल्या विचारवाद्यांमध्ये सर्वांनाच नेहरूंबद्दल प्रेम होतं आणि नेहरूंनाही या सर्वांबद्दल प्रेम होतं. 

बुद्धिवैभवाची एवढीमोठी प्रभावळ नेहरूंनी निर्माण केलेली होती की नेहरूंच्या हयातीतच काय की त्यांच्या नंतरसुद्धा ती तोडणं विरोधकांनाअशक्य होतं. नेहरूंच्या मृत्यूनंतरही अगदी आजही त्यांचं नाव बदलणे,त्यांच्या आंदनभवनासमोरील त्यांचे पुतळे हटवणे किंवा त्यांच्याबद्दल फोटोशॉप अश्लील प्रचार करणे हे करूनही त्यांच्या महानतेला धक्का लावणं जमलेलं नाही आणि ते जमणारही नाही. 

नेहरूंना स्वप्नाळू असं म्हटलं जातं. परंतु पंतप्रधान झाल्यावर नेहरूंना वास्तवाचं भान आणि जाणिव पुरेशी होती. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या मंचावर जरी ते अलिप्ततावादी गटाचे एक प्रमुख नेते होते तरी भारतामध्ये त्यांनी अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्थेचे स्वरूप दिले. कित्येकदा सोव्हिएत युनियनच्या तंत्रज्ञानाची मदत घेऊन त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातले मोठे सरकारी उद्योग मोठे केले. ते करताना त्यांनी अस्सल भारतीय वैज्ञानिक निर्माण केले त्यांना उत्तेजन दिलं. केवळ विज्ञानाच्या क्षेत्रातच नव्हे तर साहित्य, कला आणि सिनेमा या क्षेत्रातही त्यांनी हेच धोरण ठेवले.

डॉ. महाल नोबिस हे नेहरूंच्या पंचवार्षिक योजना आणि योजना आयोगाच्या कल्पनेचे एक शिल्पकार होते. स्वतः महाल नोबिस हे स्टॅलिनवादी होते. त्यांच्या विद्वत्तेचा वापर करताना. नेहरूंनी भारताची अर्थव्यवस्था स्टॅलिनवादी होणार नाही याची काळजी घेतली. जगामध्ये पुढे नाव कमावणाऱ्या अनेक शासकीय कंपन्यांची (पब्लिक सेक्टर युनिट) आणि बँकांची नेहरूंनी पायाभरणी केली. ज्याची विक्री करून आज मोदी सरकार पैसे कमावत आहे.

संपत्तीच्या निर्मितीचे ज्ञान नसल्यामुळे नेहरूंना नावे ठेवत नेहरूंनीच निर्माण केलेल्या कंपन्या विकून देशाच्या फाडून ठेवलेल्या झोळीमध्ये गंगाजळी आणण्याचे काम  आज जे सरकार करते आहे त्यांना नेहरूंच्या ऐतिहासिक भूमिकेचे आकलन तर सोडा पण साधी समज सुद्धा नाही. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये नेहरू आणि त्यांचे वडिल मोतीलाल नेहरू हे धनाढ्य व्यक्ती होते. नेहरूंनी पुढे मोतीलाल नेहरूंचा वकिलीतून निर्माण होणारे वर्षाचे उत्पन्न इतको जास्त होते की त्याकाळामध्ये आत्ता केंद्रसत्तेत असलेले सर्व मंत्रीमंडळांचे पूर्वजांना पोसण्याचे सामर्थ्य मोतीलाल नेहरूंमध्ये होते.

अलाहाबादमधले आनंदभवन हे स्वकष्टाने मिळवलेले आलिशान निवासस्थान नेहरूंनी देशाला अर्पण केले (त्याच्या समोरचा नेहरूंचा पुतळा हलवण्याचे कार्य अताच्या सरकारने केलेले आहे.). नेहरू फकीर नव्हते किंवा त्यांनी पस्तिस वर्षांपर्यत भिक्षा मागून खाल्ली नाही तरीही नेहरू ब्रिटिश राज्यकाळात एकूण नऊ वेळा जेलमध्ये गेले आणि आपल्या आयुष्याचे ३२५९ दिवस त्यांनी जेलमध्ये घालवलेले आहेत.  ब्रिटिश सरकारविरूद्ध लढण्याची त्यांची उर्मी आणि त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर असलेले त्यांचे संबंध फार उच्च दर्जाचे होते. एक उदाहरण द्यायचं झालं तर सरदार वल्लभभाई पटेल आणि  पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामध्ये काहीबाबतीत निश्चित मतभेद होते. परंतु पटेल आणि नेहरू या दोघांनाही एकमेकांविषयी निरातिशय आदर होता. पटेलांना नेहरू अतीलोकशाहीवादी वाटत असत.

गांधी हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना ही एक अतिरेकी विचारांची संघटना आहे  या मताचे पटेल होते. बऱ्याच प्रमाणात लोकशाहीवादी असणाऱ्या नेहरूंनी तसे होऊ दिले नाही. सरदार वल्लभभाई पटेल यांचा गुजरातमध्ये पहिला देखणा आणि मोठा पुतळा  खुद्द नेहरूंनीच उभा केलेला आहे. हा पुतळा गोध्रा येथे  आहे. आणि आश्चर्याची बाब म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल हयात असताना नेहरूंनी तो पुतळा उभा केला होता. यासाबंधी भाषण करताना नेहरू बोलले होते की, “Sardar Patel is a valiant fighter in the cause of freedom… Having won freedom, he is now engaged in retaining it. He has changed the map of India”. 

आपल्या जवळच्या सहकाऱ्याबद्दल त्याचा पुतळा जीवंतपणे उभा करून वर उल्लेखिलेले गौरोवोद्गार काढलेल्या नेहरूंना पटेलांविषयी काय प्रतीचा आदर आणि प्रेम वाटत असेल हे पुढे त्याच गोध्र्यामध्ये शतकातले भयानक असे दंगे घडवून आणणाऱ्या अतिरेकी हिंदूत्त्ववाद्यांना कधीच कळलं नाही. पटेल आणि नेहरू यांच्यामध्ये कोणताही सत्तालोभ संघर्ष नव्हता. तर वेगवेगळ्या विचार पद्धतीने सत्याकडे जाण्याची आणि भारत घडवण्याची त्यांच्यात स्पर्धा होती.

जे सुभाषबाबू आणि नेहरूंच्या बाबतीत सत्य आहे तेच वल्लभभाई पटेल आणि नेहरूंच्या बाबतीत सत्य आहे हे या घटनांवरून दिसून येते. २०१४ पासून आपल्या अशा किती सहकाऱ्यांना या प्रकारचे उद्गार काढून त्यांचे पुतळे मोदींनी उभे केलेले आहेत, जे स्वतःची बरोबरी नेहरूंशी करू इच्छितात? या प्रश्नाच्या उत्तरातच नेहरूंची महानता आणि आजच्या अतिरेकी हिंदूत्त्ववाही सत्ताधिशांची क्षुद्रता दिसून येते. 

जी बाब सरदार पटेलांच्या बाबतीत तीच बाब सुभाषचंद्र बोसांच्या बाबतीत होती. नेहरू आणि सुभाष अत्यंत जवळचे मित्र होते आणि नेहरूंच्या नेतेपदाबाबत सुभाषचंद्रांच्या मनात शंका नव्हती. ती शंका हिंदुत्त्ववाद्यांच्या मनात २०१४ पासून सुरू झाली. त्याचा सुभाषचंद्र बोसांशी काहीही संबंध नाही. कारण खुद्द सुभाषचंद्र बोसांनी १९३६ साली युरोपमधून जवाहरलाल नेहरूंना पत्र पाठवले आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की “काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये तुम्हीच असे आहात ज्याच्याकडे मी आशेने पाहू शकतो”. म्हणजे नेहरू हे बोसांचे नेतेही होते आणि मित्रही होते.

गांधीजी आणि बोस यांच्यात मतभेद होते तसे नेहरू आणि गांधीजींमध्येही मतभेद होते. गांधीजींच्या आर्थिक कार्यक्रमाला नेहरूंचा विरोध होता आणि तो त्यांनी जाहिरपणे मांडलेला होता. गांधीजींच्या विरोधात जाऊन जेव्हा सुभाषचंद्र बोसांनी निवडणूक लढवली तेव्हा पट्टाभी सितारामैयांचा झालेला पराभव हा स्वतः माझा पराभव आहे असं गांधीजी म्हणाले, पट्टाभी सितारामैयांना हरवून सुभाषबाबू दुसऱ्यांदा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. हा पराभव माझा व्यक्तिगत पराभव आहे असं गांधीजी म्हणाले. कार्यकारणीचे सदस्य हे मागच्या वेळेला सभाषबाबूंनी नेमलेले तसेच होते पण यावेळेला सुभाषबाबूंनी असा आरोप केला की,‘आपल्या कार्यकारणीतील काही सदस्य संघराज्यवादी भूमिका सोडून देतात’. यावरून समितीच्या १५ पैकी १२ लोकांनी कार्यकारणीचा राजीनामा दिला.

ज्या तीन सदस्यांनी सुभाषबाबूंच्या बाजूने राजीनामा दिला नाही ते होते. स्वतः सुभाषचंद्र बोस, त्यांचे बंधू शरद बोस आणि जवाहरलाल नेहरू. नंतर नेहरूंनी आपलं स्वतंत्र पत्रक काढून सुभाषचंद्र बोसांनी नवीन कार्यकरिणी स्थापन करावी त्यात आपण सहभागी होणार नाही. जेणेकरून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये बोसांना किती पाठिंबा आहे असं ठरवता येईल असं नमूद केलं. आणि हा नेहरूंचा सुभाषचंद्रांवरचा व्यक्तीगत राग किंवा द्वेष खचितच नव्हता किंबहूना ३ एप्रील १९३९ ला तसं तपशीलवार पत्र सभाषबाबूंना पाठवलं त्यात या साऱ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत.  वर उल्लेखिलेल्या पत्रात या साऱ्याचा गोषवारा आलेला आहे. 

हा नेहरूंचा विरोध सुभाषचंद्र बोस यांच्यावरील रागातून आलेला नसून ती नेहरूंची फार पूर्वीपासूनची फॅसिझम आणि नाझीझम बाबातची सुसंगत भूमिका होती. आणि सुभाषबाबूंनी जर गांधीजींशी संघर्षाची भूमिका घेतली तर पक्षातील डाव्या गटाला पक्षाचे ओझे पेलता येणार नाही. त्यांचा यात फायदा होईल. आणि अततः पक्षातील उजव्या विचारसरणीच्या आणि धर्मवाद्यांचा विजय होईल हा मुद्दा नेहरूंनी उपस्थित केलेला आहे. यामध्ये व्यक्तीगत सुभाष बाबूंशी नेहरूंचे काहीही वैर नव्हते.

इतिहासाचा प्रवाह असा की काँग्रेस आज पुन्हा त्याच वळणावर येऊन उभी राहिलेली आहे. फॅसिझम विरोधी राहुल गांधी यांनी पक्षातील जी२३ गटाशी संघर्ष हा त्याच प्रतीचा संघर्ष आहे. आणि त्या संघर्षात विजयी होण्याकरिता पुन्हा एकदा जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहण्याशिवाय गत्यंतर नाही. इथे एक स्पष्ट करावेसे वाटते ते म्हणजे सुभाषचंद्र बोस हे कट्टरधर्मवादी विरोधक होते, आणि जवाहरांसोबत डाव्या गटांचेही सदस्य होते, फक्त त्यांना  साध्य- साधनसुचिता वगळून फॅसिस्टांचा पाठिंबा घेण्यात काही गैर वाटत नव्हते जे नेहरूंना भयंकर वाटत होते. 

नेहरूंची आयुष्याच्या सुरुवातीपासून उजव्या फॅसिस्टांबाबतची भूमिका ही सातत्यपूर्ण आणि सुसंगत अशी होती. तिच्यात गांधीजी, सुभाषबाबू, काँग्रेस किंवा इतर कोणत्याही घटकाने कधीच फरक पडला नाही. नेहरूवादाच्या नैतिकतेचा हा महान बिंदू म्हणता येईल.   नेहरू कुणीही नव्हते आणि ते व्यक्तिगत कामासाठी युरोपमध्ये होते तेव्हाही काँग्रेसचे एक नेते नेहरू आहेत याची फॅसिस्ट नेता बॅनिटो मुसोलिनी याला कल्पना होती आणि ते युरोपमध्ये असताना त्यांना भेटण्याची मुसोलिनीने इच्छा व्यक्त केली.

नेहरूंनी तेव्हा युरोपमध्ये ज्याचा दबदबा होता आणि आधुनिक सिझर असा ज्याचा ब्रिटन देखील उल्लेख करत असे, त्या बेनिटो मुसोलिनीला भेटण्याचे नाकारले. तेव्हा तर महायुद्ध सुरू व्हायचे होते. आणि मुसोलिनी लोकप्रियतेच्या शिखरावर होता. त्यामुळे नेहरूंनी सुभाषबाबूंच्या फॅसिस्टांची वेळप्रसंगी मदत घेण्याच्या भूमिकेला विरोध करणे ही तारूण्याच्या सुरुवातीपासूनची नैसर्गिक भूमिका होती. ज्याचा त्यांनी मुसोलिनीच्या बाबतीतही अपवाद केलेला नव्हता. आणि तेव्हा तर नेहरू किंवा बोस यांच्यापैकी कुणीच काँग्रेसचे अध्यक्ष झालेले नव्हते. पण यानंतरही नेहरू सुभाषबाबू आणि काँग्रेस यांच्यात फुट पडू नये म्हणून प्रयत्न करत राहिले. खरं तर गांधींच्या सांगण्यावरून पंडित पंतांपासून ते राजेंद्र प्रसादांपर्यंत सुभाषबाबूंशी काँग्रेस अंतर्गत संघर्षाची भूमिका घेत होते. तेव्हा सुभाष बाबूंशी काँग्रेसचा संघर्ष होऊ नये म्हणून नेहरूंनी आटोकाट प्रयत्न केला.

स्वतः सुभाषचंद्रांनी नेहरूंबाबत एकेठिकाणी असंही म्हटलेलं आहे की, “नेहरूंचं सामर्थ्य गांधीजींपेक्षा जास्त आहे. कारण नेहरूंना डाव्या गटाचा पाठींबा आहे जो डाव्या गटांना कधीही मिळू शकत नाही.” नेहरू आणि सुभाषबाबूंमध्ये सत्ता संघर्ष नव्हता. हे या अनेक घटनांवरून पूर्णपणे स्पष्ट होतं.किंबहूना सुभाषबाबू काँग्रेसचे अध्यक्ष होण्याअगोदरच नेहरू दोनदा काँग्रेसचे अध्यक्ष होऊन गेलेले होते.

त्यामुळे जेव्हा सुभाष बाबूंनी मुसोलिनी, हिटलर किंवा ऍक्सिस  शक्तिंची ब्रिटिशांविरूद्धच्या लढ्यात मदत घ्यायची ठरवली आणि आझाद हिंद सेना स्थापन केली, तेव्हा त्यांनी स्वतःचा वेगळा मार्ग निवडलेला आहे. आणि तिथेही गेल्यावर त्यांनी आपल्या बटालियनची नावे जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधींच्या नावाववरून ठेवली होती. शिवाय तिकडून राष्ट्राला संबोधित करताना गांधीजींना पहिला ‘राष्ट्रपिता’ असं संबोधन सुभाषबाबूंनीच केलेलं आहे. आणि नंतर जेव्हा आझाद हिंद फौजेच्यावर लाल किल्ल्यामध्ये ऐतिहासिक खटला उभा राहिला तेव्हा त्यांच्या बचावासाठीनेहरू पुन्हा एकदा वकिलाचा झगा घालून उभे राहिले होते.

त्यामुळे बोस,गांधी, पटेल आणि नेहरू यांच्यात कोणताही आपापसात सत्तालोभाचा संघर्ष नसून या कल्पना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरच्या रेशीमबागेत तयार केल्या गेलेल्या आहेत. फॅसिझम बाबतच्या आणिउजव्या कट्टरवादी संघटनांबाबत्या आपल्या भूमिकेला नेहरूंनी आयुष्यात एकदाच मुरड घातली. ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कायमची बंदी घालावी या पटेलांच्या म्हणण्याला त्यांनी त्यांनी मान्यता दिली नाही. आजच्या भारताच्या संकटाला नेहरूंची ही भूमिका मात्र कारणीभूत ठरली आणि पटेलांची भूमिका जास्त बरोबर होती हे मात्र पूर्णपणे खरे आहे.

नेहरूंना गांधीजींच्या पराकोटीच्या अहिंसेबाबत शंका होती. नेहरू क्रांतीकारकांना गांधीजींप्रमाणे ‘मारो काटो का पंथ’ मानत नसत. भागतसिंह आणि फाशीची वाट पाहणारे त्यांचे सहकारी जेव्हा लाहोरच्या तुरूंगात होते, तेव्हा ९ ऑगष्ट १९२९ रोजी सेंट्रल जेलमध्ये भगतसिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भेटण्याकरिता स्वतः नेहरू गेले होते. एवढेच नव्हे तर नेहरूंनी आपल्या आत्मचरित्रात भगतसिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं भरभरून कौतुक केलेलं आहे.

खरं तर भगतसिंहांनी असेब्लीमध्ये बाँब टाकला त्या तिथे समोर मोतीलाल नेहरू बसलेले होते. त्याबद्दलचा कोणताही नकारात्मक विचार ना मोतीलालजी यांच्या मनात होता ना नेहरूंच्या मनात होता. या उलट आत्ता ९ मे २०१८ रोजी भारताचे सध्यकालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट टाकून – “भगतसिंह, बटुकेश्वर दत्त वगैरे ब्रिटिशांच्या कैदेत होते तेव्हा कोणी काँग्रेसचा नेता त्यांना भेटायला गेला होता का?” असं विचारलं आहे. हा रेशीमबागेतला कल्पनाविलास आहे. वास्तवात जे झालं ते वर लिहिलेलं आहे.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे नेहरूंमध्ये स्वदेशी आणि राष्ट्रवादाची एक तिव्र अशी भावना होती. त्यांना भारताच्या प्राचिन परंपरांच्या विषयी खूप आदर होता. कम्यूनिस्टांच्या बाबत त्यांच्या प्रेरणा इथल्या नाहीत आणि देशी प्रेरणा नाहीत हे मार्क्सवादाबद्दल नेहरूंना आदर असून देखील त्यांनी स्वच्छपणे म्हटलेले आहे. किंबहूना कम्यूनिस्टांचा पाठिंबासुद्धा त्यांनी यासंदर्भात नाकारलेला आहे. नेहरूंनी त्यांच्या‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकामध्ये  प्राचिन भारताच्या ऋषीमुनींपासून भारतीय महाकाव्यांपर्यंत साऱ्याची एका आंतरिक प्रेरणेने विलक्षण अशी वर्णने केलेली आहेत. त्यांनी इंदिराजींनी लिहिलेल्या पत्रांमध्येही याचे उल्लेख आढळतात.

धर्म निरपेक्षता ही भारताला बलवान बनवील यावर त्यांची श्रद्धा होती. (जी पुढे योग्य ठरली.) हिंदू महासभा आणि मुस्लिम लिग यांनी एकमेकांबरोबर सहकार्य केलेलं आहे पण उत्तरप्रदेशामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा १९३७ साली नेहरूंनी मुस्लिम लिग बरोबर मंत्रीमंडळ करण्याचे नाकारले होते. मुस्लिम लिगला संपूर्ण भारतात फाळणीअगोदर काँग्रेसच्यामानाने चांगल्या दर्जाची मते मिळाली नाहीत. काँग्रेसच्या मागे सर्व मुस्लिम नसले तरी लिगच्या मागेहीसर्व मुस्लिम नव्हते. त्यामुळे हिंदूमहासभेच्या द्विराष्ट्रवादाच्या मागणीखेरीज मुस्लिम लिगला फाळणीसाठी बळ मिळणे अशक्य होते. 

१९३७ साली काँग्रेसच्या दैदिप्यमान यशानंतर मुस्लिम लिगबरोबर सिंधपासून ते बंगालपर्यंत युती करून सत्ता स्थापन करण्याचं काम हिंदू महासभेने केलं. त्यामुळे मुस्लिम लिगला नैतिक पाठबळ हिंदू महासभेने दिला काँग्रेसने नाही  अधिक थेट बोलायचं झालं तर १९३७ मध्ये अहमदाबाद(कर्णावती) च्या अधिवेशनात सावरकरांनी जे हिंदू आणि मुस्लिम हे दोन राष्ट्र आहेत असे म्हटले. खुद्द विनायक दामोदर सावरकरांचं त्यासंदर्भातील विधान आहे.

 “India cannot be assumed today to be a unitarian and homogeneous nation, but on the contrary there are two nations in the main; the Hindus and the Moslems, in India.” (Samagra Savarkar Vadgmay- Volume 6, Maharashtra Prantik Hindusabha Publication, 1963-65, Page 296) Savarkar made the above statement in his presidential address at the All India Hindu Mahasabha convention in Karnavati (Ahmedabad) in 1937. पुढे १९४० मध्ये लाहोरच्या मुस्लिम लिगच्या अधिवेशनामध्ये स्वतंत्रपाकिस्तानच्या द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत उभा राहिला तो या पायाचा दगड होता. त्यामुळे  विनायक दामोदर सावरकर आणि मोहम्मद अली जीना हे फाळणीपुरुष आहेत. या दोघांच्या निवडीचे परिणाम नेहरू, गांधी आणि त्यांच्या काँग्रेसमधील इतर सहकाऱ्यांना भोगावे लागले.

त्यामुळे लाहोरमध्ये १९४० साली मुस्लिम लिगने द्विराष्ट्रवादाचा ठराव पास केला. या साऱ्यामध्ये नेहरूंचा दुरान्वयाने काहीही संबंध नव्हता, कारण नेहरूंनी धर्माधिष्ठीत भारताची स्थापना होऊ दिली नाही. किंबहूना स्त्रियांविषयीच्या हक्काचे कायदे पास करताना दिवाणी कायद्याच्या आधारावर लग्नापासून संपत्तीपर्यंत धर्माच्या पलिकडे जाऊन स्त्रियांना हक्क देण्याकडे नेहरूंनी प्रमुख भूमिका बजावली ज्याचे एक शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरही आहेत. नेहरूंनी आपल्या आयुष्यामध्ये भारत हा पाश्चिमात्य देशांच्या इतका बळकट, आधुनिक आणि धर्मनिरपेक्ष व्हावा यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या आयुष्यात त्यांनी धर्माधिष्ठीत राष्ट्र कसे पतन पावते हे पाकिस्तानच्या रूपाने पाहिले. त्याअर्थाने भारत हा हिंदू पाकिस्तान होऊ दिला नाही म्हणून तो २०१४ पर्यंत निरंतर प्रगतीपथावर गेला असे म्हणता येईल आणि याचे संपूर्ण श्रेय पंडित जवाहरलाल नेहरूंना देण्यात काहीच हरकत नाही. 

कुठच्याही एका लेखात किंवा कुठच्याही एका पुस्तकात मावेल एवढे पंडित जवाहरलाल नेहरूंचे कर्तृत्व छोटे नाही. आधुनिक भारताच्या इतिहासात पंडित जवाहरलाल नेहरू हे महात्मा गांधींएवढेच मोठे आणि अद्वितीय नेते होऊन गेलेले आहेत. काही बाबतीत तर ते गांधीजींपेक्षाही सरस होते. १९६२ साली चिन बरोबरीच्या युद्धात भारताला जेकाही अपयश आले त्याचे कारण नेहरूंना १९५२ पासून १९६२ पर्यंत दहा वर्षात अख्या भारताततल्या यंत्र युगाची निर्मिती करताना अडीज सिमांवर अत्याधुनिक यंत्राने सुसज्ज असलेली फौज उभी करणं अशक्य होतं हेही आहे. आज इतक्या वर्षानंतर लद्दाख, अरूणाचल प्रदेश, हिमाचल, सिक्कीमपर्यंत चिनच्या सेना आतपर्यंत आल्या आहेत त्याचा मुकाबला २०२१ साली भारताचे पंतप्रधान असलेले मोदी काय करताहेत? ते तर चिनचे नाव घ्यायलाही धजत नाहीत.

चिनला नेहरू घाबरले नाहीत. पण आपल्याकडे संसाधनचं कमी होती. हिमालय आणि हिमालयाएवढे नेहरू यांचा खरा न्याय भारत आजही करू शकलेला नाही. नेहरूंच्या असण्याने आपण एक जगाला आदर वाटेल असा अर्वाचिन समाज निर्माण झालो. दुर्दैवाने हे लिहित असताना नेहरूंचा द्वेष करणाऱ्या क्षुद्र संघटनांनी हा महान देश परत अंधारयुगात लोटलेला आहे. अशा वेळी कदाचित नेहरूंचे स्मरण आपल्याला प्रकाश दाखवेल आणि नेहरूंच्या कर्तृत्वाचा खरा अर्थ काय आहे य़ाचा आपल्याला बोध होईल एवढीच आशा आज आपण बाळगू शकतो.  नेहरूंच्या शर्टावर लावलेलं गुलाबाचं फुल हे नेहरूंच्या गुलाबपुष्पावरच्या प्रेमातून आलेलं असेल. समोर असलेल्या कॅमेऱ्याच्या प्रेमातून नव्हे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील फास्ट फूडची दुकाने आगीत जळाली

SCROLL FOR NEXT