Republic Day 2020 :माहीत करून घ्या संविधान निर्मितीतील काही रंजक घटना

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 January 2020

२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारला गेला. पण संविधान संपूर्ण रूपाने २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

भारताचं स्वतंत्र राष्ट्र उदयास आलं, तो दिवस होता १५ ऑगस्ट १९४७. परंतु त्यावेळी ब्रिटिश राष्ट्रकुलातील एक वसाहतीचं राज्य असा दर्जा आपल्याला मिळाला होता. इंग्लंड आणि त्याच्या इतर वसाहतींबरोबरचे संबंध ठरविण्याचं स्वातंत्र्यही भारताला मिळालं होतं. पण वसाहतीचं स्वराज्य म्हटलं, तरी राज्य इंग्लंडच्या राजाच्या नावानंच चालणार होतं.

प्रत्यक्ष कारभार गव्हर्नर जनरलच्या नावानं मंत्रिमंडळ पाहत असलं, तरी शेवटी राजाचं वर्चस्व कायम होतं. त्याचं काय करायचं, हा  प्रश्न एप्रिल १९४९ मध्ये राष्ट्रकुलातील सर्व पंतप्रधानांच्या बैठकीत निर्माण झाला. भारतानं आपलं संविधान गणराज्यात्मक राहील, असं निश्चित केलं होतं. त्यामुळे भारतीय संविधानात इंग्लंडच्या राजाचा किंवा त्या सरकारचा काहीही संबंध राहणार नव्हता. 

पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रभावी नेतृत्वात २६ जानेवरी १९५० रोजी भारतीय संविधानाचा अंमल सुरू झाला, त्या वेळी इंग्लंडचा राजा, राणी किंवा ब्रिटिश सरकारला भारतीय संविधानातच नव्हे, तर राजकारणातही कोणतंही स्थान राहिलं नाही. गव्हर्नर जनरल गेला आणि राष्ट्रपती हाच राष्ट्राचा प्रमुख झाला.

Constitution Committee
संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीच्या इतर सदस्यांसमवेत.

दहा लाख लोकांमागे एक घटनासमिती सदस्य

संविधानाच्या निर्मितीसाठी घटनासमिती स्थापन करण्याची मागणी १९३७ नंतर ठळकपणे मांडली जाऊ लागली होती. प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुका काँग्रेसने जिंकल्यानंतर निरनिराळ्या विधिमंडळांनी त्यासंबंधीचे ठराव मंजूर केले. दुसरं महायुद्ध संपलं आणि त्रिमंत्री योजनेतून घटनासमिती आकार घेऊ लागली. 

यंदा प्रथमच होणार जगातील सर्वात शक्तिशाली हेलिकॉप्टरचे दर्शन

१९४६ च्या सुरुवातीला प्रांतिक विधिमंडळांच्या निवडणुका झाल्या. १० लाख लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी या प्रमाणात घटनासमितीचे सभासद ठरवले गेले. देशाची फाळणी निश्चित झाल्यावर माउंटबॅटन योजनेनुसार मुसलमान बहुसंख्य प्रदेशांतील प्रतिनिधी बदलले गेले. आणि कॉंग्रेसच्या प्रतिनिधींचं प्रमाण ६९ टक्क्यांवरून ८२ टक्क्यांवर गेलं. 

काँग्रेसने पं. कुंझरू, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बॅ. मुकुंदराव जयकर, कन्हैयालाल मुन्शी यांना प्रतिनिधित्व दिलं. 

Image result for संविधान

बैठका सुरू झाल्या

डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या घटनासमितीत अनेक उपसमित्या होत्या. संघ अधिकार, संघ सरकार घटना, राज्य सरकार घटना, अल्पसंख्याक व मूलभूत अधिकारविषयक समिती इ. उपसमित्यांनी घटनासमितीचं काम सुलभ केलं. घटनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचं काम भारत सरकारचे घटनाविषयक सल्लागार सर बी. एन्. राव यांनी केलं.

काश्मीरात हिमवादळ - तीन जवान हुतात्मा

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या आराखडयाला अंतिम रूप देण्याचं काम केलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वातील मसुदा समितीनं. अल्लादी अय्यंगार, कन्हैयालाल मुन्शी आणि सय्यद मोहंमद सादुल्ला हे या समितीचे इतर सभासद होते.

घटनासमितीची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी झाली, पण भारत स्वतंत्र झाल्यानंतरच या प्रक्रियेला वेग आला. या घटनासमितीनं २ वर्षे ११ महिने १८ दिवस काम केलं आणि २६ जानेवारी १९५० पासून भारताची स्वतंत्र राज्यघटना अंमलात आली. 

Constitution Of India


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Republic Day 2020 Formation Of Indian Constitution