पोलिसांची भीती संपली अन् श्रीगोंदेत गुन्हेगारांची दहशत वाढली

संजय आ. काटे 
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

आरोपींकडे सापडले पिस्तुल 

श्रीगोंदे पोलिसांत बहुतांश टीम नवी आहे. मात्र येथील अवैध धंद्यावाल्यांनी त्यांच्याशी लगेच लगट करत चौकात गप्पा सुरू केल्याचे दिसते. यातून 'पोलिस आमच्या खिशात' हा संदेश दिला जात आहे. वाळू व इतर अवैध धंदे हे गुन्हेगारीचे मूळ असताना अनेक पोलिसांचे हे लोक मित्र बनल्याने सामान्यांना पोलिसांकडे जाताना अडचणी येत आहेत.

श्रीगोंदे : येथे गुन्हेगारांची दहशत वाढली आहे. त्यातच गोरक्षकांवर पोलिस ठाण्याच्या आवारात हल्ला झाला. पेडगाव येथील महिलेच्या खुनातील मुख्य आरोपी पसार असून, शहरात झालेल्या घरफोड्यांचा तपास नाही. त्यामुळे सामान्य दहशतीखाली असून गुन्हेगारांना पोलिसांची भीती नसल्याचे वास्तव आहे. 

महिनाभरात येथील गुन्हेगारीने कमालीची उचल खाल्ली. निरीक्षक बाजीराव पोवार यांना ही सलामीच आहे. शहरात एकाच रात्रीत झालेल्या घरफोड्यांमध्ये खुद्द पोलिस व वकीलच सुटले नाहीत. ते चोर पकडण्यात पोलिस अपयशी ठरले. त्यानंतर पेडगाव येथे दरोड्यात सुशिला धगाटे यांचा खुन झाला. त्यातील एक स्थानिक आरोपी पकडला असला तरी ऐवज व पुढे आलेले मुख्य आरोपी मात्र फरार असल्याने हा गुन्हा उघड झालेला नाही. 

मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीतील तीन जण पकडले. मात्र त्याचवेळी त्यातील एकाला सोडल्याची चर्चा झाली. सगळ्यात धक्कादायक म्हणजे यातीलअटकेत असणाऱ्या आरोपीच्या नातेवाईकाने लपविलेले पिस्तुल पोलिसांनी सोमवारी रात्री विहीरीतून काढले. या टोळीतील इतर आरोपींचा शोध घेण्यात पोलिस कमी पडत असतानाच, ठाण्याच्या दारात पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे येथील गोरक्षकांवर जीवघेणा हल्ला झाला. यात सहा जण जखमी झाले. या हल्ल्याने पोलिस हतबल दिसले.  सहाय्यक अधिक्षक घनशाम पाटील यांनी सगळे आरोप पकडल्याशिवाय श्रीगोंदे सोडणार नसल्याची घोषणा केली मात्र साठपैकी केवळ पाच आरोपी हाती लागताच त्यांनी नगर गाठले.  

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: nagar news shrigonde crime rise police inaction