शेतकऱ्यांनो, ही बातमी तुमच्यासाठी; आता शेतीच्या नुकसानीची माहिती द्या कागदपत्रांशिवाय!

किरण भदे
Monday, 19 October 2020

या अॅपमुळे शेतकऱ्यांना पीकविमा मिळवणे सोपे झाले असून पीक विम्याबाबत उदासीन असणारे शेतकरी पुढील वर्षी निश्चित पीक विम्याचा वापर करतील, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

नसरापूर (पुणे) : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध सेवांचा लाभ घेता यावा, यासाठी भारत सरकारच्या शेतकरी कल्याण मंत्रालयाने शेतकऱ्यांना वापरास सोपे असे मोबाईल अॅप तयार केले आहे. या अॅपव्दारे पीक नुकसानीची माहिती नोंदवण्यास प्राधान्य देण्यात आले असून नोंदणीसाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही.

शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ऑनलाइन परीक्षेचा सराव करता येणार फ्रीमध्ये!​

पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा करावा लागू नये, तसेच कागदपत्रांची गरज भासू नये, सुलभ पद्धतीने नुकसानीची माहिती विमा कंपनीकडे जाऊन त्यावर त्वरीत कार्यवाही व्हावी, यासाठी या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अॅपव्दारे शेतकरी शेतीच्या नुकसानीची माहिती तत्काळ देऊ शकतो. आणि ही माहिती नोंदवताना कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता भासत नाही. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमधून याचा वापर करता येतो. नुकसानीचे फोटो किंवा व्हिडीओ अपलोड करण्याची सुविधा देखील यामध्ये असून नोंदणीनंतर शेतकऱ्यांना पूर्वसूचना क्रमांक दिला जातो. या सेवेबरोबरच अॅपवर विमा हप्त्याच्या गणनेबाबत सुविधांबरोबरच योजनेसंबधीच्या अडी-अडचणींविषयी माहिती आणि शेतकऱ्यांच्या शंकांचे निराकरण करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे.

'त्यांच्या मैत्रीला सलाम!'; कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मशिनची सुविधा देतात एकदम फ्री!

अॅप कसे कार्यान्वीत करा :
हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून त्या ठिकाणी क्रॉप इन्शुरन्स अॅप सर्च केल्यानंतर ते मोबाईलमध्ये इनस्टॉल करावे. त्यानंतर अॅपमध्ये उपलब्ध करून दिलेल्या विविध सेवांचा लाभ घेता येणार आहे. हे अँप डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

http://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central

कोरोनाच्या भीतीमुळे मोटारींचा खप वाढला!​

अॅप कसे वापरावे?
- शेतकरी नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पासवर्डव्दारे अॅपवर लॉग-इन करु शकतात किंवा 'लॉग-इनशिवाय पुढे जा' हा ऑप्शन निवडून लॉग-इनशिवाय ही सुविधा वापरू शकतात.
- पुढील पानामध्ये पीक नुकसानीची माहिती हा टॅब निवडल्यानंतर ओटीपी मिळवण्यासाठी मोबाईल नंबर नमूद करणे  गरजेचे असते. 
- ओटीपी प्राप्त झाल्यावर आणि तो नमूद केल्यानंतर शेतकऱ्यांना हंगाम, वर्ष, योजना, राज्य इत्यादी तपशील भरावे लागतात.
- पुढील पानावर जाण्यासाठी अर्जाचा स्त्रोत आणि अर्जाचा क्रमांक नमूद करावा लागतो.
- त्यानंतर विमा पॉलिसी तपशील तयार होतो आणि नुकसान भरपाईची नोंद करण्यासाठी बाधीत पीक निवडावे लागते. 
- त्यानंतर नुकसानीचा प्रकार, तारीख, शेरा नमूद करुन नुकसानीचे फोटो अपलोड करावे लागतात. सर्व तपशील यशस्वीरित्या भरून झाल्यावर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमीट बटणावर क्लिक करावे.
- तपशील सबमीट झाल्यावर त्याचे पुष्टीकरण आणि भविष्यातील संदर्भासाठी एक डॉकेट नंबर स्क्रीनवर उपलब्ध होतो. (जर शेतकऱ्याकडे अर्ज क्रमांक नसेल, तर त्याने पाँलिसीच्या तपशील पानावर इतर पर्याय निवडा वर क्लिक करावे आणि आवश्यकतेनुसार वैयक्तिक, बँक, पीक आणि जमीन तपशील द्यावा.)

या अॅपमुळे शेतकऱ्यांना पीकविमा मिळवणे सोपे झाले असून पीक विम्याबाबत उदासीन असणारे शेतकरी पुढील वर्षी निश्चित पीक विम्याचा वापर करतील, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे. तसेच या अॅप वापराबाबत काही शंका असल्यास आपल्या जवळच्या कृषी सहाय्यक किंवा अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे अवाहन करण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ministry of Farmers Welfare has developed a special mobile app for farmers