राज्यपाल अचानक चढले जलकुंभावर, काय आहे कारण?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 डिसेंबर 2019

तुम्ही सत्तर वर्षांचे झाले आहात. कुणी तुम्हाला एकटेच पाण्याच्या टाकीवर चढून दाखवा असे म्हटलं तर तुम्ही काय कराल. काहीही बोलता का? ही वय आहे का टाकीवर चढण्याची. आता मी तरुण नाही की पटकन चढून जाईल. मला मारूनच दम घेणार का? असच काही म्हणाल. मात्र, 77 वर्षीय राज्यपाल याला अपवाद ठरले... 

नागपूर : पाणीपुरवठा एवढीच जबाबदारी असलेले जलकुंभ ऐरवी दुर्लक्षितच. परंतु, शोले चित्रपटात पाण्याच्या टाकीवर चढून धर्मेंद्रने "वीरूगिरी' केली. तेव्हापासून पाण्याच्या टाकीला महत्त्व प्राप्त झाले. पाण्याच्या टाकीवर चढणे तसे कष्टप्रदच आहे. वर्तुळाकार पायऱ्या लागोपाठ चालत जाव्या लागतात. विशेष म्हणजे, मध्ये थांबण्यासाठी कोणतीही सोय नाही. यामुळे तरुणही टाकीवर चढण्यास सहजासहजी धजावत नाहीत. मात्र, हीच पाण्याची टाकी 77 वर्षीय राज्यपालांमुळे पुन्हा चर्चेच आली आहे. कोणत्या आंदोलनासाठी नव्हे तर नागपूरच्या अवलोकनामुळे... 

हेही वाचा - मित्रासोबत पहाटे फिरायला गेला अन्‌...

नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा शनिवार हा शेवटचा दिवस. अधिवेशनानिमित्त नागपुरात मुक्कामी असणारे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांचे वास्तव्य राजभवन या शासकीय निवासस्थानी आहे. शहराची भौगोलिक स्थिती लक्षात घेता राजभवन "टॉप पॉइंट'ला आहे. याच परिसरात पाण्याची टाकीसुद्धा आहे. उंचावर असल्याने टाकीवरून कोराडी, त्याही पलीकडे सावनेर, बुटीबोरी, रामटेकची टेकडी स्पटपणे दिसते. वरून दिसणारे सौंदर्य अवर्णनीय असेच आहे. 

राज्यपाल महोदयांना टाकीवर चढून नागपूरचे अवलोकन करण्याचा मोह झाला. कोणताही वेळ न गमावता शुक्रवारी सायंकाळी अचानक राजभवन परिसरातील जलकुंभावर एकटेच टाकीच्या पायऱ्या चढू लागले. यामुळे सुरक्षेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची धांदल झाली. परंतु, त्यांनी सर्वांना खालीच थांबवून घेतले. टाकीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने ते वर चढले. टाकीवरून त्यांनी उपराजधानीच्या सुंदरतेचे अवलोकन केले. 

Image may contain: outdoor
हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने राजभवनावर सर्वत्र दिव्यांची रोषणाई केली आहे. येथील जलकुंभालाही दिव्यांची आरास लावण्यात आली आहे. याच जलकुंभावर चढून राज्यपालांनी नागपूरचे अवलोकन केले. 

मोबाईलच्या प्रकाशात खाली उतरले

कोणतीही पाण्याची टाकी अधूनमधून होणाऱ्या "वीरूगिरी' आंदोलनामुळे चर्चेत असते. कुणी मागण्यांसाठी तर कुणी प्रेमासाठी टाकीचा उपयोग करीत असतो. परंतु, 77 वर्षीय राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी या टाकीचा उपयोग नागपूरचे अवलोकन करण्यासाठी केला. ते स्वत: टाकीवर चढल्याने त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवणारा होता. त्यांच्या सेवेत असणारे सुरक्षारक्षक मात्र खालीच होते. टाकीवरून शहराचे सौंदर्य न्याहाळत असतानाच अंधार पडू लागला होता. स्वत:च्या मोबाईलचा लाईट सुरू करून ते पायऱ्यांनी पुन्हा खाली उतरले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The governor climbed on the water tank