भारत-चीन युद्ध पेटविण्याचा अमेरिकेचा प्रयत्न - चीन

वृत्तसंस्था
बुधवार, 26 जुलै 2017

अमेरिकेकडून दक्षिण चिनी समुद्रामध्ये राबविण्यात येत असलेल्या धोरणाचेच प्रतिबिंब भारतास व्यक्त करण्यात येत असलेल्या या पाठिंब्यामध्ये दिसून येत आहे. स्वत:च्या व्यूहात्मक फायद्यासाठी काही पाश्‍चिमात्य घटक भारत व चीनमध्ये युद्ध घडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यामुळे त्यांचे काहीच नुकसान न होता उलटपक्षी फायदाच होणार आहे

नवी दिल्ली - डोकलाममधील वादाच्या पार्श्‍वभूमीवर "वॉशिंग्टन एक्‍झामिनर' या प्रसिद्ध प्रकाशनामध्ये भारतास पाठिंबा व्यक्त करणारा लेख प्रसिद्ध झाल्यामुळे चीनकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. भारत व चीनमध्ये संघर्ष व्हावा, यासाठी अमेरिका प्रयत्न करत असल्याची टीका "ग्लोबल टाईम्स' या चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्रामधून करण्यात आली आहे.

'ट्रम्प मस्ट सपोर्ट इंडिया अगेन्स्ट चायना' या शीर्षकाचा लेख दोन दिवसांपूर्वी वॉशिंग्टन एक्‍झामिनरमध्ये प्रसिद्ध झाला होता. या लेखामध्ये चीनच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्‍वभूमीवर भारतास अमेरिकेकडून पाठिंबा देण्यात यावा, अशा आशयाचे स्पष्ट आवाहन ट्रम्प प्रशासनास करण्यात आले होते. यामुळे ग्लोबल टाईम्समधून या लेखावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

"जगात जेथे संघर्ष उद्‌भवितो तेथे अमेरिका दिसून येतेच. अमेरिकेकडून समस्या सोडविण्यासंदर्भात नि:पक्षपाती भूमिका क्‍वचितच घेण्यात येते. एक्‍झामिनरमधील या लेखामध्ये चीनकडून असलेला धोका अधिक फुगवून सांगण्यात आला आहे. यामध्ये आश्‍चर्य काहीच नाही. याशिवाय, भारत-अमेरिकेमधील संबंधांचेही चित्र अधिक भडकपणे रंगविण्यात आले आहे. अमेरिकेकडून दक्षिण चिनी समुद्रामध्ये राबविण्यात येत असलेल्या धोरणाचेच प्रतिबिंब भारतास व्यक्त करण्यात येत असलेल्या या पाठिंब्यामध्ये दिसून येत आहे. स्वत:च्या व्यूहात्मक फायद्यासाठी काही पाश्‍चिमात्य घटक भारत व चीनमध्ये युद्ध घडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यामुळे त्यांचे काहीच नुकसान न होता उलटपक्षी फायदाच होणार आहे. दक्षिण चिनी समुद्राबाबतही अमेरिकेकडून हेच धोरण राबविण्यात येत आहे,'' अशा आशयाची भूमिका ग्लोबल टाईम्समधील या लेखामधून व्यक्त करण्यात आली आहे.

अमेरिकेवर चीनकडून भारतासंदर्भात पक्षपाती धोरणाचा आरोप करण्यात आला असला; तरी दुसरीकडे ट्रम्प प्रशासनाने अमेरिका-भारत द्विपक्षीय संबंधांकडे फारसे लक्ष दिले नसल्याचे तर्कट चीनकडून देण्यात आले आहे! "अर्थात भारत-चीन संघर्षामधून अमेरिकेस फार फायदा होणार नसून, अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे चीन स्वत:चे भूमीचे संरक्षण करणे थांबविणार नाही,' असा इशाराही या लेखामधून देण्यात आला आहे. 

आशिया-प्रशांत महासागर भागात राजनैतिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी चीनकडून सातत्याने "अधिकाधिक आक्रमक, बळजबरीचे' धोरण राबविण्यात येत असल्याचे निरीक्षण सीआयए या अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचे सहाय्यक संचालक मायकेल कॉलिन्स यांनी नुकतेच नोंदविले आहे. या पार्श्वभूमीवर चीनची ही प्रतिक्रिया त्य्यांत संवेदनशील मानण्यात येत आहे. 

भारताने सैन्य माघारीस स्पष्ट नकार दिल्यामुळे चीनकडून तिबेट भागात सैन्याची आक्रमक हालचाल करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी "भारत स्वत:च्या हिताचे संरक्षण करण्यास सक्षम' असल्याचे राज्यसभेत सांगितले आहे. 

डोकलाममध्ये लष्करांच्या हालचालींवरून निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनने कोणत्याही वादाशिवाय थेट चर्चा करण्याचे औपचारिक आवाहन अमेरिकेकडूनही करण्यात आले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: 'US is instigating military clash between China, India'