काय घडलं दिवसभरात?

टीम ई सकाळ
सोमवार, 8 मे 2017

जगभरात दिवसभरात घडलेल्या घडामोडी एका क्लिकवर

मोबाईल अॅप डाऊनलोड करा

जगभरात दिवसभरात घडलेल्या घडामोडी एका क्लिकवर

राज्यातील शाळांमधून शितपेये, चॉकलेट हद्दपार
पुणे : राज्यातील शाळांमधून आता शितपेये, चॉकलेट, मिठाई, पेस्ट्री, तळलेले चिप्स, पिझ्झा, बर्गर, जाम, जेली हद्दपार करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहेत.

सोलापुरात दुसऱ्या दिवशी वादळासह पाऊस
सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सुमारे 20-25 मिनिटे झालेल्या या पावसात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली

पुणे महापालिकेच्या 'जावईबापूं'ची बदली
पुणे: महापालिकेचे 'जावईबापू' समजले जाणारे अर्थात, महापालिकेचे अतिरक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांची अखेर महापालिकेतून बदली झाली. विशेष म्हणजे, त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पावणेदोन वर्षांनी म्हणजे, पाच वर्षांनी बदली झाली.

पुणे शहरातील कचरा उचलण्यास झाली सुरवात
पुणे: फुरसुंगी आणि उरळी देवाची ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतल्याने शहरातील कचरा उचलण्यास आजपासून (सोमवार) सुरवात झाली. डेपोत कचरा टाकण्यात येत असला तरी, जुने आणि नव्या प्रकल्पांच्या माध्यमातून कचऱ्यावर प्रक्रियावरील कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे साधारणत एक हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया होईल तर; सहाशे टन कचरा डेपो टाकण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

आम्ही अचानक ‘सेक्युलर’ कसे झालो?'- शिवसेना
मुंबई : "ज्यांच्याकडून निधर्मी भारताला हिंदूराष्ट्र करण्याची अपेक्षा होती त्यांनी ‘युनो’त भारत निधर्मी असल्याची बांग दिली," अशी टीका शिवसेनेने केली आहे. '‘गर्व से कहो हम हिंदू है’वाल्यांचे राज्य सध्या देशात आले आहे’’ हे जगाला ओरडून सांगण्याची हीच वेळ असताना आम्ही अचानक ‘सेक्युलर’ कसे झालो?' असा चिमटा शिवसेनेने काढला आहे.

घरी उशीरा का आल्याचे विचारल्याने मुलाकडून वडिलांचा खून
कोल्हापूर - घरी वेळाने का येतो असा जाब विचारल्याचा कारणावरून काल रात्री विक्रमनगरात मुलग्यानेच बापावर चाकूने वार करून खून केला. पिरसाब महंमद मुल्ला (वय 55,रा.शाहू कॉलनी, विक्रमनगर) असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी पिरसाब यांचा मुलगा रफिक पीरसाब मुल्ला (वय 30) याला अटक केली. याबाबतची फिर्याद आरोपीची बहिण सब्जाबी मुल्ला यांनी राजारापुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी खुनासाठी वापरलेला चाकू जप्त केला. 

टायरच्या तापमानाची पातळी सांगणारे उपकरण तयार
पुणे - खूप वेळ वाहन चालवत असताना टायरचे तापमान वाढून ते फुटण्याची भीती अनेकदा वाटते. पण आता काळजी करू नका. आता या भीतीचं कारण राहणार नाही. टायरच्या तापमानाने धोकादायक पातळी ओलांडल्याची सूचना देणारे उपकरण भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स विभागातील प्रा. राजेश घोंगडे यांनी विकसित केले आहे. 'टायर टेंपरेचर मॉनिटरिंग सिस्टिम' असे त्या उपकरणाचे नाव आहे. 

अपघात टाळणारे 'टीजे टायर्स'
महाविद्यालयाच्या वार्षिक परीक्षेसाठी जाताना दुचाकी पंक्‍चर झाली.. परीक्षा केंद्रावर उशिरा पोचल्याने शिक्षकांना विनवण्या केल्यानंतर समीर पांडा यांना परीक्षेला बसण्याची परवानगी मिळाली. या प्रसंगानंतर समीर यांच्या मनात 'टायर टेक्‍नॉलॉजी' विकसित करण्याचा विचार घोळू लागला. पंक्‍चर झाल्यानंतरही अपघात होणार नाही, वाहनचालकाला तोल राखता येईल व अतिवेगामुळे तापणारही नाही, असा टायर तयार करण्याचे त्याचं स्वप्न होते. या संकल्पनेवर समीर यांनी गेली दहा वर्षे काम केले आणि दोन वर्षांपूर्वीच त्यांच्या 'टीजे टायर्स' (www.tycheejuno.com) या स्टार्ट अपला या तंत्रज्ञानाचे पेटंट मिळाले.

'एसबीआय'कडून गृहकर्जाच्या व्याजदरात कपात
मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने (एसबीआय) नव्या कर्जदारांसाठी गृहकर्जाच्या दरात कपात जाहीर केली आहे. 30 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जाच्या दरात पाव टक्क्याची (0.25 टक्के) कपात जाहीर करण्यात आली आहे. तो कर्जाचा दर आता 8.35 टक्क्यांवर आला आहे.

इरोम शर्मिला या ब्रिटीश मित्राशी होणार विवाहबद्ध
इंफाळः मणिपूरमधून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अस्फा) मागे घेण्याच्या मागणीसाठी 16 वर्षे उपोषण करणाऱया इरोम शर्मिला या आपल्या ब्रिटीश मित्रासोबत जुलै महिन्यात विवाहबद्ध होणार आहेत.

NEET परीक्षेसाठी विद्यार्थिनीला काढायला लावले अंतर्वस्त्र !
चेन्नई : राष्ट्रीय पात्रता तथा प्रवेश परीक्षा 'नीट' देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीला अंतर्वस्त्र काढण्यास सांगितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही परीक्षा देणाऱ्या एका तमीळ विद्यार्थिनीने हा धक्कादायक प्रकार घडल्याचे सांगितले. 

लालूंना सूट नाही, चार स्वतंत्र खटले चालवा- सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळाप्रकरणी कोणतीही सवलत देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. याशिवाय लालू प्रसाद यांच्याविरोधात याप्रकरणी दाखल करण्यात आलेले चारही खटले स्वंतत्रपणे चालविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

मॅक्रॉन यांच्यासोबत काम करण्यास मोदी उत्सुक
नवी दिल्ली : भारत-फ्रान्स यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत जवळून काम करू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. फ्रान्सच्या अध्यक्षपदासाठी काल 65.3 टक्के (संध्याकाळी 5 वाजेपर्यंत) मतदान झाले. अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी 1969 नंतर हे सर्वांत कमी मतदान आहे. 

ईशान्येला करायचंय आग्नेय आशियाचं प्रवेशद्वार- मोदी
नवी दिल्ली : ईशान्य भारताची ओळख आग्नेय आशियाचे प्रवेशद्वार म्हणून करण्यासाठी या भागातील सात राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर सरकार भर देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.

कपिल मिश्रा हे भाजपचे एजंट - आप
नवी दिल्ली - मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आलेले आम आदमी पक्षाचे (आप) नेते कपिल मिश्रा हे भाजपचे एजंट असून, ते भाजपला जाऊन मिळाले आहेत. भाजपने आम्हाला नैतिकतेचे धडे देऊ नयेत, असे आप नेते संजय सिंह यांनी आज (सोमवार) सांगितले. 

माझे अश्रू म्हणजे माझी कमजोरी नाही- चारु निगम
नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे आमदार राधा मोहन अगरवाल हे माझ्यावर ओरडल्यानंतर डोळ्यात आलेले अश्रू म्हणजे माझी कमजोरी नाही, असे आयपीएस अधिकारी चारू निगम यांनी फेसबुकवरून आज (सोमवार) म्हटले आहे.

मणिपूरमध्ये स्फोटात चार जवान जखमी
इंफाळः मणिपूरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर आज (सोमवार) सकाळी झालेल्या स्फोटामध्ये चार जवान जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.

चँपियन्स करंडकासाठी युवराज, रोहित, धवन संघात
नवी दिल्ली - चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज (सोमवार) निवड करण्यात आली असून, युवराजसिंग, शिखर धवन यांनी पुन्हा संघात स्थान देण्यात आले आहे. आश्विन, रोहित शर्मा आणि शमी यांनी दुखापतीतून सावरत संघात पुनरागमन केले आहे. 

केजरीवालांना मंत्र्याने दिले दोन कोटी- कपिल मिश्रा
नवी दिल्ली : आम आदमी पक्षातील अंतर्गत कलह शिगेला पोचला असून, पाणीपुरवठा मंत्रिपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर कपिल मिश्रा यांनी थेट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. केजरीवाल यांना सत्येंद्र जैन यांनी 2 कोटी रुपये दिल्याचे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले, असा खळबळजनक आरोप आज त्यांनी केला. 

भाजप आमदाराची महिला 'आयपीएस'वर अरेरावी
गोरखपूर - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर जिल्ह्यातील भाजपच्या आमदाराने महिला आयपीएस अधिकाऱ्याला भररस्त्यात आरडाओरड केल्याने तिला अश्रू अनावर झाले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप आमदारावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

भारताकडून पाकिस्तानचे चार बंकर उद्ध्वस्त
नवी दिल्ली - पाकिस्तानी सैन्याकडून दोन भारतीय जवानांचे शिरच्छेद केल्याच्या कृत्याचा भारताने चोख प्रत्युत्तर दिले असून, भारतीय जवानांनी पाकिस्तानचे चार बंकर उद्ध्वस्त केले आहेत.

इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष 
पॅरिस : फ्रान्सच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इमॅन्युएल मॅक्रॉन यांना जनतेने कौल दिला आहे. मॅक्रॉन यांनी उजव्या विचारसरणीच्या मरीन ल पेन यांचा पराभव केला. मॅक्रॉन हे नेपोलियन बोनापार्टनंतरचे फ्रान्सचे सर्वांत तरुण नेते ठरले आहेत. 

बंदूकीच्या धाकाने पाक व्यक्तीशी विवाह; भारतीय महिला
इस्लामाबादः पाकिस्तानी व्यक्तीने बंदूकीचा धाक दाखवून विवाह करण्यास भाग पाडले, असे भारतीय महिलेने सांगितल्यामुळे या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.

85 व्या वर्षी एव्हरेस्ट चढताना शेरचान यांचा मृत्यू
काठमांडू : जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट वयाच्या 85व्या वर्षी चढण्याच्या प्रयत्नात नेपाळचे मिन बहादूर शेरचान मृत्युमुखी पडले. या घटनेमुळे एव्हरेस्ट चढण्यासाठी वयोमर्यादा घालण्याचा विचार नेपाळचे प्रशासन करीत आहे.