lata mangeshkar 
Blog | ब्लॉग

विश्‍वकुटुंबिनी

सुलभा तेरणीकर

खाली शाखा आणि वर मुळं असलेला लतादीदींच्या गाण्यांचा सळसळता अश्‍वत्थ खरोखर गूढ आणि रहस्यमय आहे. त्यांच्या संघर्षमय जीवनाचा वेध घेणेही अवघड आहे. त्यांच्या संगीतमय जीवनाला भारतरत्नाची झळाळी लाभली आहे, तर नव्वदीच्या टप्प्यावर त्यांना ‘डॉक्टर ऑफ द नेशन’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे. खऱ्या अर्थानं त्या विश्‍वकुटुंबिनी झाल्या आहेत. त्यानिमित्त.

लतादीदींच्या लोकविलक्षण जीवनाचे अनेक पैलू आहेत. त्यातली त्यांच्या बालपणीच्या तीन घटनांची सूत्रं शोधली, तर त्यांची वेगळी वाट पाहता येईल.

काळ १९३२-३३ चा. संगीत रंगभूमीच्या विपन्नावस्थेची परमावधी झालेली. सांगलीतल्या घरात बळवंत संगीत नाटक मंडळीचे मालक मा. दीनानाथ नाटक कंपनीचे कुटुंब सावरण्याच्या विचारात अस्वस्थ आहेत. एका दिवेलागणीला आपल्या शिष्याला गाणं शिकवत आहेत. उजळणी करायला सांगून थोडे बाहेर जाऊन येत आहेत. तेव्हा अवघी साडेचार वर्षांची लता त्या शिष्याला सांगतीय... ‘बाबांनी असं शिकवलंय मी म्हणून दाखवते तुला.’ वडील ते ऐकून चकित होऊन म्हणतात- ‘‘माझ्या घरातच गवई आहे. मी दुसरं कुणाला काय शिकवू?’’

लतादीदींची शिकवणी सुरू झाली. बाबांचं निधन होईपर्यंत ती अखंड राहिली. बेचाळीस साली पुण्यात एका संध्याकाळी ते माईंना म्हणाले, ‘‘लताच्या रूपाने मला उद्याचा सूर्योदय दिसतोय. तो पाहायला मी मात्र नसणार.’’ अवघ्या साडेबारा वर्षे वयाच्या मुलीला वडिलांनी जवळजवळ दीडशे चिजा शिकवून पारंगत केलं होतं. 

दुसरी घटना ‘सौभद्र’ नाटकात नारदाचं काम करणारा नट गैरहजर असल्यावर मी करते ना काम म्हणून पुढे आलेली आठ-नऊ वर्षांची मुलगी सांगते, ‘‘बाबा मी वन्समोअर घेणार!’’

‘पावना वामना या मना’ला हमखास वन्समोअर घेणाऱ्या पिटुकल्या नारदाला विंगेत वडलांनी प्रेमभराने जवळ घेतले. सुरांवर हुकमत नव्हे तर गाणं रंजक करण्याचा वस्तुपाठ आणि आत्मविश्‍वास खूप बालपणीच रुजलेला संस्कार... आणि असामान्य धैर्यही.

लतादीदींच्या बालपणीची आणखी एक घटना १९४१ मध्ये पुण्यात ‘खजांची’च्या गाण्याची स्पर्धा जिंकली. मेडल्स आणि बक्षीस मिळालेला दिलरुबा घेऊन आलेल्या मुलीला वडील म्हणाले- ‘‘यश डोक्‍यात जाऊ देऊ नकोस, तुला खूप मोठं व्हायचं आहे आणि खूप पुरस्कार मिळवायचे आहेत.’’

या तीन घटनांनी लतादीदींच्या बालपणीचा काळ आणि भावी काळ उजळलेला आहे.

वडिलांच्या अकाली निधना-नंतरचा संघर्षमय इतिहास सर्वश्रुत आहे. आपल्या कुटुंबाचं कर्तेपण शिरावर घेणाऱ्या लतादीदींचा प्रवास पुणे, कोल्हापूर ते मुंबई असा झाला, तो खडतर होता.

मा. विनायक यांच्या ‘प्रफुल्ल पिक्‍चर्स’मध्ये बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या लतादीदींनी आपल्या वडिलांची मा. दीनानाथ यांची पहिली पुण्यतिथी व्हावी, असा आग्रह धरला आणि मंगेशकर कुटुंबीय मा. दीनानाथांची, आपल्या बाबांची पुण्यतिथी आजही स्वरोत्सव साजरा करून करतात. मुंबईला आल्यावर मा. विनायक यांचे १९४७ साली अकाली निधन झाले. हा मोठा धक्का होताच. पण लता मंगेशकर नावाचा दिव्य स्वर उदयाला आल्याचा मुहूर्तही भारतीय स्वातंत्र्याचा होता. भारतीय संगीताच्या क्षितिजावर मोठे कलावंत झगमगत होते. खूप संघर्षमय कालखंड होता. पण अल्पावधीतच लता मंगेशकर या आवाजाने भारतीयांच्या मनात घर केलं.

हिंदी चित्रपटसृष्टीत उभं राहायचं तर उर्दू भाषा यायला हवी. गाण्याचा रियाजही रोज हवाच. आपल्या भावंडांनी खूप शिकून मोठं व्हावं, असं त्यांना वाटत होतं; पण सुराच्या ओढीनं झपाटलेली मंगेशकर भावंडं आपापल्या वेगळ्या वाटेनं गाण्याची साधना करीत राहिली... आपल्या भावंडांच्या मागे ठामपणे उभे राहणाऱ्या लतादीदींना त्यांच्या भावंडांनीही प्रेमाचे संरक्षण द्यावं, हे एक हृद्य चित्र आहे.

‘लता मंगेशकर यांच्या उदयानंतरचे चित्रपटसंगीत’ हा तर जाणकारांच्या, अभ्यासक रसिकांचा जिव्हाळ्याचा विषय. सुवर्णयुगाची नांदी झाली आणि लतास्वरांनी भारताचे आकाश भरून गेले. चित्रपटसंगीताच्या संगीतकारांचे, कवी लेखकांचे, दिग्दर्शक, अभिनेत्यांचे विश्‍व आपण जोडू पाहिले तर भारताचा एक सुंदर प्राकृतिक नकाशा तयार होईल. अखंड भारतातील मुलतान, रावी पार असलेलं लाहोर, इच्छामती मेघनातीरीचे पूर्व बंगाल, कोलकता, राजस्थान असे कितीतरी... वेगवेगळ्या गायनशैली, नृत्यशैली, लोकगीत यांचा मेळ असलेलं संगीत एका समर्थ आवाजाची जणू वाट पाहत होतं. लता मंगेशकर या संगीताची राज्ञी ठरली नाही तर स्फूर्तिदेवताही ठरली.

लतादीदींच्या आवडत्या प्रियजनांनी, भावंडांनी मोठा लौकिक मिळवला आहे. अष्टपैलू आशा सर्व तऱ्हेची गाणी बिनतोड गाते, असं म्हणताना त्यांना कौतुक वाटते. मीना सुरेल गाते, याचा अभिमान आहे. गोड गळ्याची, कर्तव्यदक्ष, व्यवहारचतुर, उत्तम चित्रकार उषा आपल्या सदैव सोबत असते, याचं कौतुक वाटतं. बाळचं संगीत काळापुढचे आहे, याचा त्यांना अभिमान वाटतो.

माईबाबांच्या नावाचं हॉस्पिटल ही तर त्यांच्या मर्मबंधातली ठेव. आपल्या कुटुंबावर प्रेमाची पाखर घालणाऱ्या दीदींचं आयुष्य आज एका सुरेल वळणावर आहे. भारतकन्या म्हणून गौरवताना आज भारतीय धन्य झाले आहेत.

सर्वांना घेऊन मोठं होणाऱ्या लाडक्‍या लेकीसाठी कुणाला अभिमान वाटणार नाही?

***************************************

***************************************

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: नाशिकमधील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला

SCROLL FOR NEXT