काय घडलं दिवसभरात?

टीम ई सकाळ
मंगळवार, 9 मे 2017

जगभरात दिवसभरात घडलेल्या घडामोडी एका क्लिकवर

मोबाईल अॅप डाऊनलोड करा

जगभरात दिवसभरात घडलेल्या घडामोडी एका क्लिकवर

बाबासाहेब पुरंदरे श्री विठ्ठलाच्या दर्शना विना परतले...
पंढरपूरः महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे आज (मंगळवार) आले होते. श्री विठ्ठल मंदिराच्या पश्‍चिम दरवाजातून मंदिरात प्रवेश करत असताना तेथील पोलिसांनी त्यांना तेथून मंदिरात जाण्यास मनाई केली. त्यामुळे काही वेळ तिथेच थांबून श्री. पुरंदरे हे श्री विठ्ठलाचे दर्शन न घेताच पुण्याकडे रवाना झाले. ही घटना आज दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली. श्री.पुरंदरे यांच्या संदर्भात घडलेल्या या घटनेचा निषेध म्हणून स्थानिक व्यापाऱ्यांनी काही वेळ दुकाने बंद ठेवून निषेध केला.

उन्हाळी पर्यटनाकडे पर्यटकांची पाठ
मालवण : मे महिन्यातील म्हणजेच सुटीच्या हंगामातील येथील पर्यटन दरवर्षीच्या तुलनेत फारच कमी झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. नोटाबंदी पाठोपाठ वायरी भुतनाथ येथील समुद्रात काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्घटनेचा फटका पर्यटन हंगामाच्या या शेवटच्या टप्प्यात व्यावसायिकांना बसल्याचे चित्र आहे. सद्यःस्थितीत मुंबईकर चाकरमानी वगळता केवळ पश्‍चिम महाराष्ट्रातून दाखल झालेल्या पर्यटकांच्या माध्यमातून बाजारपेठेत किमान उलाढाल होत आहे. अर्थकारणात गती न मिळाल्याने पावसाळ्यात करायचे काय? याची चिंता व्यावसायिकांना लागली आहे.

भारताच्या झूलन गोस्वामीचा विश्वविक्रम
पॉटचेफस्ट्रुम (दक्षिण आफ्रिका) : भारताची वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी हिने महिला वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेटचा उच्चांक प्रस्थापित केला. तिने ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज कॅथरीन फिट्झपॅट्रीक हिचा 180 विकेटचा विश्वविक्रम मोडला.

पुणे-मुंबई 'एक्‍स्प्रेस-वे'वर लहान वाहनांसाठी स्वतंत्र लेन
पुणे: पुणे-मुंबई "एक्‍स्प्रेस-वे'वर खालापूर ते कुसगाव टोल नाक्‍यादरम्यानच्या खंडाळा घाटात जड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एक लेन लहान वाहनांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय महामार्ग पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी "व्हाइट बॅरिअर'चा वापर करण्यात येणार आहे.

लष्कराने वीरपत्नीला दिलेला चेक झाला 'बाऊन्स'
लखनौ- दहशतवाद्यांबरोबर दोन हात करत असताना वीरमरण आलेल्या जवानाच्या पत्नीला लष्कराने काही रक्कमेचा चेक दिला. परंतु, तो 'बाऊन्स' झाला आहे, अशी माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली. जम्मू-काश्मीरमधील माछिल सेक्टरमध्ये 22 नोव्हेंबर 2016 रोजी दहशतवाद्यांनी जवानांच्या तुकडीवर हल्ला केला होता. दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत 3 जवान हुतात्मा झाले होते. यामध्ये उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथील मनोज या जवानाचा समावेश होता.

महसूलमंत्र्यांचे कोळीगीत अन्‌ बालमित्रांचा जल्लोष!
कोल्हापूर : टिमक्‍याची चोळी बाई, रंगान फुलायली...तुझी माझी जमली जोरी माझे वसयकरीण बाय गो... असा सूर आज (मंगळवार) राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी छेडला अन्‌ त्या तालावर बालमित्रांनी अक्षरशः जल्लोष साजरा केला. (व्हिडिओ पाहा)

कराड तालुक्यात एक मुलगा पाण्यात बुडाला
कराड : सैदापुर (ता. कराड) येथे आज (मंगळवार) दुपारी एकच्या सुमारास तिघेजण पाण्यात बुडू लागली होती. तिघांपैकी दोघेजण पाण्याबाहेर आले तर एक जण बुडाला आहे.

अॅमेझॉनकडून कॅनडात भारताच्या चुकीच्या नकाशाची विक्री
नवी दिल्ली - अॅमेझॉनकडून कॅनडामध्ये जम्मू-काश्‍मिरमधील वादग्रस्त भागाचा समावेश नसलेला नकाशा विक्रीसाठी उपलब्ध असल्याची बाब समोर आली आहे.

कोकण राणेमुक्त झाल्याने राणेकंपनी सैरभैर : कायंदे
मुंबई : ''कोकण राणेमुक्त झाल्याने राणेकंपनी सैरभैर झाली आहे. त्यामुळे राणे पितापुत्र बाष्कळ विधाने करीत आहेत. त्यांच्या या विधानांकडे शिवसेना मुळीच लक्ष देत नाही,'' अशी कठोर टीका शिवसेना प्रवक्‍त्या मनीषा कायंदे यांनी 'सरकारनामा' शी बोलताना केली. 

न्यायालयाच्या अवमानप्रकरणी मल्ल्या दोषी; 10 जुलैला हजर राहण्याचे आदेश
नवी दिल्ली - भारतातील बँकांकडून घेतलेले नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून भारताबाहेर गेलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांना न्यायालयाच्या अवमानप्रकरणी आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविले आहे. त्यांना 10 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

न्यायाधीश कर्नन यांना सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा
नवी दिल्ली : कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी. ए. कर्नन यांना अवमानप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. पदावर असताना शिक्षा ठोठावण्यात आलेले कर्नन हे पहिलेच न्यायाधीश ठरले आहेत.

सरन्यायाधीशांना सुनावली 5 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा
कोलकता : कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी. एस. कर्नान यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्यासह अन्य सहा न्यायाधीशांना अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्याअंतर्गत दोषी धरत पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

'मला सर्व पदावरून काढून टाका'; 'आप'च्या प्रवक्‍त्याची मागणी
चंडीगड : पंजाबमधील आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सुखपाल सिंह खारिया यांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा वर्तविली असून सर्व पदावरून काढून टाकण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे केली आहे.

केजरीवाल, तुमच्याविरुद्ध FIR करत आहे. आशीर्वाद द्या : कपिल मिश्रा
नवी दिल्ली : आम आदमी पक्षातून निलंबित करण्यात आलेले नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक खुले पत्र लिहिले असून त्यामध्ये तुमच्याविरुद्ध FIR करत असल्याचे सांगत "माझ्या जीवनातील सर्वात मोठे युद्ध लढण्यापूर्वी आपले आशीर्वाद मागण्यासाठी हे पत्र लिहित आहे', असे म्हटले आहे.

'आप'ला आणखी एक झटका; प्राप्तिकर विभागाची नोटीस
नवी दिल्ली - दिल्ली महापालिकेतील पराभव, कपिल मिश्रांचे अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप यानंतर आता आम आदमी पक्षाला (आप) आता आणखी एक झटका बसला असून, 2 कोटींच्या देणगीप्रकरणी प्राप्तिकर विभागाने आपला नोटीस पाठविली आहे.

सुरेशदादांच्या पक्षांतराचा अंतिम तळ भाजप?
जळगाव : राज्याच्या राजकीय क्षेत्रात बेधडक आणि निडर व्यक्तिमत्त्व असा लौकिक असलेले शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी यापुढे कोणतीही निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात त्यांच्या पुढील वाटचालीबाबत राजकीय क्षेत्रात तर्कतिर्कांना उधाण आले आहे. तथापि, राजकीय संन्यास घेण्याऐवजी ते नेतृत्वाच्या भूमिकेत राहण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. पक्ष बदलण्यात कधीही कमीपणा बाळगला नाही, त्यामुळेच आपला राजकीय जीवनाचा शेवट ते भाजपत स्थान मिळवून करतील काय, याबाबत त्यांच्या समर्थकांसह विरोधकांमध्येही चर्चा सुरू झाली आहे. 

आयपीएलमुळे मी भारतीय संघात : धवन
हैदराबाद - आयपीएलमधील कामगिरीमुळे मी चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात स्थान मिळवू शकलो, असे भारताचा सलामीवीर शिखर धवनने म्हटले आहे.

आयपीएल: 'दिल्ली' स्पर्धेबाहेर; कोण गाठणार बाद फेरी?
तरुण आणि गुणवान खेळाडूंवर अवलंबून असलेल्या 'दिल्ली डेअरडेव्हिल्स'च्या संघाला 'आयपीएल'च्या दहाव्या मोसमाची बाद फेरी गाठण्याच्या शर्यतीतून अखेर बाहेर पडावे लागले. यंदाच्या मोसमामध्ये दिल्लीच्या कामगिरीत सातत्याचा अभाव होता आणि याचाच फटका त्यांना बसला. आतापर्यंत 'आयपीएल-10'मध्ये केवळ 'मुंबई इंडियन्स'ने बाद फेरीतील स्थान निश्‍चित केले आहे. 

कॅनडाच्या पंतप्रधानांच्या नावावरून ठेवले सीरियातील शरणार्थ्याचे नाव
ओटावा - कॅनडामध्ये शरणार्थी म्हणून राहत असलेल्या सीरियातील जोडप्याने आपल्या मुलाचे नाव कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडेव यांच्या नावावरून ठेवले आहे. आता या मुलाचे नाव जस्टिन ट्रूडेव ऍडम बिलान असे असणार आहे.

20 मिनिटांत बुजणार रस्त्यावरील खड्डा
पिंपरी - आधुनिक पद्धतीने खड्डे बुजविणाऱ्या उपकरणाचे आज प्रात्यक्षिक घेण्यात आले. शहर अभियंता अंबादास चव्हाण यांच्यासह महापालिकेतील विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खड्डे बुजविण्याचे नवीन तंत्रज्ञान दाखविण्यात आले. तथापि, या उपकरणाबाबत पुढील कोणताही निर्णय झालेला नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. "इन्फ्रारेड रिसायकलिंग रोड पॅचिंग' असे या तंत्रज्ञानाचे नाव आहे. या तंत्रज्ञानामुळे केवळ वीस मिनिटात एक बाय दोन मीटरचा खड्डा बुजविता येणे शक्‍य होणार आहे. (व्हिडिओ पाहा)

'बाहुबली' को रोखनेवाला पैदा नहीं हुआ मामा!
नागपूर : 'जब तक तुम मेरे साथ हो मुझे मारनेवाला पैदा नहीं हुआ मामा'... बाहुबलीच्या या डायलॉगने जगभरातील चित्रपट रसिकांना भुरळ घातली. पण, आता कमाईची स्थिती बघता 'बाहुबली को रोखनेवाला पैदा नहीं हुआ' असेच म्हणण्याची वेळ आली आहे. पहिल्या आठवड्यात जगभरातून एक हजार कोटींचा गल्ला जमविणाऱ्या या चित्रपटाने अवघ्या दहा दिवसांमध्ये विदर्भातून साडेसहा कोटी रुपयांची 'ऐतिहासिक' कमाई केली आहे. 'बाहुबली' मॅनिया आणखी महिनाभर चालेल, असा अंदाजही व्यक्त होत आहे.

भरवशाच्या कांद्याने वर्षभरात केला 122 कोटींचा वांदा
येवला : गेल्या वर्षभरात तिन्ही हंगामांत पाऊस व वातावरणाचा मेळ बसल्याने शेतकऱ्यांनी विक्रमी क्षेत्रावर कांदा लावला; पण अपेक्षित भाव न मिळाल्याने त्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. मार्चअखेरपर्यंत येथील बाजार समितीत वर्षभरात तब्बल 30 लाख 71 हजार क्विंटल कांदा शेतकऱ्यांनी विक्री केला. मात्र, उत्पादन खर्च व नफा विचारात घेता शेतकऱ्यांना जवळपास 122 कोटी 85 लाखांचा तोटा सहन करावा लागला आहे.

शरीफ यांना न्यायालयात खेचणार : इम्रान खान
इस्लामाबाद: जम्मू आणि काश्‍मीर आणि अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांना पाठबळ देण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी ओसामा बिन लादेनकडून पैसे घेतल्याचा आरोप तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी आज केला. याप्रकरणी शरीफ यांना न्यायालयात खेचणार असल्याचेही खान यांनी स्पष्ट केले आहे.

मद्यविक्री बंदी : 500 मीटर मोजायला शासनाकडून सुरवात
पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांलगतच्या 500 मीटरच्या आतील मद्यविक्रीला बंदी करण्यात आल्यानंतर अनेक व्यावसायिकांनी त्यांची दुकाने 500 मीटरच्या बाहेर असल्याच्या तसेच संबंधित रस्ते महामार्ग नसल्याचे आक्षेप नोंदवले होते. या आक्षेपांची शहानिशा करण्यासाठी तसेच प्रत्यक्ष पुनर्मोजणी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करायला सुरुवात केली आहे. 

मदरशातील स्फोटात मुख्य मौलवी ठार
काबूल : अफगाणिस्तानमधील उत्तर परवान प्रांतातील चराकर येथील मदरशात बॉंबस्फोट होऊन मुख्य धर्मगुरू मौलवी अब्दुल रहिम हनाफी ठार झाले, तर चार विद्यार्थी जखमी झाले. मंगळवारी सकाळी हा स्फोट झाला.

गुजरातमध्ये 'ईव्हीएम' आमच्या ताब्यात देऊन बघा- आप
नवी दिल्ली- 'ईव्हीएम'मध्ये गुप्त कोडमुळे बदल करता येतो. गुजरातमध्ये निवडणूकीपुर्वी 3 तास मशिन आमच्या ताब्यात द्या, भाजपवाल्यांना एकही जागा जिंकता येणार नाही, असा दावा आम आदमी पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी आज (मंगळवार) दिल्ली विधानसभेत केला.

गोवा विधानसभेत जीएसटीला मंजुरी 
नवी दिल्ली - गोवा विधानसभेतील सदस्यांनी वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयकास एकमताने मंजुरी दिली. अप्रत्यक्ष करांसाठी पर्याय असणाऱ्या जीएसटीची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर गोव्याला कोणतेही नुकसान होणार नाही असे आश्वासन मनोहर पर्रीकर यांनी यावेळी सभागृहातील सदस्यांना दिले.