Sleeping Day
Sleeping Day  esakal
देश

Sleeping Day : पोर्तुगिजांनी गोव्यात मागे सोडलेला सांस्कृतिक वारसा; सिएस्ता किंवा वामकुक्षी

कामिल पारखे

Sleeping Day : गोव्यात मिरामारच्या जेसुईटांच्या पूर्व-नॉव्हिशिएट म्हणजे पूर्व-सेमिनरीत असताना वयाच्या सतराव्या वर्षी मला ही सवय लागली ती आतापर्यंत काही सुटलेली नाही. जेसुईटांच्या किंवा इतर कुठल्याही ख्रिस्ती धर्मगुरुंच्या संस्थेत सगळा जीवनक्रम अगदी शिस्तबद्ध पद्धतीने काळात असतो.

पहाटे साडेपाच वाजता पितळेची घंटी वाजवून सर्व मुलांना झोपेतून उठवून दिवसाची सुरुवात होई, तयारी करुन मननचिंतन आणि सकाळचा मिस्साविधी होई आणि रात्री साडेदहा वाजता पुन्हा घंटी वाजून आपापले दिवे मालवून सर्व प्री-नॉव्हिसांना आपल्या मच्छरदाणीच्या बेडमध्ये शिरावे लागे.

दिवसाच्या मध्यंतरात म्हणजे हाऊसमधल्या सर्वांनी एकत्रित जेवून आपापली ताटे धुऊन पुढचा अर्धा तास रिक्रिएशन पिरीयड म्हणजे विरंगुळा काळ हा पत्ते, बुद्धिबळ खेळण्यात, गिटार वाजवण्यात, कादंबऱ्या वाचत घालवायचा आणि बरोबर दीडच्या ठोक्याला बिडलने म्हणजे मॉनिटरने घंटी वाजविल्यावर पुन्हा एकदा आपल्या बेडवर दुपारच्या झोपेसाठी निद्रित व्हावे, यापासून कुणालाही सुटका नसे. या सक्तीच्या झोपेच्या वेळेत कुणालाही कसलाही आवाज करण्याची मुभा नसायची

दुपारची ही झोप म्हणजे सिएस्ता (Siesta)

गोव्यात सिएस्था एक अगदी संवेदनशील, जिव्हाळयाचा विषय आहे. सिएस्ताच्या वेळी कुणालाही भेट देणे, फोन करणे शिष्टाचारविरोधी समजले जाते. दुपारी चारनंतर मग सगळीकडे दैनंदिन व्यापार पुन्हा सुरु होतात. पत्रकारितेच्या व्यवसायात हा शिष्टाचार मी नेहेमीच पळत आलो आहे.

रविवारी आणि इतर सुट्टीच्या दिवशी कुणाही व्यक्तीला दुपारी फोन करणे मी शक्यतो या कारणासाठीच टाळत आलो आहे. त्याऐवजी दुपारी चारनंतर फोन करणे हा माझा नेहेमीचा शिरस्ता राहिलेला आहे. भारतात सगळीकडे परदेशी ख्रिस्ती मिशनरींच्या जीवनात सिएस्ता एक महत्त्वाची बाब असायची. बहुतेक ख्रिस्ती धर्मगुरुंच्या दिनचर्येत हे अनुकरण आजही होतेच. सिएस्ताच्या त्या एक तासाला त्यामुळेच आम्ही 'होली अवर' असेही म्हणत असू. लवकरच मी या सिएस्ताच्या कायमच्या प्रेमात पडलो.

मात्र एक तासानंतर अडीचला घंटी वाजल्यावर सिएस्था संपवून तयारी करुन कॉलेजच्या अभ्यासाला लागायचे. त्याकाळात आम्ही धर्मगुरु होण्यासाठी आलेलो आम्ही सर्व पूर्व- प्री-नॉव्हिस मुले मिरामार समुद्रकिनाऱ्यासमोर असलेल्या धेम्पे आर्टस्-सायन्स कॉलेजात किंवा पणजीतल्या डेम्पो कॉमर्स कॉलेजात शिकत होतो. याकाळात दुपारच्या जेवणानंतर गाढ सिएस्ता घेण्याची ती सवय मला लागली ती अगदी कायमचीच !

श्रीरामपूरला लहानपणी सूर्य उगविण्याआधीच उठून बसायची सवय होती, माझ्याआधीच दादा उठून आपल्याजागीच बसून 'पवित्र क्रुसाच्या खुणेने' असे म्हणून आपली सकाळची प्रार्थना सुरु करायचे. त्यावेळी मला ''सकाळीच असे भुतासारखे उठून काय बसायचे? असे बाई चिडून म्हणायची, पण एकदा जाग आल्यावर बिछान्यावर पडून राहणे, लोळणे मला कधी जमलेच नाही. आजही तसेच आहे.

घरी दुपारची झोप येणे तर अशक्यच. आणि गोव्यात आता संन्यासी ख्रिस्ती धर्मगुरु होण्यासाठी आलो असताना दुपारची झोप घेण्याचे सक्तीचे बनले होते. माझ्या दिनचर्याची आता अविभाज्य भाग असलेल्या सिएस्ता किंवा वामकुक्षीची ही अशी झाली सुरुवात.

पदवीधर झाल्यानंतर फादर होण्याचा निर्णय मी बदलला अन त्याऐवजी मी पत्रकार बनलो. गोव्यातल्या त्याकाळात म्हणजे १९८०च्या दशकात आम्ही सर्व बातमीदार मंडळी सकाळी साडेनऊच्या आसपास मांडवीच्या तिरावर असलेल्या मध्ययुगीन आदिलशाहचा राजवाडा असलेल्या गोवा सचिवालयाच्या प्रेस रुमध्ये जमायचो. गोवा सचिवालय आता पर्वरीला गेले असले तरी तळमजल्यावरच्या प्रेसरुमचा तो बोर्ड अजूनही आहे.

सकाळच्या प्रेस कॉन्फरन्स, मंत्र्यांच्या नि सचिवांच्या भेटीगाठी आटोपून बारापर्यंत आम्ही आपापल्या दैनिकांच्या ऑफिसांत पोहोचायचो, तेथे बातम्या टाईप करुन दुपारी एकच्या आसपास घरी निघायचो. सिनियर पत्रकारांचे पर्वरीला पत्रकार कॉलनीत घरे आणि मी सान्त इनेजच्या टोकापाशी ताळगावला राहायचो. पंधरा मिनिटांत जो तो आपापल्या घरी फिश-करी राईस खायला हजर, नंतर मस्तपैकी सिएस्था आणि परत फ्रेश होऊन चारला प्रेसरूमला येऊन तेथे किंवा एखाद्या प्रेस कॉन्फरन्समध्ये चहापानाला उपस्थित.

दुपारच्या त्या झोपेने दिवसभर मरगळ अशी कधी जाणवायची नाही. विशेष म्हणजे पणजीतील आणि गोव्यातील म्हापसा, मडगाव अशा इतर काही शहरांतील अनेक दुकानदारसुद्धा या सिएस्थासाठी आपली दुकाने दुपारी एकदोन बंद तास ठेवत असत. गोव्यात साडेचारशे वर्षे असलेल्या पोर्तुगीज राजवटीचा सिएस्था हा आणखी एक भलाबुरा सांस्कृतिक वारसा !

पोर्तुगिजांनी गोव्यात तसे अनेक सांस्कृतिक वारसे मागे ठेवले आहेत. कामावरुन संध्याकाळी किंवा रात्री घरी परतल्यावर पेयपान आणि जेवणाआधी अंघोळ करुन ताजेतवाने व्हायचे ही गोव्यातील अनेक लोकांची सवय हा त्यापैकी एक पोर्तुगिज सांस्कृतिक वारसा. त्यामुळे ''दुपारी एक ते चार दुकान बंद'' अशी चैन किंवा मक्तेदारी केवळ पुण्यातच चालते असे म्हणण्यास काही अर्थ नाही. तर गोव्यात पत्रकारितेत स्थिर होताना दुपारच्या झोपेची सवय अशाप्रकारे आवश्यकच बनत गेली.

खरे पहिले तर सिएस्ता म्हणजेच वामकुक्षी. पण तरीही दोन्ही संज्ञा दोन वेगवेगळ्या ठिकाणी लोकप्रिय आहेत. जसे पुण्यातली वामकुक्षी आणि गोव्यातली सिएस्ता. भाषेनुसार वेगळे सांस्कृतिक संदर्भ आहेत.

गोवा सोडले तरी पुण्यातील इंडियन एक्सप्रेसच्या बातमीदारांच्या कामकाज पद्धतीने सिएस्ताची सवय कायम ठेवली. पालेकर वेतन आयोगानुसार पत्रकाराला दिवसा सहा तास आणि रात्री साडेपाच तास काम करावे लागे, त्यामुळे आम्ही सर्व बातमीदार दुपारी अडिच-तीनच्या सुमारास अरोरा टॉवर्समधील ऑफिसात यायचो, रात्री नऊच्या सुमारास काम संपत असायचे. याकाळात मी चिंचवडला राहायला आलो होतो, घरी दुपारी जेवून सिटी बसने पुण्याला शिवाजीनगरपर्यंत यायचो, तेव्हा बसमध्ये अर्धापाऊण तास मस्तपैकी पेंगून सिएस्ता पूर्ण व्हायची.

अनेकदा बस कंडक्टर किंवा सहप्रवासी शेवटच्या स्टॉपवर मला जागी करायचे. दुपारच्या किंवा कुठल्याही वेळेचे अशा प्रकारचे झोपेचे सुख केवळ नेहेमी बस किंवा लोकलने प्रवास करणारेच प्रवाशांनाच माहित असते.

`टाइम्स ऑफ इंडिया’त जॉईन झालो तेव्हा पुणे आवृत्तीचे ऑफिस शिवाजीनगरहून फर्ग्युसन कॉलेज रोडवर हॉटेल वैशालीपाशी स्वतःच्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरीत झाले होते. कामाचे तास अगदी तसेच म्हणजे दुपारी अडिच ते रात्री दहा असे, त्यामुळे चिंचवडगाव ते शिवाजीनगरच्या मॉडर्न कॉलेजचा बस स्टॉपपर्यंतचा माझा सिएस्ताचा सिलसिला कायम राहिला, तेथून पाचदहा मिनिटांच्या अंतरावर ‘टाइम्सऑफ इंडिया`चे ऑफिस आहे.

अधूनमधून उशीर झाल्यास बसस्टॉपवरून रिक्षाने मी ऑफिसला जात असे. एकदा बालगंधर्व चौकात रिक्षा पोहोचल्यानंतर त्या रिक्षा ड्रायव्हरने मला म्हटले, ''तुम्ही `घेतली’ आहे, हे मला माहित आहे.'' थक्क होऊन मी त्याला यामागचे कारण विसरले तर तो म्हणाला, ''तुमचे लालबुंद डोळेच सर्वकाही सांगतायत.'' मी रिक्षाच्या आरशात पाहिले तर तो माझे डोळे खरेच लालबुंद झाले होते. बसमधल्या त्या अर्ध्या तासाच्या गाढ झोपेचा तो परीणाम, पण त्या रिक्षा ड्रायव्हरला काय सांगणार ?

सकाळ माध्यमसमूहाच्या `महाराष्ट्र हेराल्ड - सकाळ टाइम्स’ या इंग्रजी दैनिकासाठी गेली सोळा वर्षे न्युज डेस्कवर आणि नंतर न्युज ब्युरोत बातमीदार म्हणून काम केले. तेव्हासुद्धा बहुतांश काळ कुणालाही हेवा वाटेल अशी या सिएस्ताची ही चैन उपभोगता आली.

गोवा सोडून पुण्यात आल्यानंतरही कुणालाही हेवा वाटेल अशी सिएस्ताची ही चैन मी उपभोगू शकलो याचे एक अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. ते म्हणजे पुण्यात आल्यापासून तो करोनाच्या या अलोकडच्या काळापर्यंत मी स्वतःच्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनाचा वापर न करता नेहेमीच सिटी बसने प्रवास करत राहिलो. सिएस्ताचा अलौकिक अनुभव हे यामागचे एक प्रमुख कारण. त्यामुळेच घरच्यांचा रोष पत्करुन आणि सहकारी पत्रकारांच्या अवहेलनात्मक प्रतिक्रियांना न जुमानता माझा हा चिंचवड- शिवाजीनगर पुणे निद्रस्थ बसप्रवास तब्बल तीन दशके चालू राहिला.

हा बसप्रवास तसा फार सुखाचाही नव्हता. १९९०च्या दशकात माझ्या घरासमोरून जाणाऱ्या १२२ क्रमाकांच्या चिंचवडगाव –पुणेमनपा बस वीस किंवा तीस मिनिटांनी यायची, तीस वर्षानंतर आजही तीच परिस्थिती आहे. अनेकदा बस गच्च भरलेली असल्यास पुढे सीट न मिळणार नाही आणि सिएस्ताचा लाभ घेता येणार नाही या जाणिवेने ती बस सोडून द्यावी लागे. अशाप्रकारे कधीकधी वीस मिनिटांच्या प्रवासासाठी अर्धा तास सीट मिळेल अशा पुढच्या बसची वाट पहावी लागे.

निद्रादेवीच्या या आराधनेसाठी अनेकदा चिंचवडगावात मागे जाऊन सुरुवातीच्या बसस्टॉपला जागा पटकावण्याचा द्राविडी प्राणायाम केला आहे. मुंबईत लोकल प्रवास करणाऱ्यांसाठी यात विशेष असे काही नसणार.

ऑफिसला ठराविक वेळेवर पंचिंग करण्याची गरज नसल्याने तसे टेन्शन नसायचे. मात्र उशीर होऊ नये यासाठी प्रवासासाठी वाढीव वेळ मी नेहेमीच गृहीत धरत असे. एकदा नेहेमीची मोक्याची आरामदायक सिट पकडली कि बॅग छातीपाशी ठेवून डोळे मिटले कि काही क्षणांत ब्रह्मानंदी टाळी लागत असे. यापेक्षा दुसरे स्वर्गसुख कुठले असू शकेल ?

मात्र आठवड्यातून कधीतरी भरलेल्या बसमध्ये शिरावे लागे. अशावेळी व्हीआयपी व्यक्तीच्या मागे बॉडीगार्ड ज्या नजरेने सगळीकडे टेहेळणी करत असतो त्याप्रमाणे कुठली सिट लवकरच रिकामी होणार आहे याकडे लक्ष देऊन चपळाईने ती जागा बळकावी लागते. अनुभवाने यात सराईतपणा येतो. अर्ध्या प्रवासानंतर अशी सीट मिळाली तर होणारा आनंद अवर्णनीय असतो. अशावेळी पाचदहा मिनिटांची डुलकीही फ्रेश होण्यासाठी पुरेशी असते.

यदाकदाचित संपूर्ण प्रवासात क्षणभराच्या डुलकीसाठी सिट मिळाली नाही तर चिडचिडपणा व्हायचा, डोके भणभणायला लागायचे. ऑफिसात शिरल्यावर काम सुरु करायला उत्साह नसायचा.

मी सिटी बसने प्रवास करतो, याचे अनेकांना आश्चर्य वाटते. बस स्टॉपवर मला पाहून अनेकदा ओळखीचे लोक मला लिफ्ट देऊ पाहतात. आमच्या घरी तीन दुचाकी आहेत, एक कारही आहे तरी मला सिटीबसनेच प्रवास करायला आवडते, आणि तेसुद्धा दुपारच्या झोपेच्या सुखासाठी, हे कुणाकुणाला आणि का म्हणून सांगत बसायचे ?

निद्रादेवीच्या आराधनेच्या माझ्या या हव्यासापायी अनेकदा काही गंमतीजमतीही व्हायच्या. घरासमोरच्या बसस्टॉपवर बसची वाट पाहत असताना शेजाऱ्याची चारचाकी माझ्यासमोर येऊन थांबली. '' शिवाजीनगरला चाललोय, चला माझ्याबरोबर,'' असे तो म्हणाला. मी चक्क नाही म्हणालो.

``मी वाट पाहिन पण एसटीनेच जाईन'' या धर्तीवर '' मला पीएमटी बसनेच जायचे आहे,'' असे मी त्याला सांगितले. कारने मी गेलो असतो तर मी लवकर पोहोचलो असतो, पण माझ्या दुपारच्या झोपेचे खोबरे झाले असते.

सिएस्ताबाबत माझ्या या हट्टाहासाची कल्पना असलेल्या दुसऱ्या एका स्नेहाने मला प्रवासात आपल्या कारमध्येच झोपण्याचा सल्ला दिला, तो अव्यवहार्य म्हणून मी नाकारला होता. स्नेही कर चालवत असताना मी ड्रायव्हरच्या शेजारच्या पुढच्या सिटवर बसून किंवा मागच्या सिटवर मला स्वस्थ झोप येणे शक्य तरी झाले असते काय ? आणि समजा माझा डोळा लागला तरी काही मिनिटांच्या आतच आम्ही पुण्याला पोहोचलो असतो त्याचे काय?

हा, मात्र कारमध्ये असताना सुद्धा बससारखेच आरामात सिएस्ताचा लाभ घेण्याचे अनुभवाने मी शिकलो. गेल्या काही अलिकडच्या काळात बिझिनेस ही अत्यंत आकर्षक आणि मोहदायी बिट माझ्या वाट्याला आली किंवा सिनियॉरिटीच्या अधिकाराने मी ती बिट स्वतःकडे ओढून घेतली होती.

या बिटच्या कार्यभागानुसार चाकण औद्योगिक क्षेत्रात व इतरत्र उद्योगकंपन्यांना भेटी द्याव्या लागायच्या, दुपारच्या पेयपान आणि जेवणानंतर तेथून दुपारी पुण्याला परतावे लागे. विशेष म्हणजे बहुतांश वेळेस मला एकट्याला प्रवासाला स्वतंत्र टॅक्सी असायची. अशावेळी मागच्या सिटवर अगदी कमरेला सीट बेल्ट लावून त्या वातानुकूलित कारमध्ये मस्तपैकी सिएस्ता व्हायची. शिवाजीनगरला न.ता. वाडीला पोहोचल्यावरच ड्रायव्हरने आवाज दिल्यावरच निद्राभंग व्हायचा. पण तोवर मस्तपैकी झोप होऊन अगदी फ्रेश वाटायचे.

वाहनात प्रवास करताना निद्रासुख घेण्याचे प्रसंग पुण्यातून चिंचवडला रात्री उशिरा परततांना अनेकदा आले. असेच एकदा रात्री निगडी बस स्टॉपवर उतरुन मी चालत होतो तो मागच्या एका कारमधून हॉर्न ऐकू आला, चिडून मी रस्त्याच्या आणखी कडेने चालू लागलो, तरी हॉर्नचा आवाज वाढतच होता. शेवटी ती कार अगदी मला खेटून उभी राहिली आणि सुहासने, माझ्याच इमारतीमधल्या माझ्या मजल्यावरील शेजाऱ्याने, मला गाडीत बसायला सांगितले.

त्या रात्रीच्या वेळी घरापासून लांब असलेल्या रस्त्यावरुन चालताना माझ्या गोंधळलेल्या स्थितीवरुन बहुधा सुहासला आणि त्याच्या बायकोला काहीतरी अंदाज आला असावा. गाडीत बसल्यावर शेवटी त्यांना सांगावेच लागले कि बसमध्ये डुलकी लागल्यामुळे चिंचवड कधी मागे पडले ते कळालेच नव्हते आणि कंडक्टरने निगडीला शेवटच्या बस स्टॉपवर जागे केले होते ! त्या स्पष्टीकरणावर गाडीत मोठा हास्यकल्लोळ झाला होता, मीसुद्धा त्यात सामिल झालो होतो.

सुहासच्या मुलाला – आरुषला - मात्र कामिल अंकल बसमध्ये असे झोपलेच कसे हा प्रश्न पडला होता ! या घटनेपासून पुणे मनपा बस स्टॅन्डवरुन रात्री उशिरा घरी येताना चिंचवडमार्गे देहूरोडची मुक्कामी बसने कधीही यायचे नाही असा कानाला खडा लावला.

नाहीतर या तीर्थक्षेत्री रात्री मुक्काम करावा लागायचा.

खूप वर्षांपूर्वी असेच एकदा रात्री साडेनऊला शिवाजीनगरहून चिंचवडमार्गे जाणारी लोणावळा लोकल पकडली. गर्दी नव्हतीच. लोकलने वेग घेतला अन रात्रीच्या थंड वाऱ्यात कधी डोळा लागला ते समजलेच नाही. पिंपरी रेल्वे स्टेशनवर लोकांची बडबड ऐकली अन खाड्कन जागा झालो. जाग आली नसती तर रात्री अकराच्या आसपास लोणावळा गाठले असते. त्यानंतर लोणावळा लोकलने कधी प्रवास केला नाही.

कोरोनानंतर ऑफिस सुटून आता घरी ऑनलाईन काम करताना तर सिएस्ता अत्यंत गरजेची झाली आहे आणि त्यासाठी थोडा वेळ अधिक खर्चिला जात आहे. त्यादिवशी कुणी एकाने झूम मिटिंगसाठी दुपारची तीन ही वेळ निवडली तेव्हा तिडीक आली होती. मात्र झूम मिटिंगसाठी परदेशांतील लोकही असणार म्हणून बहुतांश लोकांना सोयिस्कर अशी ही वेळ, असे कळल्यावर मी शांत झालो.

पत्रकारितेच्या व्यवसायात ज्या काही थोड्याबहुत चांगल्या गोष्टी उपभोगता आलया त्यापैकी या सिएस्ताला मी अगदी वरच्या क्रमांकाची जागा देईल. इंग्रजी पत्रकारितेतील एक पत्रकार म्हणून बऱ्यापैकी मासिक वेतन आणि इतरांना न मिळणाऱ्या कैक सुविधा मिळत असतानाच सिएस्तासारख्या स्वर्गसुखाचा आनंद दुसऱ्या कुठल्याही व्यवसायात मला भोगता आला असता असे मला वाटत नाही.

सिएस्ता पर्वाला `होली अवर' असे का म्हणायचे हेही आता समजते आहे.

हल्ली आमच्या शहरात सिटी बस इलेक्ट्रॉनिक आणि चक्क वातानुकूलित आहेत. बसप्रवासाचा स्वस्तातला मासिक पास माझ्याकडे आहे. दुपारी जेवण आटोपून मी घराजवळ असलेल्या शेजारच्या बस स्टॉपवर जातो तेथे लांब पल्ल्यावरची बस पकडतो. हल्ली सार्वजनिक वाहतूकसेवा वापरण्याबाबत लोकांचा कल कमी झाल्याने बसमध्ये बसायला जागा हमखास मिळते. एक चांगली सीट घेऊन मग दोनतीन मिनिटांत सवयीने डोळे लगेच मिटतात. किमान अर्धा तास छानपैकी सिएस्ता होते,

सुख, सुख ते काय म्हणतात, यापेक्षा काही वेगळे असते काय?

१८ मार्चच्या जागतिक निद्रा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !!

Enjoy the Happy Hour, the Siesta !!!!

संस्कृतीची विविध रुपे , कामिल पारखे (चेतक बुक्स ) मधील एक प्रकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT